ST Strike : एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ सावंतवाडीत मोर्चा, मंत्री परब यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 17, 2021 05:03 PM2021-12-17T17:03:58+5:302021-12-17T17:08:58+5:30
या मोर्चात विद्यार्थी, प्रवासी आणि नागरीकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली
सावंतवाडी : एसटी महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करावे यामागणीसाठी मागील दीड महिन्यापासून एसटी कर्मचाऱ्यांचा संप सुरू आहे. एसटी बंद असल्याने विद्यार्थी, प्रवासी, सामान्य नागरिक यांचे प्रचंड हाल झाले आहेत. त्या पार्श्वभूमीवर शासनाचे लक्ष वेधण्यासाठी आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या समर्थनार्थ येथील तहसील कार्यालयावर आज, शुक्रवारी भव्य मोर्चा काढण्यात आला. यावेळी तहसीलदार राजाराम म्हात्रे यांना आदी. मागण्याचे निवेदन देण्यात आले. सावंतवाडी एसटी डेपो बाजारपेठ ते तहसीलदार कार्यालय पर्यंत हा मोर्चा काढण्यात आला.
तर जिल्ह्यात मनाई आदेश लागू असताना मोर्चा काढल्याप्रकरणी मंगेश तळवणेकर, अँड राजू कासकर, कारीवडे सरपंच अपर्णा तळवणेकर, शिरशिंगे सरपंच रेखा घावरे व आनंद तळवणेकर यांना पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांनी ताब्यात घेऊन सोडून देण्यात आले.
एसटी कर्मचाऱ्यांचा संपामुळे विद्यार्थी, प्रवासी, नागरिक तसेच यावर अवलंबून असणाऱ्या विविध व्यावसायिकांचे प्रचंड नुकसान झाले आहे. परिवहन मंत्री अनिल परब यांनी पगार वाढ केली आहे. तरी त्यांनी अंतरिम शब्द म्हटला आहे. त्यामुळे त्यावर कर्मचाऱ्यांचा विश्वास नाही. प्रचंड महागाई आणि तुटपुंजा पगारामुळे एसटी कर्मचारी आर्थिक कचाट्यात सापडले आहेत. त्यामुळे शासनाने त्यांचा विचार करायला पाहिजे असे मंगेश तळवणेकर म्हणाले.
तर एसटी कर्मचाऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दोन वेळा मोर्चाचे नियोजन केले. मागील वेळी जिल्ह्यात मनाई आदेश झाला आणि आताही मनाई आदेश करण्यात आला याला सर्वस्वी परिवहन मंत्री अँड अनिल परब जबाबदार आहेत, असे त्यांनी सांगून त्यांना जनता माफ करणार नाही असेही ते म्हणाले. नगराध्यक्ष संजु परब यांनीही यावेळी आपले मत व्यक्त केले.
या मोर्चात विद्यार्थी, प्रवासी आणि नागरीकांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. यावेळी परिवहन मंत्री अँड. अनिल परब यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. मोर्चात माजी पंचायत समिती सभापती पंकज पेडणेकर, मनसे परिवहन जिल्हाध्यक्ष राजू कासकर, संतोष भैरवकर, मनसे तालुकाध्यक्ष गुरुदास गवंडे, तालुक्यातील सरपंच, विद्यार्थी सामान्य नागरीक ,एसटी कर्मचारी, मोठ्या संख्येने उपस्थित होते.