डेगवे येथे माकडतापाचा रुग्ण आढळला; आरोग्य यंत्रणा सतर्क
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 12, 2021 05:03 PM2021-04-12T17:03:15+5:302021-04-12T17:06:54+5:30
Health Banda Sindhudurg: कोनशी येथे माकडताप बाधित रुग्ण सापडल्यानंतर डेगवे-मोयझरवाडी येथील २९ वर्षीय तरुण रविवारी माकडताप पॉझिटिव्ह आढळला. ही माहिती डेगवेचे माजी उपसरपंच मधुकर देसाई यांनी दिली. गेल्या दोन दिवसांत दुसरा रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
बांदा : कोनशी येथे माकडताप बाधित रुग्ण सापडल्यानंतर डेगवे-मोयझरवाडी येथील २९ वर्षीय तरुण रविवारी माकडताप पॉझिटिव्ह आढळला. ही माहिती डेगवेचे माजी उपसरपंच मधुकर देसाई यांनी दिली. गेल्या दोन दिवसांत दुसरा रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेत खळबळ उडाली आहे.
या तरुणाला ताप येत असल्याने त्याला मोरगाव प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. त्यानंतर त्याला अधिक उपचारासाठी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तेथे उपचार केल्यानंतर त्याला रविवारी घरी सोडण्यात आले. त्याच्या रक्ताचे नमुने तपासणीसाठी पुणे येथे प्रयोगशाळेत पाठविण्यात आले होते.
रविवारी सायंकाळी त्याचा पॉझिटिव्ह अहवाल आरोग्य विभागाला प्राप्त झाला. डेगवे गावात यापूर्वी देखील माकडतापबाधित रुग्ण सापडले आहेत. यावर्षी हा पहिलाच रुग्ण सापडला आहे. आरोग्य विभाग सतर्क झाला असून वाडीत सर्वेक्षण सुरू केले आहे.