जिल्ह्यात मान्सूनला सुरुवात
By admin | Published: June 19, 2015 12:16 AM2015-06-19T00:16:25+5:302015-06-19T00:17:56+5:30
महाबळेश्वरात २४ तासांत ४५ मि.मी. पाऊस
सातारा : मृग नक्षत्राला ११ दिवस उलटून गेले तरीही मान्सूनचा साताऱ्यात पत्ता नव्हता. गुरुवारी अखेर मान्सूनच्या पावसाने साताऱ्यात हजेरी लावली. या पावसात चिंब भिजण्याचा आनंद सातारकरांनी लुटला. शहरात बुधवारी रात्री पावसाला सुरुवात झाली. सुमारे तासभर पाऊस कोसळल्यानंतर गुरुवारीही ढगाळ वातावरण होते. सायंकाळी पावसाची संततधार सुरू झाली. पावसाच्या आगमनामुळे शहराच्या आजूबाजूला शेतकऱ्यांनी शेतीची कामे सुरू केली आहेत. या पावसामुळे नागरिक सुखावले आहेत.
शहरात मागील आठवड्यापासून ढगाळ वातावरण होते. मान्सून कोकणात दाखल झाल्यानंतर लगेचच जिल्ह्याच्या पश्चिम भागात पावसाचे आगमन झाले. शहरात दिवसभर आकाशात काळे ढग जमा झाले होते. दुपारनंतर पावसाची संततधार सुरू झाली. या पावसामुळे नागरिकांची पळापळ झाली. रेनकोट, छत्र्या खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी पाहायला मिळत होती.दरम्यान, कास परिसरातही पावसाने हजेरी लावल्याने शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाची पाणी पातळी वाढू लागली आहे. तलावात सात फुटांपर्यंत पाणी आहे. कास पठार परिसरात पडणाऱ्या पावसात भिजण्याचा आनंद पर्यटकांनी लुटला. महाबळेश्वर परिसरात या पावसामुळे पर्यटकांची संख्या रोडावली. (प्रतिनिधी)
महाबळेश्वरात २४ तासांत ४५ मि.मी. पाऊस
महाराष्ट्राची चेरापुंजी संबोधल्या जाणाऱ्या महाबळेश्वर तालुक्यात बुधवारपासून पावसाला प्रारंभ झाला. गेल्या २४ तासांमध्ये परिसरात ४५ मि.मी. इतक्या पावसाची नोंद झाली, तर गेल्या चार दिवसांमध्ये एकूण १७४.८ मि.मी. इतका पाऊस झाल्याची माहिती हवामान खात्याच्या वतीने देण्यात आली.