कुडाळ सरपंच बदलाच्या हालचाली
By admin | Published: January 20, 2015 09:49 PM2015-01-20T21:49:01+5:302015-01-20T23:41:09+5:30
ग्रामपंचायत सदस्यांनी नारायण राणे यांचे लक्ष वेधले
ओरोस : कुडाळ सरपंच बदलाच्या हालचाली सुरू झाल्या असून ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांनी काँग्रेस नेते नारायण राणे यांची कणकवली येथे भेट घेऊन लक्ष वेधले आहे. त्याप्रमाणे सरपंच स्रेहल पडते यांना राजीनामा देण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. परंतु अद्यापपर्यंत त्यांनी राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे काँग्रेसकडे काठावर बहुमत असलेल्या या कुडाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच त्याच राहतात की बदलतात याकडे लक्ष लागून राहिले आहे.कुडाळ ग्रामपंचायतीच्या एकूण १७ सदस्यांपैकी ९ सदस्य काँग्रेसकडे आहेत. त्यामुळे काँग्रेसकडे काठावरच बहुमत आहे. सरपंचपद महिलांसाठी आरक्षित असल्याने पहिल्या अडीच वर्षासाठी काँग्रेसचे पदाधिकारी संजय पडते यांच्या पत्नी स्नेहल पडते यांना संधी देण्यात आली. अडीच वर्षानंतर संध्या तेरसे यांना संधी देण्याचे ठरले. त्यामुळे आता अडीच वर्षे पूर्ण होताच सरपंचपद बदलाच्या जोरदार हालचाली सुरू झाल्या आहेत.दरम्यान, विद्यमान सरपंच स्नेहल पडते यांनी राजीनामा दिल्यास सरपंचपदासाठी संध्या तेरसे यांची वर्णी लागणार आहे. त्यामुळे सरपंचपदाची अडीच वर्षे होताच संध्या तेरसे व काही ग्रामपंचायत सदस्य व काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी नारायण राणे यांची भेट घेऊन सरपंच बदलाबाबत चर्चाही केली. त्यामुळे राणेंनी स्नेहल पडते यांना सरपंचपदाचा राजीनामा देणाऱ्या सूचना दिल्या आहेत. मात्र, स्नेहल पडते अजूनही कुडाळ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदावर राहण्यास इच्छुक असल्याने अद्यापपर्यंत राजीनामा दिलेला नाही. त्यामुळे सरपंच बदलण्यासाठी कार्यरत झालेला गट नाराज असून राजकीय घडामोडींना वेग आला आहे. (वार्ताहर)