स्वस्त धान्याला गोरगरीब मुकले
By admin | Published: June 17, 2015 10:11 PM2015-06-17T22:11:34+5:302015-06-18T00:44:28+5:30
रेशनवर खडखडाट : आठ महिने धान्यच नाही...
रत्नागिरी : गेल्या आठ महिन्यांपासून एपीएलधारकांना होणारा धान्यपुरवठा शासनाने बंद केल्याने आमच्यावरच अन्याय का, असा आर्त सवाल जिल्ह्यातील ९८ हजार एपीएलधारकांकडून करण्यात येत आहे.
केंद्र सरकारची राष्ट्रीय अन्न सुरक्षा योजना फेब्रुवारी २०१४ पासून सुरू झाली. या योजनेच्या प्राधान्य गट तसेच अंत्योदय शिधापत्रिकाधारकांना धान्यपुरवठा नियमित सुरू आहे. मात्र, एपीएलधारकांना धान्य पुरवठा अनियमित केला गेला. नोव्हेंबर २०१४पासून तर धान्यपुरवठा पुर्णत: बंद करण्यात आला आहे.
जिल्ह्यात ९८,१९३ एपीएल शिधापत्रिकाधारक आहेत. त्यांना प्रति शिधापत्रिका धान्य देण्यात येते. जिल्ह्यासाठी एपीएलधारकांना ५६४ मेट्रिक टन गहू आणि ४६१ मेट्रिक टन तांदूळ इतके नियतन मंजूर आहे. गेल्या १ फेब्रुवारीपासून अन्न सुरक्षा योजनेची अंमलबजावणी करण्यात आली ही योजना सुरू झाल्यानंतर तब्बल ३ महिने एपीएलधारकांंना धान्य मिळाले नव्हते. त्यानंतर मे महिन्यात पुन्हा धान्य देण्यात आले. जून, जुलै महिन्याचा धान्यपुरवठाही एपीएलधारकांना करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर आॅगस्ट महिन्याचे नियतन मंजूर झाल्यानंतर ते १५ आॅगस्टपर्यंत पुण्यातील भारतीय अन्न महामंडळाच्या गोदामात येणे गरजेचे होते. मात्र, ते उशिरा २८ आॅगस्टला आल्याने महामंडळाने ते धान्य नाकारले होते. धान्य परत गेल्याने एपीएलधारकांना आॅगस्टच्या धान्यापासून वंचित राहावे लागले. मात्र, त्यानंतर सप्टेंबर आणि आॅक्टोबरचे नियतन मंजूर झाले होते.
आता नोव्हेंबरपासून या शिधापत्रिकाधारकांना धान्य पुरवठाच बंद करण्यात आला आहे. त्यामुळे या कार्डधारकांची आशा आता मावळलेलीच आहे. या कार्डधारकांना आता काळ्या बाजाराने धान्य खरेदी करावे लागत आहे. त्यामुळे शासनाबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)