सोमवारी राज्यभरात एस. टी. सेवा बंद?

By admin | Published: September 24, 2015 11:10 PM2015-09-24T23:10:56+5:302015-09-24T23:55:53+5:30

कामगारांचे प्रश्न, समस्या मान्य करूनही त्या सोडविल्या जात नाहीत. म्हणूनच हे धरणे आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे.

Monday across the state. T. Service off? | सोमवारी राज्यभरात एस. टी. सेवा बंद?

सोमवारी राज्यभरात एस. टी. सेवा बंद?

Next

रत्नागिरी : राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एस. टी. बसमधील चालक व वाहक यांच्या ८ तास कामाबाबत अजूनही नियोजन झालेले नाही. कर्मचाऱ्यांच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही प्रश्न सुटलेले नसल्याने एस. टी.चे राज्यभरातील ७५ हजार कर्मचारी येत्या २८ सप्टेंबर २०१५ला स्थानक, डेपो याठिकाणी धरणे आंदोलन करणार आहेत. सकाळी ९ ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत होणाऱ्या या धरणे आंदोलनात सर्व कर्मचारी सहभागी होणार असल्याची माहिती एस. टी. कामगार संघटनेचे अध्यक्ष शिवाजी चव्हाण यांनी येथे पत्रकार परिषदेत दिली.  रत्नागिरी येथे जिल्ह्यातील एस. टी. कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याला चव्हाण व संघटनेचे अन्य पदाधिकारी आले होते. प्रथम टप्प्यात २८ सप्टेंबरला धरणे आंदोलन होणार असून, त्यादिवशी सर्व कर्मचारी धरणे आंदोलनात सहभागी होतील, असे चव्हाण यांनी स्पष्ट केले. त्यामुळे काम बंद राहून एस. टी. आगारातच उभ्या राहणार काय? असे पत्रकारांनी विचारले असता सर्व कर्मचारी धरणे आंदोलन करणार आहोत, त्यामुळे काय स्थिती निर्माण होईल, हे आता सांगता येणार नाही. चव्हाण यांच्या या उत्तरामुळे राज्यभरातील एस. टी. बस सेवा पूर्णत: विस्कळीत होणार असल्याचे चित्र आहे.  जिल्ह्यात व राज्याच्या अनेक भागात अधिकाऱ्यांमार्फत चुकीच्या पध्दतीने गाड्यांचे वेळापत्रक तयार करण्यात येते, असा आरोप त्यांनी केला. चालक, वाहकांच्या कामाचे तास किती, याबाबतच्या नियमांचे पालनच होत नाही. प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्या सोडल्या जात नाहीत. विभागीय कार्यालयात बसून कोणीतरी अधिकारी त्यांना वाटेल त्या पध्दतीने गाड्यांचे मार्ग ठरवून वेळापत्रक तयार करतात, त्यावेळी प्रवाशांच्या मागणीचाही विचार केला जात नाही, असा आरोप त्यांनी केला. गाडीसाठी आवश्यक वेळेची नोंद न करता वेळ कमी दाखवली जाते व किलोमीटर्स वाढवून दाखवले जातात. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर काही अधिकारी आपली पाठ थोपटून घेतात. प्रवाशांच्या तक्रारींची दखलच घेतली जात नाही. प्रवाशांच्या मागणीनुसार गाड्या आवश्यक आहेत. कामगारांचे प्रश्न, समस्या मान्य करूनही त्या सोडविल्या जात नाहीत. म्हणूनच हे धरणे आंदोलनाचे हत्यार उपसावे लागत आहे. एस. टी.च्या १ लाख कामगारांपैकी एस. टी. कामगार संघटनेचे राज्यात ७५ हजार कर्मचारी आहेत. हे सर्व कर्मचारी या आंदोलनात सहभागी होणार आहेत. या आंदोलनाची दखल शासनाने घेतली नाही तर राज्यभर बंद आंदोलन व नंतर चक्काजाम आंदोलन केले जाणार आहे. (प्रतिनिधी)


प्रवासात अकराशे कोटींची सवलत
राज्य परिवहनतर्फे राज्यातील २५ दुर्बल घटकांना प्रवासात प्रतिवर्षी ११०० कोटींची सवलत दिली जात आहे. मात्र, हे सवलतीचे पैसे संबंधित खात्याकडून एस. टी.ला मिळत नाहीत. विद्यार्थी पास, मोफत प्रवास तसेच ज्येष्ठ नागरिक योजनेसाठी प्रत्येकी ३६५ कोटींची सवलत दिली जाते. संबंधित खात्यांकडून हे पैसे मिळत नसल्याने नुकसान होत आहे.

बस थांबत नाहीत...
रत्नागिरी तालुक्यातील धावणाऱ्या काही एस.टी.बसेस रिकाम्या असतानाही मधल्या थांब्यांवर थांबविल्या जात नाहीत. त्यामुळे प्रवाशांची गैरसोय होते व एस.टी.चेही नुकसान होते. रत्नागिरी रेल्वे फाट्यावर असे प्रकार सातत्याने घडत असून त्याबाबत संघटनेचे अध्यक्ष म्हणून आपली भूमिका काय आहे असे विचारता चव्हाण म्हणाले, असे होत असेल तर ते चुकीचेच असल्याचे त्यांनी सांगितले.

Web Title: Monday across the state. T. Service off?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.