बेस्ट समितीचे माजी चेअरमन मोहन सावंत यांचं निधन
By admin | Published: October 25, 2016 09:54 PM2016-10-25T21:54:14+5:302016-10-25T21:54:14+5:30
भिरवंडे गावचे सुपूत्र आणि बेस्ट समितीचे माजी चेअरमन मोहनराव मुरारी सावंत(82) यांचे मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ह्र्दयविकाराच्या तीव्र धक्याने निधन
ऑनलाइन लोकमत
कणकवली, दि. 25 - भिरवंडे गावचे सुपूत्र आणि बेस्ट समितीचे माजी चेअरमन मोहनराव मुरारी सावंत(82) यांचे मंगळवारी दुपारी 12.30 वाजण्याच्या सुमारास ह्र्दयविकाराच्या तीव्र धक्याने कणकवली येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना निधन झाले. शिवसेनेच्या स्थापनेपासूनचे बिनीचे शिलेदार असलेले मोहनराव मुरारी सावंत काळाच्या पडदयाआड गेले असून भिरवंडे गावावर शोककळा पसरली आहे.
मोहनराव मुरारी सावंत यांचा सुरुवातीचा जीवनप्रवास संघर्षमय होता. वयाच्या नवव्या वर्षी वडिलांचे निधन झाल्यानंतर पोरके झालेले ते मुंबईला गेले. प्रतिकुल परिस्थितीत मिळेल ते काम त्यांनी केले. रात्र शाळेत शिक्षण घेतले. त्यादरम्यानच्या काळात शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या संपर्कात ते आले. शिवसेनेची स्थापना करताना बाळासाहेबांबरोबर जी मोजकी मंडळी होती,त्यामध्ये मोहनराव सावंत हे एक होते. आयुष्याच्या अखेर पर्यंत बाळासाहेबांवर निष्ठा असलेले ते कडवट शिवसैनिक होते.
बाळासाहेब त्यांना 'कोकणचा ढाण्या वाघ' असे संबोधित असत. 1968 ते 1990 अशी तब्बल 22 वर्षे कुर्ल्यातून मुंबई महानगरपालिकेतील ते शिवसेनेचे नगरसेवक होते. या काळात त्यांनी मुंबई बेस्ट समितीच्या चेअरमनपदापासून अनेक पदे भूषविली. मुंबईत अनेकांना नोकऱ्या दिल्या. सढळ हस्ते मदत केली. कुर्ला भागात दोनवेळा विधानसभेची निवडणूक लढविली. अवघ्या काही मतांच्या फरकाने ते पराभूत झाले. तरी कुर्ल्यात त्यांनी शिवसेनेचे वर्चस्व कायम ठेवले होते.
ज्या भूमित आपण जन्म घेतला त्या भूमिच्या विकासासाठी त्यानी सातत्याने योगदान दिले. भिरवंडे येथील श्री रामेश्वर मंदिराच्या उभारणीत त्यांचा सिंहाचा वाटा होता. रामेश्वर देवालय संचालक मंडळाचे अध्यक्ष, कनेडी गट शिक्षण प्रसारक मंडळ मुंबईचे अध्यक्ष अशी अनेक पदे त्यानी भूषविली.
माध्यमिक विद्यामंदिर कनेडी व ज्युनिअर कॉलेजच्या जडणघडणीत तसेच कनेडी प्राथमिक आरोग्य केंद्राच्या उभारणीत त्यांचे महत्वपूर्ण योगदान होते. दानशूरपणा हा त्यांच्या नसानसात भिनला होता. त्यामुळे त्यानी अनेकांना नेहमीच मदत केली. वयाच्या 82 व्या वर्षीही त्यांचा उत्साह दांडगा होता. त्यांचा आदरयुक्त दरारा या वयातही कायम होता.
मोहनराव सावंत यांना मंगळवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांना कणकवलीतील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र,दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास त्यांची प्राणज्योत मालवली.
याबाबत माहिती समजताच ब्रिगेडियर सुधीर सावंत, जिल्हा बँकेचे अध्यक्ष सतीश सावंत, जिल्हा परिषद सदस्य संदेश सावंत, सुरेश सावंत, सुशांत नाईक यांच्यासह अनेक मान्यवर तसेच ग्रामस्थानी त्यांचे अंत्यदर्शन घेतले. त्यानंतर त्यांचे पार्थिव भिरवंडे येथील निवासस्थानी नेण्यात आले. बुधवारी सकाळी 9 वाजता त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, दोन मुली, जावई,नात असा परिवार आहे. त्यांच्या जाण्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.