शिवरामभाऊंना जास्त त्रास व्हिक्टर डॉन्टस यांचाच
By admin | Published: April 27, 2015 10:40 PM2015-04-27T22:40:25+5:302015-04-28T00:20:35+5:30
राजन तेलींचा पलटवार : प्रदीप ढोलमना उमेदवारी का नाही?
सावंतवाडी : शिवरामभाऊ जाधव यांना काँग्रेस नेते नारायण राणे यांच्यापेक्षा व्हिक्टर डॉन्टस यांनीच जास्त त्रास दिला. त्यांच्यामुळेच ते राजीनामा देण्याच्या पवित्र्यात होते, असा पलटवार माजी आमदार राजन तेली यांनी केला. निवडून येण्यापूर्वी दोन अध्यक्ष, चेअरमन आणि व्हाईस चेअरमनची गणिते घालत आहेत, त्यांनी डी. बी. ढोलम यांना गरजेपुरते घेतले. आता त्यांच्या मुलाला उमेदवारी दिली नाही, अशी टीकाही तेली यांनी यावेळी केली.ते सावंतवाडीत पत्रकारांशी बोलत होते. यावेळी काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्ष अतुल काळसेकर, राजू राऊळ, आनंद नेवगी आदी उपस्थित होते.यावेळी बोलताना राजन तेली म्हणाले, जिल्हा बँक निवडणूक आम्हाला निकोप वातावरणात लढवायची आहे. बँकेचा कारभार आम्ही शेवटच्या काळात केला. त्याचे चांगले निकाल बघायला मिळत आहेत. मी अध्यक्षपदावरून उतरल्यानंतर इतरांना काही साध्य करता आले नाही. एकही नवीन योजना तयार करता आली नाही. यावरूनच काय ते ओळखावे, अशी टीकाही यावेळी त्यांनी केली. सहकार वैभव पॅनेलचा या निवडणुकीत मोठ्या मतांनी विजय होईल, याची मला खात्री आहे.शिवरामभाऊंना मी जास्त त्रास दिल्याचा आरोप काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस करीत आहेत. पण, शिवरामभाऊ व डी. बी. ढोलम आज असते, तर त्यांनी या आघाडीला केव्हाच थारा दिला नसता. शिवरामभाऊंना मी त्रास दिल्याचे डॉन्टस सांगत आहेत. पण ते अंतर्गत राजकारणाला चांगलेच कटाळले होते. एवढी वर्षे सत्तते राहूनही हातून सत्ता गेली, याचे त्यांना दु:ख होते. यामध्ये डॉन्टस यांनी इतरांशी संधान बांधल्यानेच असे झाल्याचे ते सांगत असत आणि त्यामुळेच त्यांनी खऱ्या अर्थाने राजीनामा देऊ केला होता. तो काँग्रेस नेते नारायण राणे यांच्यामुळे नाही, तर डॉन्टस यांनीच त्यांना अधिक त्रास दिल्याने दिला होता, असा आरोपही त्यांनी यावेळी बोलताना केला.कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष सतीश सावंत व राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष व्हिक्टर डॉन्टस हे निवडून येण्यापूर्वीच अध्यक्ष आणि उपाध्यक्षपदाची गणिते घालत आहेत. त्यांनी डी. बी. ढोलम यांच्या मुलाला उमेदवारीही नाकारली. त्यातच सर्व काही दिसून येते. मग आपल्या विजयाचे आडाखे कोण बांधत आहेत, हेही त्यावरून दिसून येते, असेही यावेळी तेली यांनी सांगितले. (प्रतिनिधी)
हिंमत असेल तर राजीनामा घ्याच
काँग्रेस नेते सतीश सावंत हे राजीनामा घेण्याच्या धमक्या देतात. मात्र, राजीनामा कधीही घेत नाहीत. हिंमत असेल तर त्यांनी सावंतवाडीचे उपसभापती महेश सारंग व सदस्य बबन राणे यांचा राजीनामा घेऊनच दाखवावा, नुसत्या धमक्या देऊ नयेत, असे खुले आव्हान माजी आमदार राजन तेली यांनी यावेळी दिले आहे.
राजन तेली म्हणाले...
जिल्हा बँक निवडणूक आम्हाला निकोप वातावरणात लढवायची आहे.
बँकेचा कारभार आम्ही शेवटच्या काळात केला. त्याचे चांगले निकाल बघायला मिळत आहेत.
अध्यक्षपदावरून उतरल्यानंतर काही साध्य करता आले नाही.
शिवरामभाऊ, ढोलम आज असते तर आघाडीला थारा दिला नसता.