आचऱ्यात सोमवारी ‘गावपळण’ मेळावा
By admin | Published: December 19, 2014 09:49 PM2014-12-19T21:49:48+5:302014-12-19T23:30:31+5:30
कवी नानिवडेकर यांचे गावपळणीवर आधारित कवितावाचन, आचरा बिझनेस कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे चित्रफीत प्रदर्शन, स्थानिक आचरावासीयांचा गप्पाटप्पांचा कार्यक्रम होणार
आचरा : आचरा गावची दर तीन वर्षांनी होणारी गावपळण यावर्षी विविध कारणांनी चर्चेत राहिली. असे असताना गावपळणीच्या इतिहासात यावेळी प्रथमच येथील स्थानिक पत्रकारांच्या संकल्पनेतून छायाचित्र प्रदर्शन व गावपळण मिलन मेळाव्याचे आयोजन सोमवारी (दि. २२) दुपारी २.३० वाजता रामेश्वर संस्थानच्या भक्तनिवास सभागृहात केले आहे.
‘क्षण आनंदाचे दिवस गावपळणीचे’ असे शीर्षक घेऊन येथील पत्रकारांनी इनामदार श्री देव रामेश्वर संस्थान, सरपंच मंगेश टेमकर, यशराज संघटना, आचरा बिझनेस मॅनेजमेंट कॉलेज आदींच्या प्रमुख सहकार्यातून प्रसारमाध्यमांच्या चर्चेचा विषय बनलेली आचरा गावची ऐतिहासिक गावपळण पुन्हा सुयोग्य पद्धतीने सर्वदूर पसरली जावी व त्यानिमित्त आचरावासीय एकत्र यावेत या उद्देशाने कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. आचऱ्याचे सुपुत्र प्रख्यात साहित्यिक डॉ. विद्याधर करंदीकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा पत्रकार संघ अध्यक्ष गजानन नाईक, रामेश्वर देवस्थानचे सचिव संतोष मिराशी, वहिवाटदार सदाशिव मिराशी, सरपंच मंगेश टेमकर, आचरा पोलीस ठाण्याचे महेंद्र शिंदे आदींच्या प्रमुख उपस्थितीत हा कार्यक्रम होणार आहे.
१५० ते २०० छायाचित्रांचे प्रदर्शन भरविले आहे. कवी नानिवडेकर यांचे गावपळणीवर आधारित कवितावाचन, आचरा बिझनेस कॉलेजच्या विद्यार्थ्यांचे चित्रफीत प्रदर्शन, स्थानिक आचरावासीयांचा गप्पाटप्पांचा कार्यक्रम होणार आहे. उपस्थितीचे आवाहन केले आहे. (वार्ताहर)