सावंतवाडीत २७ पासून मान्सून महोत्सव

By admin | Published: July 17, 2016 11:43 PM2016-07-17T23:43:20+5:302016-07-17T23:48:30+5:30

प्रथमच आयोजन

Monsoon Festival from 27th Sawantwadi | सावंतवाडीत २७ पासून मान्सून महोत्सव

सावंतवाडीत २७ पासून मान्सून महोत्सव

Next

सावंतवाडी : सावंतवाडीत प्रथमच मान्सून महोत्सवाचे आयोजन करण्यात येणार असून यात सावंतवाडी फाऊंडेशन, सावंतवाडी नगरपालिका, क्षितिज इव्हेंट, सुनील राऊळ मित्रमंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने हा महोत्सव २७ ते ३० जुलै या कालावधीत होणार आहे. यावेळी वक्तृत्व, निबंध, पाककला स्पर्धा होणार आहेत, अशी माहिती फाऊंडेशनचे संस्थापक सुनील राऊळ यांनी पत्रकार परिषदेत दिली.
यावेळी फाऊंडेशनचे सुहास सावंत, बाळ पुराणिक, आशुतोष चिटणीस,अ‍ॅड. संतोष सावंत, प्रल्हाद तावडे, संदीप धुरी उपस्थित होते.
महोत्सवातून कोकणातील लोककलांची नव्या पिढीला ओळख व्हावी, यासाठी लोककलांचे सादरीकरण आगळ्यावेगळ्या पध्दतीने करण्यात येणार आहे. २७ जुलैला महोत्सवाचे उद्घाटन सकाळी ११ वाजता येथील मातृछाया मंगल कार्यालयात नगराध्यक्ष बबन साळगावकर यांच्या हस्ते होणार आहे. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून महाराष्ट्र माजी सैनिक संघटना अध्यक्ष पी.एफ़. डान्टस, सभापती प्रमोद सावंत, काँग्रेस तालुकाध्यक्ष संजू परब, सैनिक पतसंस्था चेअरमन शिवराम जोशी उपस्थित राहणार आहेत.
यावेळी गरीब कुटुंबातील मुलांना आर्थिक मदत केली जाणार आहे. २८ जुलै रोजी गवाणकर कॉलेज व पंचायत समिती यांच्या सहकार्यातून दुपारी ३ ते ५ या वेळेत गवाणकर कॉलेजमध्ये पाचवी ते आठवीसाठी वक्तृ त्व स्पर्धा होणार आहे. पहिला गट पाचवी ते सहावीसाठी विषय : माझा सिंधुदुर्ग जिल्हा, दुसरा गट सातवी आठवीसाठी : वृक्षसंवर्धन-काळाची गरज असे विषय दिले आहेत. २९ जुलै रोजी दुपारी ३ ते ५ गवाणकर कॉलेज येथे निबंध स्पर्धा होणार आहे. पहिला गट नववी ते दहावीसाठी कोकणचा पर्यटन विकास व खुल्या गटासाठी पर्यावरण अन् पर्यटन असे विषय आहेत.
निबंधासाठी कागद आयोजक देणार आहेत. दोन्ही स्पर्धेत भाग घेणाऱ्यांनी नावे सैनिक पतसंस्था वैश्य भवन येथे व अ‍ॅड. संतोष सावंत, बाळ पुराणिक, हर्षवर्धन धारणकर यांच्याकडे नोंदवावीत. पहिल्या तीन क्रमांकासाठी अनुक्रमे १००० रूपये, ७०० रूपये व ५०० रूपये अशी बक्षिसे आहेत. ३० जुलै रोजी महोत्सवाचा समारोप सायंकाळी ३ ते ८ या वेळेत येथील बॅ. नाथ पै सभागृहात होणार आहे. यावेळी सांयकाळी ३ ते ४ या वेळेत पावसाळी ऋतुतील भाजीपाल्यावर आधारित पाककला स्पर्धा होणार आहे. यासाठी आशुतोष चिटणीस, हर्षवर्धन धारणकर यांच्याकडे नावे नोंदवावीत. त्यानंतर ५ ते ७ या वेळेत मान्यवरांचा सत्कार, गुणवंत विद्यार्थी गौरव, ७ ते ९ या वेळेत लोककलांचे सादरीकरण होणार आहे. समारोपप्रसंगी नगराध्यक्ष बबन साळगावकर, उपनगराध्यख राजन पोकळे, विक्रांत सावंत, शिक्षण सभापती आत्माराम पालेकर, विशाल परब, प्रा. विजय फातर्पेकर उपस्थित राहणार आहेत. (प्रतिनिधी)
 

 

Web Title: Monsoon Festival from 27th Sawantwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.