संजय राऊतांची अटक हे मोठं कारस्थान; महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न- आदित्य ठाकरे
By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 11:41 AM2022-08-01T11:41:08+5:302022-08-01T11:52:25+5:30
शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही संजय राऊतांच्या अटकेवर आपलं मत व्यक्त केलं आहे.
सिंधुदुर्ग/मुंबई- पत्राचाळ घोटाळ्याप्रकरणी ईडीनं रविवारी शिवसेना खासदार संजय राऊत यांना अटक केली आहे. रविवारी सकाळी ईडीचे १० अधिकारी राऊत यांच्या भांडुप येथील मैत्री निवासस्थानी पोहचले. यावेळी CISF जवानही सुरक्षेसाठी तैनात होते. सकाळी ७ वाजल्यापासून राऊत यांच्या घरी ईडीचे अधिकारी चौकशी करत होते. त्यानंतर दुपारी राऊतांना ताब्यात घेऊन ईडी कार्यालयात आणलं गेले. सोमवारी मध्यरात्री १२.४० वाजता संजय राऊतांना ईडीने अटक केली.
संजय राऊतांना अटक केल्यानंतर विविध प्रतिक्रिया उमटत आहे. राज्यातील अनेक नेत्यांनी यावर भाष्य केलं आहे. याचदरम्यान आता शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांनीही संजय राऊतांच्या अटकेवर आपलं मत व्यक्त केलं आहे. महाराष्ट्राचा आवाज दाबण्याचा प्रयत्न सुरु आहे. संजय राऊतांची अटक हे मोठं कारस्थान असल्याचं आदित्य ठाकरेंनी सांगितलं.
शिवसेना नेते आणि आमदार आदित्य ठाकरे यांच्या 'शिव संवाद' यात्रेचा दुसरा टप्पा आजपासून सुरु होत आहे. शिंदे गटातील आमदार दीपक केसरकर यांच्या मतदारसंघ असलेल्या कुडाळमध्ये आदित्य ठाकरे दाखल झाले आहेत. यानंतर ते वेंगुर्ला सावंतवाडी आणि कोल्हापूर शहर, शिरोळ ते कात्रज चौक दरम्यान १ आणि २ ऑगस्ट रोजी ही 'शिव संवाद' यात्रा निघणार आहे.
ईडीने संजय राऊत यांच्यावर कारवाईसंदर्भात भाजपने शरद पवार यांना खोचक टोला लगावला आहे. पण का? जाणून घ्या...#SanjayRaut#SharadPawarhttps://t.co/3Qjs5Il3oO
— Lokmat (@lokmat) August 1, 2022
शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न- आमदार सुनिल राऊत
पत्रा चाळ आणि संजय राऊत यांचा काडीमात्र संबंध नाही, ती कुठे आहे हे संजय राऊत यांना माहित नाही. अटक करण्यासाठी काहीतरी पाहिजे म्हणून पत्रा चाळ प्रकरण पुढे केलं आहे. हा शिवसेनेचा आवाज दाबण्याचा प्रयत्न आहे. संजय राऊत यांना अटक करण्यासाठी फ्रेम तयार केली. त्यात बोगस कागदपत्रे लावले आहेत. ईडी त्यांचं काम करेल आम्ही आमचं काम करु, असं सुनील राऊत म्हणाले.