सर्वाधिक पसंती गणपतीपुळेलाच...
By admin | Published: June 5, 2015 11:47 PM2015-06-05T23:47:31+5:302015-06-06T00:24:21+5:30
गणपती पावला : लाखोंची उलाढाल, भाविकांसह पर्यटकांची मांदियाळी...
संजय रामाणी - गणपतीपुळे--रत्नागिरी तालुक्यातील श्री क्षेत्र गणपतीपुळे हे जागतिक दर्जाचे धार्मिक व पर्यटनस्थळ आहे. येथील उन्हाळी पर्यटक हंगामाला भक्त व पर्यटकांकडून यावर्षी चांगला प्रतिसाद मिळाला आहे. यंदा या हंगामातून दिवसाला लाखो रुपयांची उलाढाल होत असून, कोकणातील सर्वाधिक पसंती याच पर्यटनस्थळाला मिळाली असल्याचे समोर आले आहे.
श्री क्षेत्र गणपतीपुळेमध्ये भक्त व पर्यटकांच्या संख्येत दरवर्षी वाढ होत असून, येथील सुरु असलेल्या उन्हाळी पर्यटक हंगामाला भरभरुन प्रतिसाद मिळाला आहे.
भक्तांना श्रींचे व्यवस्थित दर्शन व्हावे, यासाठी श्रीक्षेत्र गणपतीपुळे संस्थान श्रीदेव गणपतीपुळेतर्फे दर्शन रांगेची व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच दर्शन रांगेमधून जाणाऱ्या प्रत्येकाची मेटल डिटेक्टर तपासणी करण्यात येते. लाडू प्रसाद, दुपारी १२ ते २ खिचडी प्रसाद, सायंकाळी ७ ते ८ यावेळेत पुलाव प्रसाद वाटप करण्यात येतो.
संस्थान श्रीदेव गणपतीपुळेच्या वतीने बांधण्यात आलेले नूतन भक्त निवास मंदिरापासून सुमारे दीड किलोमीटर लांब असून, भगवतीनगर गावामध्ये राजवाडी या ठिकाणी भव्य भक्त निवास उभारण्यात आले आहे. येथील भक्त निवासात सध्या ७२ खोल्या व ११ हॉल्स देण्यात येत असून, हे भक्त निवास नेहमी फुल्ल असते.
याचा परिणाम गणपतीपुळे परिसरातील लॉजिंग व्यवसायावर झाला असून, गणपतीपुळे व परिसरातील लॉजिंग दरामध्ये घसरण झाल्याचे दिसून येते. मात्र, याचा लाभ भक्त पर्यटकांना मिळत असून, अल्प दरात पर्यटकांना खोल्या उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच भक्त निवासामुळे येथील पर्यटकांची गर्दी विस्थापित झालेली दिसून येत आहे.
वातानुकुलीत खोल्यांना जास्त पसंती सर्वाधित पसंती दर्शवली जात आहे.
उन्हाळी पर्यटक हंगाम सुरु असून, ेयेथील वातावरण दमट व उष्ण असल्याने उन्हाळा मोठ्या प्रमाणात जाणवतो. त्यामुळे येथे आलेला भक्त पर्यटक गरमीने हैराण होऊन जातो. त्यामुळे थोडे जास्त पैसे देवून वातानुकुलीत खोलीमध्ये राहाणे पसंत करतात.
उन्हाळी हंगामात बिगर वातानुकुलीत खोल्यांच्या आरक्षणात मोठ्या प्रमाणात घट झालेली दिसून येत होती. पर्यटकांकडून वातानुकुलीत खोल्यांची मागणी वाढत आहे. त्यामुळे पर्यटक निवासामध्ये वातानुकुलीत खोल्यांचा दर ३००० ते ५००० पर्यंत होता, तर हॉटेल, लॉजिंग तसेच रिसॉर्टमध्ये १२०० ते १५०० रुपयांपर्यंत दर आकारण्यात येत आहेत.
गणपतीपुळे परिसरातील हॉटेल्स व लॉजिंग व्यवसाय तेजीत असून, त्यामुळे ४०० ते ५००च्या पुढे घरगुती खोल्या देण्यात येतात. इतर ठिकाणी १००० ते १२०० रुपये दर आकारण्यात येतो. सुमारे १५ जूनपर्यंत पर्यटन हंगाम चालेल, असे व्यावसायिकांचे म्हणणे आहे.
श्रीक्षेत्र गणपतीपुळे येथे पार्किंगचा प्रश्न दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामपंचायत गणपतीपुळेच्यावतीने एकदिशा मार्ग केला असून, रस्त्याच्या दुतर्फा होणाऱ्या गाड्या पार्किंगमुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, वेळोवेळी पर्यटकांमध्ये आपापसात खटके उडताना दिसून येत आहेत. तसेच एकदिशा मार्ग ग्रामपंचायतीने चुकीच्या दिशेने केला असल्याने काही ग्रामस्थ व पर्यटकांचे म्हणणे आहे. हा मार्ग काही व्यावसायिकांनी स्वार्थासाठी एकदिशा केला असल्याचे ज्येष्ठ ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
सध्या समुद्र चौपाटीवरील व्यवसाय तेजीत सुरू आहे. गणपतीपुळेत येणारे पर्यटक दर्शनाबरोबरच समुद्राचा आनंद घेतल्याशिवाय राहात नाहीत. समुद्रस्नानाबरोबरच चौपाटीवर खेळण्याचा आनंद काही वेगळाच असतो. येथील नारळपाणी, सरबत, भेळपुरी, एका मिनिटात फोटो, घोडगाडी, उंट सफर, वॉटर स्पोर्ट, बर्फगोळा, समुद्र चौपाटीवर फेरफटका मारण्यासाठी मोटारगाडी आदी व्यवसाय तेजीत आहेत. सकाळी ७ वाजल्यापासून सायंकाळी अंधार पडेपर्यंत व्यवसाय तेजीत सुरू आहे. रात्री हायमॅक्स लावल्याने पर्यटक विद्युत रोषणाईत समुद्र चौपाटीवर फिरण्याचा आनंद घेता येत आहेत.
कोकणी मेव्याची खरेदी जोरात सुरू आहे. कोकणचा मेवा पर्यटकांना मिळावा, यासाठी गणपतीपुळे व परिसरातून विविध कोकणी उत्पादनांची विक्री केली जात असते. यामध्ये आंबे, काजू, फणस, करवंद, कोकम, आंबापोळी, फणसपोळी, आवळा सुपारी आदी विविध पदार्थ व वस्तू पर्यटकांना अल्पदरात उपलब्ध होत आहेत.
गणपतीपुळे व परिसर दर्शनाने मन प्रफुल्लीत होते. भक्त पर्यटकांना गणपतीपुळे व परिसर दर्शन करण्यासाठी ट्रॅव्हल्स उपलब्ध करुन दिल्या आहेत. यामध्ये रत्नागिरी, पावस, गणपतीपुळे दर्शनासाठी प्रत्येकी ३०० रुपये यामध्ये सकाळी ९ वाजता बस सुटून सर्व पर्यटकांना संबंधित हॉटेलवरुन घेऊन संपूर्ण दिवसभर पर्यटनस्थळे दाखवून संध्याकाळी ६ वाजता पुन्हा हॉटेलवर सोडण्यात येतात. तसेच जयगड, मार्लेश्वर, मालगुंड, हेदवी, वेळणेश्वर आदी विविध पॅकेजेस ठेवण्यात आली आहेत. त्यासाठी विविध कार व अन्य लक्झरी वाहनांची व्यवस्था करण्यात आली आहे. यामुळे ट्रॅव्हल्स व्यवसाय तेजीत असल्याचे दिसून येतात.
त्यामुळे येथील पर्यटक व्यावसायिकांच्या म्हणण्यानुसार यावेळचा पर्यटक हंगाम तेजीत आहे.
भक्त निवासाला उत्तम प्रतिसाद मिळाला असला तरी २ किंवा ३ दिवस राहणारे भक्त पर्यटक भक्त निवासामध्ये न राहता खासगी निवास व्यवस्थेत राहणे पसंत करतात. कारण या ठिकाणी जाण्या-येण्यासाठी रिक्षा किंवा इतर वाहनाचा वापर करावा लागतो. त्यामुळे राहण्यापेक्षा जाण्या-येण्यासाठी जास्त पैसे मोजावे लागतात. तसेच समुद्र लांब असल्याने समुद्रामध्ये आंघोळ केल्यावर ओलेत्याने भक्त निवासापर्यंत जाणे अवघड होत असल्याने दुसऱ्या व तिसऱ्या दिवशीच्या मुक्कामाकरिता खासगी लॉजिंगचा वापर केला जातो. तेथे जेवण व नाश्ता मिळत नसल्याने त्यासाठी गणपतीपुळे येथे यावे लागत असल्याने भक्त व पर्यटकांना त्रासाचे होत आहे. गणपतीपुळेला बसने आलेला भक्त पर्यटक सहसा भक्त निवासामध्ये जात नाही. कारण जाण्या-येण्यासाठी लागणारे रिक्षाभाडे व होणाऱ्या त्रासापेक्षा मंदिर परिसरातच थोडे जास्त पैसे देऊन राहणे पसंत करतो.