‘गोमंत संत सोहिरोबानाथ’ नाटकाची मोहिनी
By Admin | Published: January 20, 2015 10:15 PM2015-01-20T22:15:56+5:302015-01-20T23:34:34+5:30
संगीत राज्य नाट्य स्पर्धा : अपुरे पाठांतर, प्रकाशयोजनेत घाई--राज्य नाट्य स्पर्धा
‘संगीत गोमंत संत सोहिरोबानाथ’ हे संगीत नाटक! हे नाटक भार्गवी थिएटर्स, पर्वरी, गोवा या संस्थेने सादर केले.
अनंत आंबिये हे सावंतवाडीचे राजे सोम सावंत यांच्याकडे कुलकर्णी पदावर सेवेत होते. त्यांना जो पुत्र झाला त्याला फक्त दोन दिवसांचा असताना गोरखनाथांचा शिष्य, गहिनीनाथ यांचा आशीर्वाद लाभला. त्यामुळे तो बालपणापासूनच श्रीहरीची भक्ती करु लागला. त्या मुलाचे नाव होते ‘सोहिरु अनंत आंबिये’ तेच पुढे संत सोहिरोबा!
सोमसावंतांकडील कुलकर्णी पद हे सोहिरुच्या ईश्वरभक्तीत अडसर ठरत होते. त्यामुळे सोहिरुने सेवेचा राजीनामा दिला. त्याच दरम्यान गहिनीनाथांनी त्यांना कानमंत्र देऊन साक्षात्कार घडविला. त्यामुळे ते ईश्वरभक्तीत तल्लीन होऊन त्यांनी अनेक कवने लिहिली. गायनात रममाण होऊन त्यांनी भारतातील काही प्रांतात नामस्मरणाचा महिमा समाजासमोर ठेवून समाजप्रबोधन केले. शेवटी मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ, गहिनीनाथ यांनी त्यांना संतपद प्राप्त झाल्यामुळे वैकुंठास नेले, असे नाटकाचे कथानक!
महादेव सगुण हरमलकर यांनी चांगली संहिता मांडली. फिरत्या रंगमंचाचा वापर करण्यात आला. संत सोहिरोबानाथांची भूमिका साकारणारे दशरथ नाईक हे ही भूमिका अक्षरश: जगले. भावपूर्ण आवाज, तल्लीनता, शास्त्रीय संगीताचे संस्कार, समर्थ अभिनय हे त्यांचे विशेष!
ते समाजप्रबोधनासाठी सोहिरोबानाथ फिरले. हा प्रसंग प्रेक्षकात येऊन दशरथ नाईक यांनी ‘हरीभजनाविण काळ घालवू नको’ हे पद गाऊन दाखविला.
या नाटकाचे संगीत दिग्दर्शन प्रा. मयुरेश वस्त यांनी केले. वेगवेगळे राग व वेगवेगळे ताल वापरुन त्यांनी सोहिरोबांच्या आधीच प्रसिद्ध असलेल्या अभंगांच्या चाली बदलून वेगळ्या चाली लावण्याचे मोठे धाडस केले व ते यशस्वी झाले.
श्रुती केरकर (मुक्ता) यांचा आवाज गोड होता. मात्र, थंडीमुळे तो बसल्याचे जाणवत होते. पाठांतर नसल्यामुळे मात्र त्यांचे संवाद म्हणताना बरेच शब्द अडखळत होते. फिरत्या रंगमंचावरील नेपथ्य व प्रकाशयोजना यामध्ये समन्वय होत नव्हता. प्रकाशयोजना खूप घाईघाईने अमलात आणली जात होती. त्यामुळे नेपथ्य बदलताना गोंधळ उडत होता.
मधुकर नाईक (सोम सावंत), तुषार गोवेकर (खेमू) यांनी भूमिका साकारल्या. मात्र, त्यांची गायनाची तयारी कमी पडली. पहिल्याच अभंगात त्यांना सूर सापडला नाही. दुसरा अभंग चांगला पेलला.
आॅर्गनवादक प्रसाद गावस व तलबावादक सूरज मोरजे यांनी सुरेख व समर्पक संगीत साथ केली. सूरज मोरजे यांनी वेगवेगळ्या तालातील अभंग मोठ्या खुबीने वाजविले, तरीही त्यांची तबल्याची लय कुठेही कमी-जास्त झाली नाही.
संत सोहिरोबानाथांच्या रचनाखेरीज काही रचना बांधून त्यांना नाट्यसंगीताच्या अंगाने चाली देऊन त्या सादर करता आल्या असत्या, तर अधिक मजा आली असती. कारण नाटकांमध्ये एकही पद हे नाट्यपद अंगाचे नव्हते. सगळे अभंगच होते.
श्रुती केरकर यांचे अपुरे पाठांतर व प्रकाश योजनेमध्ये झालेली घाई यामुळे नाटक थोडे घसरले. तरीही दशरथ नाईक (सोहिरोबा) यांनी आपली भूमिका इतक्या उंचीवर नेऊन ठेवली की, या नाटकाने रसिकांच्या मनाचा ठाव घेतला.
संगीत गोमंत, संत सोहिरोबानाथ नाटकात काही त्रुटी समोर आल्या असल्या तरी सादरीकरणाबाबतीत कलाकारांनी मेहनत घेतलेली जाणवत होती. दशरथ नाईक यांनी संगीताची बाजू चांगली सांभाळली. समाज प्रबोधनाच्या हेतूने सोयरोबानाथांनी केलेल्या कार्याचे प्रत्यक्ष दर्शन हा प्रयोग घडवतो.