‘आई, तुझा अवमान करणाऱ्यांना बाहेर काढ!’
By admin | Published: June 19, 2017 12:53 AM2017-06-19T00:53:28+5:302017-06-19T00:53:28+5:30
‘अंबाबाई’ला सर्वपक्षीय भक्तांकडून साकडे : उदं गं आई उदं, शाहू महाराजांचा जयजयकार; महिलांचाही मोठा सहभाग
लोकमत न्यूज नेटवर्क
कोल्हापूर : ‘करवीरनिवासिनी अंबाबाईस चोली-घागरा नेसविणाऱ्या व राजर्षी शाहू महाराजांचा अवमान करणाऱ्या पुजाऱ्यांना मंदिरातून बाहेर काढ व त्यांना सुबुद्धी दे,’ असे साकडे आंदोलन शेकडो सर्वपक्षीय भक्तांनी रविवारी सकाळी अंबाबाई मंदिरात केले. यावेळी मंदिराच्या गाभाऱ्यात सोवळे नेसून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘स्वाभिमान’च्या सचिन तोडकरसह पाचजणांना पोलिसांनी रोखले. यादरम्यान आंदोलकांनी मंदिरात जोरदार घोषणाबाजी केली.
अंबाबाई देवीला मागील शुक्रवारी पुजारी बाबूराव ठाणेकर व अजित ठाणेकर यांनी पारंपरिक काठा-पदराची साडी न नेसविता भाविकाने दिलेला चोली-घागरा नेसविला. या वादाचे पर्यवसान शनिवारी (दि. १७) जनप्रक्षोभात झाले. त्यात श्रीपूजकांनी मूर्तीच्या मूळ स्वरूपाशी छेडछाड आणि ‘तथाकथित’ भाषेत राजर्षी शाहू महाराजांच्या वटहुकुमाचेही अवमान केला. याविरोधात आंदोलन म्हणून कोल्हापुरातील सर्वपक्षीय संघटनांमधील भक्त रविवारी सकाळी दहा वाजता जुना राजवाडा पोलीस ठाण्यासमोर एकत्रित आले. यावेळी महिला अग्रभागी होत्या. पावणेअकरा वाजण्याच्या सुमारास सर्व भक्तांनी एकत्रितरीत्या मंदिरात जाऊन ‘आई, तुझा अवमान करणाऱ्या पुजाऱ्यांना बाहेर काढ व राजर्षी शाहू महाराजांचा अवमान करणाऱ्यांना सुबुद्धी दे,’ असे म्हणत देवीपुढे साकडे घातले.
‘अंबाबाई’पुढे प्रेशर चालत नाही!
यावेळी राष्ट्रवादीचे शहर अध्यक्ष राजू लाटकर म्हणाले, गेले कित्येक दिवस हा प्रकार घडूनसुद्धा पोलीस प्रशासनाने अवमान करणाऱ्या पुजाऱ्यांवर कारवाई केलेली नाही. कारवाई करू नये म्हणून मंत्री, राजकारणी लोकांचे प्रेशर आहे का? असेल तर असे प्रेशर अंबाबाईपुढे चालत नाही. अजून प्रशासनाने जागे व्हावे. जनप्रक्षोभ झाल्यास त्याला प्रशासन जबाबदार राहील.
तसे यांना बाहेर काढा
माजी आमदार सुरेश साळोखे म्हणाले, ‘जसे पंढरपुरातील विठ्ठल-रखुमाईचे पुजारी असणाऱ्या बडव्यांना सरकारने बाहेर काढले, तसे आई अंबाबाईच्या गाभाऱ्यात ठाण मांडून बसलेल्यांना बाहेर काढा.
या आंदोलनात शिवसेनेचे जिल्हाप्रमुख विजय देवणे, ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई, ‘प्रजासत्ताक’चे दिलीप देसाई, माजी आमदार सुरेश साळोखे, सुजित चव्हाण, दुर्गेश लिंग्रस, माजी महापौर आर. के. पोवार, माजी नगरसेवक बाबा पार्टे, राजू लाटकर, मराठा महासंघाचे वसंतराव मुळीक, इतिहास संशोधक इंद्रजित सावंत,शरद तांबट, हर्षल सुर्वे, स्वप्निल पार्टे, अवधूत साळोखे, सुहास साळोखे, मराठा सेवा संघाचे चंद्रकांत पाटील, साताप्पा शिंगे, राजू यादव, महादेव पाटील, शिवाजी मुस्लिम ब्रिगेडचे फिरोज खान उस्ताद, आदी उपस्थित होते.