अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळेच सिंधुदुर्गात अधिकचे मृत्यू : नारायण राणेंचा आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 16, 2021 02:42 PM2021-06-16T14:42:57+5:302021-06-16T14:49:28+5:30
Narayan Rane Sindhudurg : शासनाच्या हलगर्जीपणामुळे व अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे आतापर्यंत सिंधुदुर्गात तब्बल ८६७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात हॉस्पिटल आहेत; पण डॉक्टर नाहीत, बेड नाहीत, ऑक्सिजन व औषधांचा तुटवडा आहे. दातांचे व त्वचेचे डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. याची राज्य शासनाला लाज कशी वाटत नाही, असा खडा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला.
सावंतवाडी : शासनाच्या हलगर्जीपणामुळे व अपुऱ्या आरोग्य सुविधांमुळे आतापर्यंत सिंधुदुर्गात तब्बल ८६७ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. सध्या जिल्ह्यात हॉस्पिटल आहेत; पण डॉक्टर नाहीत, बेड नाहीत, ऑक्सिजन व औषधांचा तुटवडा आहे. दातांचे व त्वचेचे डॉक्टर कोरोना रुग्णांवर उपचार करीत आहेत. याची राज्य शासनाला लाज कशी वाटत नाही, असा खडा सवाल भाजपचे ज्येष्ठ नेते, माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी केला.
कोलगाव ग्रामपंचायततर्फे तयार करण्यात आलेल्या पं. दीनदयाळ उपाध्याय विलगीकरण कक्षाचे उद्घाटन राणे यांच्या हस्ते झाले. यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजन तेली, जिल्हा परिषदेच्या आरोग्य सभापती डॉ. अनिषा दळवी, जिल्हा परिषद महिला बालकल्याण सभापती शर्वाणी गांवकर, माजी अध्यक्षा रेश्मा सावंत, सभापती निकिता सावंत, भाजपचे जिल्हा चिटणीस महेश सारंग, माजी सभापती मानसी धुरी, पंचायत समिती सदस्या प्राजक्ता केळुसकर, सरपंच संतोष राऊळ, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. वर्षा शिरोडकर, नगरसेवक ॲड. परिमल नाईक, उपसरपंच दिनेश सारंग, आदी उपस्थित होते.
छोट्याशा जिल्ह्यात सध्या ८६७ रुग्णांचा बळी गेला आहे. ही अत्यंत दुःखदायक गोष्ट असून, हे टाळण्यासाठी सर्वांनी सांघिक प्रयत्न करायला हवेत. रुग्णांचा शोध घेऊन त्यांना उपचार देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करायला हवेत, असेही त्यांनी यावेळी सुचवले.
यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन तेली यांनी जिल्ह्यात कोरोनामुळे उद्भवलेल्या भयाण परिस्थितीबाबत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी राज्याच्या मुख्य सचिवांशी तसेच आरोग्य सचिवांशी चर्चा करून जिल्ह्यातील आरोग्य परिस्थितीबाबत प्रत्यक्ष पाहणी करण्याकरिता टास्क फोर्स मागवावे, अशी मागणी राणे यांच्याकडे केली. यावेळी माजी तालुकाध्यक्ष महेश सारंग याच्या कामाचे कौतुक करण्यात आले.
आरोग्य कर्मचारी पुरविण्यासंदर्भात सूचना
राणे म्हणाले, जिल्ह्याची आरोग्यव्यवस्था अत्यंत बिकट आहे. अनेक रुग्णांचे बळी जात आहेत, तर काहीजण अत्यवस्थ आहेत. याबाबत आपलं राज्याच्या आरोग्य सचिवांशी सकाळीच बोलणं झालं. त्यावेळी त्यांच्याशी मी विस्तृत चर्चा करून जिल्ह्यातील रुग्णालयांना फिजिशियन, डॉक्टर, नर्स व इतर आरोग्य कर्मचारी पुरविण्यासंदर्भात सूचना केल्या. त्यानुसार त्यांनी संबंधित वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी त्वरित देण्याचे आश्वासन दिले आहे.