शेतकरी हितापेक्षा अर्थकारणच जास्त
By admin | Published: February 16, 2017 11:32 PM2017-02-16T23:32:22+5:302017-02-16T23:32:22+5:30
जिल्हा परिषद कृषी विभागाचा भोंगळ कारभार : ११00 पैकी केवळ ५६ बंधाऱ्यांचे काम पूर्ण
सिंधुदुर्गनगरी : पाणीटंचाईवर मात होण्याबरोबरच शेतकऱ्यांना दुबार पिके घेता यावीत, रब्बी हंगामाच्या माध्यमातून जास्तीत जास्त क्षेत्र लागवडीखाली यावे हा उद्देश समोर ठेवून प्रशासनाने राज्यशासनाच्या कृषी विभागाला ११०० कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट्य दिले होते. मात्र, यापैकी केवळ ५६ बंधारेच या विभागाने घातले आहेत. या विभागावर खुद्द जिल्हा अधीक्षक कृषी अधिकाऱ्यांचा वचक नसल्याने शेतकऱ्यांसाठी उपयुक्त ठरणाऱ्या बंधाऱ्यांकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले जात असल्याचे बोलले जात आहे. केवळ ५ टक्केच बंधाऱ्यांची पूर्तता होणे ही खेदजनक बाब असून जिल्हाधिकारी उदय चौधरी या वस्तुस्थितीविरोधात कोणती भूमिका घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
सिंधुदुर्गात गेल्या पावसाळी हंगामात जोरदार पाऊस बरसल्याने यावर्षी पाणीटंचाई उद्भवणार नाही अशी समज कित्येकांची झाली. मात्र सद्यस्थिती पाहता जिल्ह्यातील जलाशयांमधील पाणीसाठा कमी-कमी होताना दिसून येत आहे. यावर्षीचा पाऊस हंगाम येण्यासाठी चार महिने बाकी असताना जिल्ह्यातील सद्यस्थितीही समाधानकारक नाही.
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद प्रशासनाने जिल्ह्यातील पाणीटंचाई उद्भवू नये यासाठी ७५०० एवढे कच्चे व वनराई बंधारे बांधण्याचे उद्दिष्ट्य ठेवले होते. त्यानुसार प्रत्येक तालुक्याला उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. तर सामाजिक वनीकरण व जिल्हा अधीक्षक कृषी विभागालाही उद्दिष्ट ठरवून देण्यात आले होते. त्यानुसार कणकवली तालुक्यासाठी दिलेल्या १००० बंधाऱ्यांच्या उद्दिष्टापैकी आतापर्यंत केवळ ६१८ बंधारे पूर्ण झाले आहेत. तर कुडाळ तालुक्यात १००० उद्दिष्टापैकी ७४६ बंधारे, दोडामार्ग ४०० पैकी ३१९, वेंगुर्ले ५०० पैकी ३५१, मालवण १००० पैकी ६१२, देवगड ९०० पैकी ६७३, सावंतवाडी १००० पैकी ५६२, वैभववाडी ४०० पैकी ३२५ तर सामाजिक वनीकरण २०० पैकी ३०, अधीक्षक कृषी अधिकारी ११०० पैकी केवळ ५६ बंधारेच पूर्ण करण्यात आले आहेत. संपूर्ण जिल्ह्यात ७५०० कच्चे व वनराई बंधारे बांधण्याच्या उद्दिष्ट्यापैकी ४२९२ बंधारे बांधून ५७.२३ टक्के उद्दिष्ट्य आतापर्यंत साध्य झाले आहे. तर गतवर्षी १५ फेब्रुवारीपर्यंत ७५०० उद्दिष्ट्यापैकी ५५७० एवढे बंधारे पूर्ण करून ७४ टक्के उद्दिष्ट्य साध्य करण्यात आले होते.
जिल्हा परिषद प्रशासनाकडून पाणीटंचाईवर मात करण्यासाठी बंधारे बांधण्याचे नियोजन करण्यात आले होते. मात्र, डिसेंबर अखेरपर्यंत या मोहिमेला काही विभाग व तालुक्यातून प्रतिसादच मिळाला नाही. अल्प प्रमाणात बंधारे बांधण्यात आले. यानंतर जानेवारीपासून बहुतेक नदीनाल्यांचे पाणी कमी होते. पाण्याचा प्रवाह बंद होतो. त्यानंतर बांधण्यात येणाऱ्या बंधाऱ्यांमध्ये पुरेशा प्रमाणात पाण्याचा साठा होत नाही. मात्र सिंधुदुर्गात केवळ उद्दिष्ट्य पूर्ततेसाठी जानेवारीनंतर बंधारे बांधण्याचे काम प्रशासनाकडून पूर्ण केले जाते. जिल्ह्यातील कृषीक्षेत्रात प्रगती साधने, जास्तीत जास्त पडीक जमीन ओलिताखाली आणणे ही जबाबदारी असलेल्या अधीक्षक कृषी विभागाच्या कारभाराबाबत नाराजी व्यक्त होत आहे. (प्रतिनिधी)
जिल्हाधिकाऱ्यांच्या भूमिकेकडे लक्ष
४११०० उद्दिष्टापैकी डिसेंबर अखेर या विभागाने भोपळाही फोडला नव्हता. त्यानंतर केवळ ५६ बंधारे बांधण्याचे सोपस्कार कागदोपत्री दाखविले आहेत. त्यामुळे आर्थिक बजेटच्या कामात लक्ष आणि लोकसहभागाच्या कामात सोईस्कर दुर्लक्ष करणाऱ्या कार्यपद्धतीबाबत जिल्हाधिकारी उदय चौधरी यांच्या भूमिकेकडे लक्ष लागून राहिले आहे.