चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांचे सप्टेंबरमध्ये आंदोलन
By admin | Published: August 30, 2015 12:30 AM2015-08-30T00:30:04+5:302015-08-30T00:33:45+5:30
मागण्यांकडे दुर्लक्ष : ७ पासून बेमुदत संप
रत्नागिरी : चतुर्थी श्रेणी कर्मचाऱ्यांची खासगी भरती रद्द करणे, अनुकंपा तत्त्वावरील सेवाभरती विनाअट करणे, सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांच्या तसेच वैद्यकीय कारणास्तव अपात्र ठरलेल्या कर्मचाऱ्यांच्या एका पाल्यास सेवेत सामावून घेणे, यांसह एकूण २४ मागण्या शासनाने प्रलंबित ठेवल्याने लढा देण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी पुन्हा एकवटले आहेत. या मागण्यांचा विचार झाला नाही, तर येत्या १ सप्टेंबरपासून टप्प्याटप्प्याने आंदोलन करण्याचा निर्धार केला आहे. तरीही मागण्यांकडे दुर्लक्ष झाल्यास ७ सप्टेंबरपासून बेमुदत संप करण्याचा इशारा दिला आहे.
शासनाच्या सेवेतील सर्वांत कमी वेतन घेणारा वर्ग म्हणजे चतुर्थ श्रेणी कर्मचारी आहेत. मात्र, शासनाने त्यांना सहाव्या वेतन आयोगापासून वंचित ठेवण्याचे षड्यंत्र रचले असल्याचा आरोप या कर्मचाऱ्यांनी केला आहे. गेल्या दहा वर्षांत ३० टक्के चतुर्थ श्रेणी कर्मचारी अतिरिक्त ठरवण्यात आले आहेत. त्यामुळे आता या कर्मचाऱ्यांच्या डोक्यावर अतिरिक्ततेची टांगती तलवार आहे. यांसह कित्येक मागण्या अनेक वर्षांपासून प्रलंबित आहेत. यासाठी चतुर्थश्रेणी कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र, राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी मध्यवर्ती संघटना महाराष्ट्र आणि महाराष्ट्र जिल्हा परिषद चतुर्थ श्रेणी कर्मचारी संघटना यांनी १ ते ७ सप्टेंबर या कालावधीत आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे.
या लढ्याला येत्या १ सप्टेंबरपासून सुरुवात होणार आहे. कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे राज्याध्यक्ष भाऊसाहेब पठाण १ सप्टेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर उपोषणाला बसणार आहेत. २ सप्टेंबरला लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. ३ व ४ सप्टेंबरला दुपारी २ वाजता सर्व जिल्हाधिकारी कार्यालयांसमोर निदर्शने करण्यात येणार आहेत. तर ५ सप्टेंबरला सकाळी १० ते १२ या वेळेत काम बंद आंदोलन करण्यात येणार आहे.
रत्नागिरी जिल्हा संघटनेने जिल्हा दौरा करून तालुकावार कार्यकारिणी बांधणी केली आहे. १ सप्टेंबरपासून सुरू होणारे हे आंदोलन १०० टक्के यशस्वी करावे, असे आवाहन रत्नागिरी जिल्हा सरकारी कर्मचारी संघटनेचे सचिव महंमद पठाण यांनी केले आहे. (प्रतिनिधी)