सिंधुदुर्गात मान्सूनची दमदार हजेरी
By admin | Published: June 14, 2015 01:50 AM2015-06-14T01:50:39+5:302015-06-14T01:50:40+5:30
समुद्रातही ताशी ५५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे
मालवण : मागील आठवड्यापासून खोळंबलेला मान्सून अखेर शुक्रवारपासून जिल्ह्यात बरसायला सुरुवात झाली आहे. शनिवारी दिवसभरातही सर्वच ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाला. समुद्रातही ताशी ५५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने बंदर विभागाकडून मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, दोन दिवसात झालेल्या पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतीबागायतीच्या कामांना सुरुवात झाली आहे.
गेला आठवडाभर मान्सून हुलकावणी देत होता. शेतकरी आणि आंबा बागायतदारांनाही मशागतीची कामे करावयाची असल्याने दमदार पावसाची प्रतिक्षा होती. मात्र शुक्रवारपासून मालवणात बऱ्यापैकी पावसाच्या सरी कोसळायला सुरुवात झाली आहे. शनिवारी सकाळपर्यंत मागील २४ तासात तालुक्यात ३२ मि.मी. पावसाची नोंद झाली. पावसाच्या सरी दमदार असल्या तरी जोर नसल्यामुळे तालुक्यात कुठेही पडझडीच्या घटनेची नोंद नव्हती.
दोन दिवसांत तालुक्याच्या सर्वच ठिकाणी बऱ्यापैकी पाऊस झाल्यामुळे शेतीबागायतीच्या कामांना वेग आला आहे. शेतकऱ्यांनी नांगरणीच्या कामांना सुरुवात केली आहे. तर आंबा बागायतदारांनी बागायतीच्या मशागतीच्या कामाला सुरुवात केली आहे. दरम्यान, समुद्र खवळलेला असून समुद्रात ताशी ५५ ते ६० किलोमीटर वेगाने वारे वाहणार असल्याने मच्छिमारांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. (प्रतिनिधी)
दोडामार्गात संततधार!
दोडामार्ग तालुक्याला शनिवारी मान्सून पावसाने झोडपून काढले. सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू होती. या पावसाचा फटका साटेली-भेडशी आठवडा बाजाराला बसला. सामानाची आवराआवर करताना व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. शनिवारी कोसळलेल्या पावसामुळे बळीराजा मात्र सुखावला आहे. अधूनमधून दर्शन देणाऱ्या वरुणराजाने शनिवारी सकाळपासूनच धो-धो बरसण्याचा धडाका लावला. तालुक्यात सर्वच ठिकाणी पावसाची रिपरिप सुरू होती. अनेक ठिकाणच्या रस्त्यांवर पावसाचे पाणी साचल्याने तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले होते. साटेली-भेडशी आठवडा बाजारासाठी आलेल्या व्यापाऱ्यांची चांगलीच तारांबळ उडाली. या पावसामुळे मात्र बळीराजा सुखावला असून मशागतीची कामे सुरू झाली.
४८ तासात अतिवृष्टी?
रविवार १४ जूनपासून ४८ तासात जिल्ह्यात अतिवृष्टी होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. त्यानुसार संबंधितांना सतर्क राहण्याच्या सूचना आपत्ती निवारण विभागाकडून देण्यात आल्या आहेत.