गोव्यात विलिनीकरणासाठी दोडामार्ग तालुक्यात चळवळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2019 05:54 PM2019-10-30T17:54:41+5:302019-10-30T17:55:32+5:30
युवक आक्रमक : महाराष्ट्र सरकारने सापत्नभावाची वागणूक दिल्याची भावना
सचिन खुटवळकर/पणजी : गोव्याच्या डिचोली तालुक्याला लागून असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यातील युवक-युवतींनी हा संपूर्ण तालुका गोव्यात विलीन करावा, यासाठी मोठी चळवळ सुरू केली आहे. तालुका निर्मिती होऊन २0 वर्षे झाली, तरी आरोग्य, रोजगार, उद्योग-व्यवसाय, पर्यटन सुविधा आदींबाबत महाराष्ट्र सरकारने सापत्नभावाची वागणूक दिल्याची तेथील युवकांची भावना बनली आहे.
आरोग्य व रोजगाराच्या बाबतीत पूर्णत: गोव्यावर अवलंबून असलेल्या दोडामार्गमधील युवकांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या काळात तालुका गोव्यात विलीन करण्याच्या मागणीसाठी गंभीरपणे पावले उचलण्यास सुरुवात केली. याचाच एक भाग म्हणून ‘दोडामार्ग तालुका गोव्यात विलिनीकरण’ असा व्हॉट्सअॅप ग्रुप बनवून सोशल मीडियावर जोरदार मोहीम उघडण्यात आली. विशेष म्हणजे लिंकच्या आधारे जोडल्या जाणा-या या ग्रुपला इतका प्रतिसाद मिळाला की, काही तासांतच एक ग्रुप फुल्ल झाला. नंतर दुसरा ग्रुप बनविण्यात आला. असे आणखी काही ग्रुप तयार केले असून याद्वारे तालुक्यातील हजारो युवक या मोहिमेशी जोडले गेले आहेत, असे साटेली-भेडशी येथील वैभव इनामदार यांनी सांगितले.
आरोग्याच्या बाबतीत हा तालुका अत्यंत मागास असून रुग्णांना गोव्यातील इस्पितळांचाच आधार आहे. गेल्या २0 वर्षांत तालुक्यातील आरोग्य सुविधा अद्ययावत करण्याबाबत लोकप्रतिनिधींनी कसल्याच हालचाली केल्या नाहीत. मध्यंतरी गोवा सरकारने महाराष्ट्रातील रुग्णांना शुल्क सक्ती केल्यानंतर ‘आरोग्याचा जनआक्रोश’ हे आंदोलन लोकांना करावे लागले. त्यानंतर महाराष्ट्राच्या मंत्र्यांनी गोव्याशी बोलणी करून तोडगा काढला, असे इनामदार म्हणाले.
सध्या दिवाळी असल्याने एक आठवड्यानंतर तालुक्यातील युवकांची एक मोठी सभा दोडामार्ग येथे आयोजित करण्यात येईल. त्यानंतर गावागावांत बैठका घेऊन गोव्यात विलिनीकरणाबाबत जागृती करण्यात येईल. पहिल्या टप्प्यात युवक-युवतींची मते जाणून घेण्यात येतील. त्यानंतर गावोगावी फिरून अन्य घटकांनाही भूमिका पटवून देण्यात येईल. आधी तालुक्यात पुरेशी जागृती केल्यानंतर मग गोव्यातील पक्ष, संघटना आदींना विश्वासात घेण्यात येईल.
- वैभव इनामदार, साटेली-भेडशी
महाराष्ट्र राज्य आमच्यासाठी केवळ रेशनकार्ड व निवडणूक ओळखपत्रापुरते मर्यादित आहे. इथल्या युवकांचे, लोकांचे मूलभूत प्रश्न सोडविण्यात सरकारला मुळीच स्वारस्य नाही. आमचे अस्तित्व केवळ मतदानापुरते गृहीत धरण्यात येते. नंतरची पाच वर्षे ९0 टक्के जनतेला सरकारी यंत्रणा गोव्याच्या भरवशावर सोडून देते. तालुक्यातील ८0 टक्के युवक गोव्यात रोजगारासाठी जातात. इतर युवक व्यवसाय, शेती-बागायती वगैरे करून आपला चरितार्थ चालवितात. आमच्या गरजा गोवा राज्य भागवत असेल, तर आम्ही महाराष्ट्राच्या नकाशावर तरी का म्हणून राहावे?
- प्रदीप गावडे, झरेबांबर
२00६ साली सिंधुदुर्ग जिल्हा महाराष्ट्रातील पहिला पर्यटन जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला. दोडामार्ग तालुक्यात पर्यटनाला प्रचंड वाव असूनदेखील पर्यटन सुविधा निर्मितीबाबत दुर्लक्ष केले. आडाळी येथे औद्योगिक वसाहत उभारण्यासाठी भूसंपादन झाले. मात्र, या ठिकाणी एक विजेचा खांबही उभारलेला नाही. हीच गत रस्त्यांची व आरोग्य सुविधांची आहे. अनेक आंदोलने करूनही आमची दखल घेतली जात नाही. त्यामुळे दोडामार्ग तालुका गोव्यात विलीन करणे, हाच एकमेव मार्ग आहे.
- भूषण सावंत, ग्रामपंचायत सदस्य, आंबेली