मोकाट गुरे, रस्ता भरे!
By admin | Published: June 12, 2015 10:43 PM2015-06-12T22:43:21+5:302015-06-13T00:20:07+5:30
कसई दोडामार्ग : वाहतूकधारक त्रस्त, भाजीपाला फस्त
वैभव साळकर - दोडामार्ग -कसई दोडामार्गचे शहरवासी कचरा समस्या, वाहतूक कोंडीची समस्यांपासून हैराण झाले असताना त्यात आता मोकाट गुरांच्या समस्येची भर पडली आहे. या गुरांचा प्रश्न बाजारपेठेतील व्यापाऱ्यांना आणि वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात सतावतो आहे. रस्त्यात तळ ठोेकणाऱ्या गुरांमुळे अपघाताचे प्रमाणही वाढत आहे. त्यामुळे अशा मोकाट गुरांना आळा घालण्याची मागणी शहरवासीयांकडून सातत्याने होत आहे.
कसई दोडामार्ग शहराला नगर पंचायतीचे वेध लागले आहेत. त्या अनुषंगाने प्रशासनाने कार्यवाही सुरू केली आहे. मात्र, नगर पंचायतीच्या माध्यमातून शहराचा कारभार हाकताना येथील जनतेला कोणत्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे, हे प्रशासनानेही जाणून घेणे गरजेचे आहे. शहरवासीयांना कचरा समस्या, वाहतूककोंडीचा प्रश्न आ वासून उभा आहेच.
याचबरोबर रस्त्यावरील मोकाट गुरांच्या समस्येची भर पडली आहे. या गुरांचा सर्वात जास्त त्रास शहरातील व्यावसायिक, भाजी विक्रेते, फुलविक्रेते आणि वाहनचालकांना होत आहे. रस्त्याच्या कडेला लावण्यात येणाऱ्या भाजी विक्रेत्यांच्या दुकानात गुरांचे झुंडीच्या झुंडी शिरण्याचा प्रकार बाजारपेठेत वारंवार पाहवयास मिळतो आहे. फुलविके्र त्यांच्याबाबतही हीच परिस्थिती आहे. त्यामुळे या मोकाट गुरांचा त्रास भाजी व फुलविक्रेत्यांना सहन करावा लागत आहे.
जर एखाद्या गुरास मोठ्या गाडीची ठोकर बसून ते मृत्यूमुखी पडल्यास अथवा जखमी झाल्यास त्याचा मालक भरपाईसाठी दत्त म्हणून उभा राहण्याचे प्रकारदेखील अनेकदा मार्केटमधील नागरिकांनी अनुभवले आहेत. त्यामुळे आपल्या जनावरांना मोकाट सोडणाऱ्या मालकांवरच खरे तर कारवाई करण्याची गरज आता भासत आहे.
(उद्याच्या अंकात वाचा - बाजारपेठ विस्तृतीकरणाचे राहणार मोठे आव्हान?)
दुकानाचे नुकसान
अनेकवेळा दोडामार्ग बाजारपेठेत मोकाट फिरणाऱ्या जनावरांमध्येच झुंजी लागतात. एकदा बिथरलेले हे बैल किंवा जनावरे मग काही केल्या मागे न हटता भर रस्त्यात अथवा शेजारच्या दुकानात बैल घुसून नुकसान करतात.
मकोंडवाड्याची गरज
शहरात मोकाट फिरणाऱ्या जनावरांना पकडून एका विशिष्ट ठिकाणी बांधण्यासाठी कोंडवाड्याची गरज आहे. मात्र, दोडामार्ग शहरात कोंडवाडा नसल्याने जनावरांना पकडून मग त्यांचे करायचे काय? असा प्रश्न प्रशासनाला पडतो आहे. परिणामत: भविष्यातील विचार करता, शहरामध्ये कोंडवाड्याची गरज ही एक मोठी जबाबदारी नगरपंचायतीकडे असणार आहे.
भर बाजारपेठेतच झुंजीचे प्रकार
दोडामार्ग बाजारपेठेत मोकाट फिरणारे बैल भर बाजारपेठेतच झुंजण्याचे प्रकार जीवघेणे ठरत आहेत. त्याचा नागरिकांना त्रास होत आहे.