मोड यात्रेने आंगणेवाडी यात्रेची सांगता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 19, 2020 04:21 PM2020-02-19T16:21:26+5:302020-02-19T16:24:00+5:30

आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिकोत्सवाची मंगळवारी मोड यात्रेने सांगता झाली. यात्रोत्सवाचा परमोच्च बिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीच्या महाप्रसादाची ताटे लावणे या धार्मिक विधीला जनसागर उसळला आणि रात्री गर्दीने उच्चांक गाठला.

Mod Yatra tells about Anganwadi Yatra | मोड यात्रेने आंगणेवाडी यात्रेची सांगता

मोड यात्रेने आंगणेवाडी यात्रेची सांगता

Next
ठळक मुद्देमोड यात्रेने आंगणेवाडी यात्रेची सांगतागर्दीने गाठला उच्चांक

सिंधूदुर्ग :  आंगणेवाडी येथील श्री भराडी देवीच्या वार्षिकोत्सवाची मंगळवारी मोड यात्रेने सांगता झाली. यात्रोत्सवाचा परमोच्च बिंदू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या देवीच्या महाप्रसादाची ताटे लावणे या धार्मिक विधीला जनसागर उसळला आणि रात्री गर्दीने उच्चांक गाठला.

सोमवारी पहाटे २ वाजल्यापासून आंगणेवाडी यात्रोत्सवास सुरुवात झाली. दिवसभर भाविकांची रीघ सुरू होती. सूर्य मावळतीकडे गेला आणि आंगणेवाडीकडे जाणारे सर्वच रस्ते गाड्यांनी भरून गेले. दिवसभरापेक्षा रात्रौ सिंधुदुर्गातील भाविकांनी यात्रोत्सवाचा आनंद लुटण्यासाठी धाव घेतली.

मंदिरावर तसेच संपूर्ण आंगणेवाडीत आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आल्याने छोटासा आंगणेवाडी गाव एखाद्या नव्या नवरीप्रमाणे नटल्यासारखा दिसत होता. रात्री ९. ३० वाजण्याच्या सुमारास यात्रेचा परमोच्च बिंदू मानला गेलेला देवीला महाप्रसादाची ताटे लावण्याच्या कार्यक्रमास सुरुवात झाली. त्यामुळे रात्री ९ ते १२ वाजेपर्यंत दर्शन थांबविण्यात आले होते.
 
आंगणेवाडीत आंगणे कुटुंबियांप्रमाणे इतर ग्रामस्थांनी महिला वर्गासमवेत महाप्रसादाची ताटे घेऊन येण्यास सुरुवात केली. डोईवर महाप्रसादाची ताटे घेऊन आंगणेवाडीच्या माहेरवाशिणी लगबगीने येत होत्या. चार पाच जणांच्या गटाने मंदिराच्या गाभाऱ्यात महिलांना ताटे लावण्यासाठी सोडण्यात येत होते.

देवीला महाप्रसाद दाखवून माहेरवाशिणी मंदिरातून बाहेर पडत होत्या. देवीला प्रसाद दाखविल्यानंतर घरोघरी भाविकांना महाप्रसादाचे वाटप कारण्यात आले. हा सोहळा पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती. रात्री १ वाजल्यानंतर ओटी भरण्याचा आणि दर्शनाचा कार्यक्रम सुरु करण्यात आला. त्यामुळे पुन्हा भाविकांचा दर्शनाचा ओघ सुरु झाला. यावर्षी दर्शनासाठी नऊ रांगांची सोय करण्यात आल्याने भाविकांना देवीचे दर्शन सुलभपणे झाले. रात्री भाविकांनी यात्रेत मोठी गर्दी केल्याने गर्दीने उच्चांक गाठला.

यात्रेच्या दुसऱ्या दिवशी मोड यात्रेला भाविकांनी गर्दी केली होती. मोड यात्रेत दर्शनाबरोबरच भाविकांनी खरेदीचाही आनंद लुटला. सायंकाळपर्यंत दर्शनाची रांग सुरु होती. यावर्षीही एसटी महामंडळाने अव्याहत पणे बस सेवा सुरू ठेवली होती. तर वीज पुरवठाही सुरळीत सुरु होता.

पोलीस बंदोबस्त चोख ठेवण्यात आला होता. त्यामुळे कुठेही अनुचित घटना घडली नाही. सायंकाळी तुलाभाराचा कार्यक्रम बंद करण्यात आला.या यात्रोत्सवात पाळणे, टॉयट्रेन, मौत का कुआ हे आणि इतर साहसी खेळ बच्चे कंपनीसाठी सज्ज ठेवण्यात आले होते. रात्रौ या खेळांना बच्चे कंपनीबरोबरच मोठ्यांनीही उपस्थिती दर्शवित आनंद लुटला. या यात्रोत्सवात कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्याचे वृत्त आहे.

Web Title: Mod Yatra tells about Anganwadi Yatra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.