मोपा विमानतळाचे काम डिसेंबरपासून सुरू
By admin | Published: February 11, 2015 11:04 PM2015-02-11T23:04:29+5:302015-02-12T00:31:49+5:30
स्थानिकांचा पाठिंबा : गोव्यातील हॉटेल व्यावसायिकांचा विरोध
नीलेश मोरजकर - बांदा -उत्तर आणि दक्षिण गोव्याच्या वादाच्या भोवऱ्यात गेली कित्येक वर्षे रखडलेल्या सिंधुुदुर्ग-गोवा राज्यांच्या सीमेवरील मोपा (गोवा) येथील प्रस्तावित आंतरराष्ट्रीय ग्रीनफिल्ड विमानतळाच्या प्रकल्पावर जनसुनावणीच्या माध्यमातून शिक्कामोर्तब झाल्याने या विमानतळाच्या प्रत्यक्ष कामास डिसेंबर अखेरीस सुरुवात करण्यात येणार आहे.
मोपा विमानतळ प्रकल्पासंदर्भात मोपा पठारावर घेण्यात आलेल्या जनसुनावणीत या परिसरातील तब्बल ९० टक्के स्थानिकांनी या प्रकल्पाला समर्थन दिले. यामुळे हा प्रकल्प उभारणीचा मार्ग मोकळा झाला आहे. भाजप शासनाच्या कालावधीत तत्कालीन मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांनी मोपा विमानतळ प्रकल्प उभारणीचा निर्णय घेतला. या निर्णयाचे उत्तर गोव्यातील जनतेसह सीमाभागातील जनतेने स्वागत केले. तर दक्षिण गोव्यातील आमदार, खासदार चर्चिल आलेमाव यांनी विरोध दर्शविला.
दक्षिण गोव्यातील हॉटेल व्यावसायिकांवर संक्रांत येणार असल्याचे कारण पुढे करत या प्रकल्पाला विरोध करण्यात आला. प्रामुख्याने दक्षिण व उत्तर गोव्याच्या वादात मोपा विमानतळ प्रकल्प रखडला.
उच्चस्तरीय समितीचा सकारात्मक अहवाल
गोव्यातील प्रतापसिंह राणे शासनाच्या कालावधीत मोपा विमानतळ प्रकल्पासाठी उच्चस्तरीय समिती नेमण्यात आली. या समितीने मोपा विमानतळ आवश्यक असल्याचा अहवाल राज्य व केंद्र शासनाकडे सादर केला. त्यानुसार केंद्र शासनाने राज्य शासनाच्या या प्रकल्पासाठी जमीन संपादनाचे आदेश दिल्याने राज्य शासनाने तातडीच्या कलम ६ अन्वये जमीन संपादनाचे निश्चित केले.
४मोपा येथे तीन हजार कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक आंतरराष्ट्रीय ग्रीनफिल्ड विमानतळ उभारण्यात येणार आहे. भौगोलिक स्थितीचा अभ्यास करून हा विमानतळ प्रकल्प दोन टप्प्यात पूर्ण करण्यात येणार आहे.
४पहिल्या टप्प्यात धावपट्टी, टर्मिनल या सुविधा निर्माण करण्यात येणार असून यासाठी १५०० कोटी रुपये खर्च अपेक्षित आहे. दुसऱ्या टप्प्यात कार्गो व इतर सुविधांसाठी हरितपट्टा निर्मिती करण्यात येणार आहे. रात्री व दिवसाच्या ध्वनीस्तरांचा अहवालात समावेश करण्यात आला आहे.
४या प्रकल्पासाठी पेडणे तालुक्यातील मोपा, उगवे, चांदेल, कासारवर्णे, वारखंड या गावांमधील एकूण ७८,४१,७३८ चौरसमीटर जागा संपादित करण्यात आली आहे.
४प्रकल्पबाधितांना सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार गोवा शासनाकडून भरपाई दिली आहे.
४विमानतळाच्या पहिल्या टप्प्याच्या कामास डिसेंबर २०१५ पर्यंत सुरुवात करण्यात येणार आहे. २०१८ पर्यंत पहिल्या टप्प्यातील प्रकल्प कार्यान्वित होणार आहे.
४केंद्र, राज्य शासन व खासगी कंपन्यांच्या सहकार्यातून मोपा येथील हा आंतरराष्ट्रीय विमानतळ प्रकल्प पूर्ण करण्यात येणार आहे.
लोकमत
विशेष-१