जिल्ह्यात मान्सून सक्रिय

By Admin | Published: June 21, 2016 10:42 PM2016-06-21T22:42:00+5:302016-06-22T00:14:44+5:30

बळिराजा सुखावला : दमदार पावसाने जनजीवन विस्कळीत

Monsoon active in the district | जिल्ह्यात मान्सून सक्रिय

जिल्ह्यात मान्सून सक्रिय

googlenewsNext

सिंधुदुर्ग : गेले चार-पाच दिवस सिंधुदुर्गाला अधूनमधून हुलकावणी देणाऱ्या मान्सूनने मंगळवारी सकाळपासूनच जोरदारपणे बरसायला सुरुवात केली. दुपारी बारा वाजण्याच्या सुमारास जिल्ह्याच्या विविध भागात दमदार पाऊस झाला. त्यानंतर सायंकाळी चार वाजेपर्यंत पावसाची रिपरिप सुरू होती. त्यामुळे हवेत गारवा निर्माण झाला होता. मान्सूनच्या आगमनाने बळिराजा सुखावला असून, सर्वत्र आनंदाचे वातावरण पसरले आहे. मालवण, देवगड, वेंगुर्ले या किनारपट्टी भागात दमदार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले होते. सायंकाळी उशिरापर्यंत पावसाने कोणतीही हानी झाल्याची माहिती उपलब्ध नव्हती.
महिन्याच्या पहिल्या आठवड्याच्या मध्याला सुरुवात झालेल्या पावसाने चार-पाच दिवस आपल्या हजेरीने शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा संपविली होती, तर त्यानंतर पुन्हा पावसाने आपला जोर कमी केला होता. त्या दरम्यान, शेतकऱ्यांनी आपली शेती कामे उरकून घेत पेरणीही काही ठिकाणी करून घेतली. त्यामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांना पुन्हा पावसाची आस लागली होती; पण गेल्या आठवड्यापासून वरुणराजाने ओढ दिल्याने शेतकऱ्यांच्या भुवया उंचावल्या होत्या. परिणामी मान्सूनपूर्व बरसलेल्या पावसाच्या धारानंतर प्रत्यक्षात मान्सूनची प्रतीक्षा शेतकऱ्यांना लागली होती. मंगळवारी पहाटेपासून दिवसभर संततधार सुरू राहिल्याने शहरासह परिसर चिंब होऊन गेल्याने शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण पसरले आहे. (प्रतिनिधी)

आठवडा बाजारावर पाणी
सावंतवाडीत आणि कणकवलीत मंगळवारी भरणाऱ्या आठवडा बाजारात संततधार पावसाने काहीकाळ गोंधळ निर्माण झाला. संततधारेने माल खरेदी व विक्री करताना ग्राहक, व्यापाऱ्यांना त्रास सहन करावा लागला. परंतु, पावसाची आवश्यकता असल्याने व्यापाऱ्यांमध्येही समाधान दिसत होते.

Web Title: Monsoon active in the district

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.