मोड यात्रेने ‘आंगणेवाडी’ची सांगता
By admin | Published: February 27, 2016 01:21 AM2016-02-27T01:21:11+5:302016-02-27T01:21:11+5:30
दहा लाख भाविकांनी घेतले दर्शन : भाविकांचा दर्शनासाठी ओघ
मालवण : आंगणेवाडी येथील श्री देवी भराडी देवीच्या महायात्रेची लाखो भाविकांच्या साक्षीने उत्साहात सांगता झाली. दीड दिवस सुरू असलेल्या यात्रोत्सवाची सांगता शुक्रवारी सायंकाळी मोडयात्रेने झाली. दीड दिवसात १० लाखांहून अधिक भाविकांनी दर्शन घेतल्याचे आंगणेवाडी ग्रामस्थ मंडळाच्यावतीने सांगण्यात आले. तर यानिमित्ताने करोडो रुपयांची आर्थिक उलाढाल झाली आहे.
दरम्यान, गुरुवारी रात्री ८ वाजल्यापासून देवीला प्रसाद लावण्याचा सोहळा भाविकांनी नयनात साठवून ठेवला. देवीच्या मानकऱ्यांची प्रसादाची ताटे सुहासिनी महिलांनी डोक्यावर घेत आणली. त्यानंतर ग्रामस्थांनी घरात बनविलेली प्रसादाची ताटे देवालयात आणण्यात आली. यावेळी मंदिर परिसरात भाविकांची एकच गर्दी पहावयास मिळाली. दुसऱ्या दिवशीही सकाळपासून भाविकांच्या दर्शनाच्या रांगा भरलेल्या होत्या. मोड यात्रेच्या शेवटच्या टप्प्यातही हजारो भाविकांनी दर्शन घेतले.
अनुचित प्रकार नाही
आंगणेवाडी यात्रोत्सवात ग्रामस्थ मंडळाने पोलीस प्रशासनाला धरून केलेल्या सुयोग्य नियोजनामुळे दीड दिवसांच्या यात्रोत्सवात कुठलाही अनुचित प्रकार घडला नाही. जिल्हा पोलीस अधीक्षक दत्तात्रय शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि उपविभागीय पोलीस अधिकारी पद्मजा चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली चोख पोलीस बंदोबस्त ठेवल्याने तसेच सीसीटीव्ही यंत्रणेचा मोठा वापर केल्याने यात्रोत्सव सुरळीत पार पाडण्यास यंत्रणा यशस्वी ठरली.
दुसऱ्या दिवशीही महनीय व्यक्तींची उपस्थिती
आंगणेवाडी भराडी देवीच्या दीड दिवसाच्या यात्रोत्सवात दुसऱ्या दिवशीही महनीय व्यक्तींनी देवीचे दर्शन घेतले.
यात भाजपचे आमदार रवींद्र चव्हाण, राष्ट्रवादीचे आमदार निरंजन डावखरे, माजी आमदार सुभाष चव्हाण, आदींनी हजेरी लावली. मोड यात्रेदिवशीही हजारो भाविकांनी देवीचे दर्शन घेतले. सायंकाळी उशिरा मोड यात्रेची उत्साहात सांगता झाली असली तरी जिल्ह्यात काँग्रेसने दिलेल्या रास्तारोको आंदोलनाचा इशारा लक्षात घेता पोलीस बंदोबस्त लवकर आटोपता घेण्यात आला होता.