वळीवंडे येथे आरोग्य मंत्र्यांच्या घरासमोर १४ जानेवारीला आंदोलन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2016 11:22 PM2016-01-10T23:22:52+5:302016-01-11T00:42:38+5:30
काँग्रेसचा इशारा : कावले कुटुंबीयांना न्याय मिळालाच पाहिजे
देवगड : राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी सुरूवातीला आरोग्य यंत्रणेच्या संदर्भात अनेक घोषणा केल्या पण त्यातील कोणतीही आश्वासने ते पूर्ण करू शकले नाहीत. याउलट पूर्वी होती त्यापेक्षा देवगडातील आरोग्य यंत्रणा अधिकच अधोगतीला गेली आहे, अशी टीका जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस बाळ खडपे यांनी केली. तसेच स्थगित झालेले आंदोलन १४ जानेवारी रोजी सकाळी ११ वाजता आमदार नीतेश राणे यांच्या नेतृत्वाखाली वळीवंडे येथील आरोग्यमंत्री डॉ. दीपक सावंत यांच्या घरासमोर होणार असल्याचे खडपे यांनी यावेळी सांगितले.
सर्वसामान्य माणूस आज सरकारी आरोग्य यंत्रणेवर पूर्णपणे नाराज, नाखूश आहे. सरकारी आरोग्य यंत्रणेतील कमरतेमुळे नाईलाजाने आता त्याला अधिक खर्चिक अशा खासगी आरोग्य यंत्रणेकडे वळावे लागत आहे. याचा फार मोठा मानसिक, शारीरिक, आर्थिक त्रास आज सर्वसामान्य माणसाला भोगावा लागतो आहे. तज्ज्ञ डॉक्टरांची कमतरता असल्याने अनेक प्रसंगी प्रसुतीसाठीसुद्धा गोव्यापर्यंत धावावे लागल्याची उदाहरणे आहेत. राज्याचे आरोग्यमंत्री या जिल्ह्यातील असूनही या समस्येवर इलाज करण्यात ते अयशस्वी झाले आहेत.
देवगड ग्रामीण रूग्णालयात संदीप कावले यांना चुकीच्या उपचारामुळे जीव गमवावा लागला. त्या संदर्भात जिल्हा शल्यचिकित्सक यांनी संबंधित डॉक्टरांना निलंबित करण्याची कारवाईही केली. पण त्यानंतर चौकशी समिती प्रमुख डॉ. सतीश पवार यांनी पूर्णपणे चुकीच्या पद्धतीने संबंधित डॉक्टरांना पाठीशी घालण्याचा प्रकार केला. मृत तरूण एक सर्वसामान्य रिक्षाचालक होता. त्याच्यावर सर्व कुटुंब अवलंबून होते. कावले यांच्या कुटुंबाला न्याय मिळालाच पाहिजे. नुकसान भरपाई व मृताच्या पत्नीला कायमस्वरूपी नोकरी सरकार देत नसेल तर काँग्रेसपक्ष त्या गरीब कुटुंबाला न्याय मिळेपर्यंत रस्त्यावर उतरून संघर्ष करणार असल्याचे बाळ खडपे यांनी
सांगितले. (प्रतिनिधी)