खारेपाटणमध्ये विजेच्या धक्क्याने आई, मुलगा ठार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 2, 2018 11:05 PM2018-08-02T23:05:29+5:302018-08-02T23:05:45+5:30
खारेपाटण : येथील हसोळटेंब कोंडवाडी येथे घरासमोरील अंगणात कपडे वाळत घालत असताना विद्युतभारित तारेला स्पर्श झाल्याने आई व मुलाचा मृत्यू झाला. भाग्यश्री बाळकृष्ण शिंदे (वय ६०) व संजय बाळकृष्ण शिंदे (३५) अशी त्यांची नावे आहेत. ही घटना गुरुवारी दुपारी १२ वाजता घडली.
खारेपाटण गटविकास सेवा सोसायटीत बाळकृष्ण शंकर शिंदे हे लिपिक म्हणून कार्यरत आहेत. त्यांची पत्नी भाग्यश्री शिंदे या गुरुवारी सकाळी अंगणात बांधण्यात आलेल्या तारेवर धुतलेले कपडे वाळत घालण्यासाठी गेल्या. त्या तारेला घरातून आलेल्या विद्युतवाहिनीचा स्पर्श झाला असल्याने त्यांना जोरदार विजेचा धक्का लागला व त्या जमिनीवर कोसळल्या. आई जमिनीवर पडल्याचा आवाज येताच त्यांचा मुलगा संजय शिंदे हा घराबाहेर धावत आला. त्याने आईला वाचविण्याचा प्रयत्न केला. या प्रयत्नात त्यालाही या तारेचा स्पर्श झाल्याने जोरदार धक्का बसला. त्यामुळे दोघेही बेशुद्ध पडले.
हसोळटेंब कोंडवाडी येथील काही ग्रामस्थांंनी खारेपाटणचे सरपंच रमाकांत राऊत यांना यांची कल्पना दिली. त्यांनी पोलिसांना कळविले. बेशुद्धावस्थेतील आई व मुलाला तातडीने येथील खारेपाटण प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी नेण्यात आले. तेथील वैद्यकीय अधिकारी डॉ. जितेंद्र मंडावरे यांनी दोघांनाही तपासून मृत घोषित केले.
संजय हा साध्या राहणीमानाचा, प्रेमळ स्वभावाचा होता. घरातील तसेच शेतातील कामे तो करीत असे. तो अविवाहित होता.
या घटनेची माहिती मिळताच खारेपाटण पोलीस दूरक्षेत्राचे हवालदार पांडुरंग राऊत यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. तसेच वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती दिली. महाराष्ट्र राज्य विद्युत पारेषण कंपनी खारेपाटण कार्यालयाचे सहायक कनिष्ठ अभियंता किशोर मर्ढेकर यांनीही घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्यांनी इलेक्ट्रिक इन्स्पेक्टर सबनीस (ओेरोस) यांना अपघाताची माहिती दिली. वीज वितरणच्यावतीने या घटनेचे पंचनामे वरिष्ठ अधिकारी आज, शुक्रवारी येऊन करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
आक्रोश काळीज हेलावणारा
घटना घडली त्यावेळी बाळकृष्ण शिंदे हे कामानिमित्त बाहेर गेले होते. तसेच संजय शिंदे यांचे भाऊ सचिन शिंदे हेदेखील घरात नव्हते. आपली आई व भाऊ यांचा अपघाती मृत्यू झाल्यामुळे सचिन यांनी तसेच आपली पत्नी व मुलगा गेल्याने बाळकृष्ण यांनी केलेला आक्रोश सर्वांचे काळीज हेलावणारा होता.