'रत्नागिरीतील महामार्गाचा रखडलेला प्रश्न तेवढा सोडवा'

By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 8, 2024 12:56 PM2024-06-08T12:56:27+5:302024-06-08T12:57:09+5:30

दहा वर्षांतील उद्योगविरोधी भूमिकेतही बदल व्हायला हवा

MP Narayan Rane should pay special attention to the issues of Mumbai-Goa highway and industries that are constantly being rejected | 'रत्नागिरीतील महामार्गाचा रखडलेला प्रश्न तेवढा सोडवा'

'रत्नागिरीतील महामार्गाचा रखडलेला प्रश्न तेवढा सोडवा'

सिंधुदुर्ग : अनेक वर्षे संथगतीने सुरू असलेला मुंबई गोवा महामार्ग आणि सतत नाकारले जाणारे उद्योग या दोन प्रश्नांकडे नवे खासदार नारायण राणे यांनी विशेष लक्ष द्यावे, अशी अपेक्षा केली जात आहे. जरी महामागर्गाचा प्रश्न सिंधुदुर्गात नसला तरी तो रत्नागिरीत आहे. गेल्या दहा वर्षात मुंबई गोवा महामार्गाच्या प्रश्नाकडे जितक्या गांभीर्याने पाहिले जाणे अवाश्यक होते, तितक्या गांभीर्याने पाहिले गेले नाही. बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी पाठपुरावा केल्यामुळे काही प्रश्न तरी मार्गी लागले. मात्र दिल्लीकडून जेवढा जोर लावणे अपेक्षित होते, तेवढे झाले नाही. आता नव्या खासदारांनी तरी रत्नागिरी जिल्ह्याचे हे दुखणे दूर करावे, अशी अपेक्षा रत्नागिरीकर करत आहेत.

नवीन खासदारांकडून पाच अपेक्षा

महामार्ग अर्धवटच : मुंबई-गोवा महामार्गाचे रत्नागिरी जिल्ह्याच्या हद्दीतील काम गेली आठ दहा वर्षे रखडले आहे. अनेक पूलही अपूर्ण आहेत.
रिफायनरीचा गुंता कायम : प्रस्तावित रिफायनरी प्रकल्पाचा गुंता कायम आहे. बेरोजगारी दूर करण्यासाठी प्रकल्प गरजेचा आहे.
योजना होते, जलस्रोत तेच : जिल्ह्यात पाण्याच्या असंख्य योजना राबवूनही टंचाई खूप आहे. त्यासाठी जलस्रोत बळकट करणे आवश्यक आहे.
आंबा, काजूचे प्रश्न बाकी : अर्थकारणासाठी आंब्यावरील रोग आणि परदेशी काजू बी या दोन समस्यांवरही उपाय शोधायला हवे आहेत.
कोल्हापूर रेल्वेमार्ग : व्यापारी दृष्टीने गरजेचा असलेला रत्नागिरी -कोल्हापूर रेल्वेमार्गही फक्त चर्चेत आहे. कोणताही तोडगा निघालेला नाही.

अपेक्षांबाबत नागरिक म्हणतात..

आधी झालेल्या विरोधामुळे रिफायनरी प्रकल्पाचा विषय अर्धवटच राहिला आहे. मूळ प्रस्तावित जागी हा प्रकल्प झाला तर राजापूर तालुका किंवा जिल्हा नाही, तर राज्याच्या अर्थकारणात मोठे बदल होतील.  - अविनाश महाजन, बागायतदार, राजापूर

मुंबई - गोवा महामार्गाची सध्याची स्थिती अशी आहे की यापेक्षा आधीचा रस्ता चांगला होता, असे म्हणण्याची वेळ आली आहे. नव्या खासदारांनी केंद्रातून दबाव आणून हे काम लवकरात लवकर पूर्ण करुन घ्यायला हवे. - देवदत्त मुकादम, व्यावसायिक

Web Title: MP Narayan Rane should pay special attention to the issues of Mumbai-Goa highway and industries that are constantly being rejected

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.