‘धावण्यासाठी’ डॉक्टरांची चळवळ

By Admin | Published: February 10, 2017 10:40 PM2017-02-10T22:40:01+5:302017-02-10T22:43:47+5:30

सदृढ आरोग्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे, असा सल्ला देणारे डॉक्टर हेही आपल्या जीवनात व्यायामाला सर्वात जास्त महत्त्व देत आहेत.

The movement of doctors to 'run' | ‘धावण्यासाठी’ डॉक्टरांची चळवळ

‘धावण्यासाठी’ डॉक्टरांची चळवळ

googlenewsNext

- रजनीकांत कदम/ऑनलाइन लोकमत

कुडाळ, दि. 10 - सदृढ आरोग्यासाठी व्यायाम करणे आवश्यक आहे, असा सल्ला देणारे डॉक्टर हेही आपल्या जीवनात व्यायामाला सर्वात जास्त महत्त्व देत आहेत. धावणे हा सुंदर व्यायाम असून याबाबत प्रचार, प्रसार व जनजागृती करण्याकरिता कार्यरत असणारे काही डॉक्टर आपले आरोग्य चांगले रहावे, याकरिता दररोज पहाटे नियमित धावतात. ही धावण्याची चळवळ मोठ्या प्रमाणात वाढत असून, १२ फेबु्रवारी रोजी पहाटे कणकवली येथे जिल्ह्यातील ८० डॉक्टर धावणार आहेत.
खरे पाहता धावणे हा विषय आपल्याला सहज व फार लहान विषय वाटून जातो. मात्र, ‘धावणे’ या तीन अक्षरात आरोग्य चांगले ठेवण्याची मोठी ताकद आहे, हे या डॉक्टरांच्या चळवळीने दाखवून दिले आहे. खरे पाहता त्यांची ही चळवळ प्रसिध्दीपासून दूरच राहिली. पण या चांगल्या चळवळीचा प्रचार व प्रसार होणेही गरज असून, त्यासाठी केलेला हा प्रयत्न. प्रत्येक डॉक्टर आपले आरोग्य चांगले राहण्यासाठी सकस आहार घ्या, नियमित व्यायाम करा असा सल्ला देत असतात. आपल्याला सल्ला देणारे हे डॉक्टर आपल्या व्यस्त अशा दिनक्रमातून स्वत: कधी व्यायाम करत असतील, असा प्रश्न आपल्याला नेहमी पडतो. या प्रश्नाच्या आधारे जिल्ह्यातील काही डॉक्टरांकडे याबाबत माहिती घेतली असता, जिल्ह्यातील बहुतांश डॉक्टर हे नियमित व्यायाम करतात. आता यामध्ये पाहिले असता, सर्वात महत्त्वाचे म्हणजे, गेल्या सात वर्षांपासून काही डॉक्टरांनी व्यायामाच्या दृष्टीकोनातून धावणे हा व्यायाम प्रकार सुरू केला. बघता बघता आता या धावणे व्यायाम प्रकाराला जिल्ह्यातील डॉक्टर पसंती देत आहेत. ही चळवळ फक्त डॉक्टरांपुरती मर्यादित न राहता त्यांच्या कुटुंबियांपर्यंत पोहोचली आहे. या धावण्यामध्ये डॉक्टरांचे कुटुंबियही मोठ्या प्रमाणात उत्साहात सहभागी होत आहेत. गेल्या तीन वर्षात या धावण्याच्या चळवळीत सहभागी झालेल्या डॉक्टरांची तालुकावार संख्या पाहता माहिती मिळते की, कुडाळ-सावंतवाडी येथील ६७, वेंगुर्ले-३५, कणकवली-७०, मालवण-३२, देवगड-३५ तसेच इतर तालुक्यातील या सरासरीत आकडेवारी आहे. दरवर्षी ही आकडेवारी वाढतच जात आहे. १२ फेब्रुवारी रोजी पहाटे कणकवली येथील रेल्वे स्टेशन रोड ते मुडेश्वर मैदान व तेवढेच अंतर परत असे अंतर जिल्ह्यातील ७० ते ८० डॉक्टर धावणार आहेत. धावणे हाच व्यायाम प्रकार का निवडला, असे एका डॉक्टरांना विचारले असता, धावणे हा व्यायाम प्रकार सहज शक्य आहे.
विशेष म्हणजे धावण्यासाठी विशेष साहित्य, मैदान व इतर खेळाला अथवा व्यायाम प्रकाराला साहित्य लागते तसे कोणतेही साहित्य याला लागत नाही. त्यामुळे धावणे सहज शक्य होते. सात वर्षांपूर्वी जिल्ह्यातील काही डॉक्टरांनी धावणे हा प्रकार सुरू केला. त्यानंतर याचा प्रचार, प्रसार झपाट्याने वाढत गेला असून, याचा परिणाम म्हणून काही डॉक्टर तर आता २१ किलोमीटर म्हणजे हाफ मॅरेथॉनचे अंतर दररोज पूर्ण करीत आहेत.

Web Title: The movement of doctors to 'run'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.