पोषण आहाराएवढेच खेळाला महत्त्व द्या संगीता राणे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2018 06:21 PM2018-11-23T18:21:30+5:302018-11-23T18:21:58+5:30
मुलांच्या शारीरिक व बौद्धिक विकासात पोषण आहाराएवढेच खेळाला महत्त्व आहे. यामुळे अंगणवाडी व बालवाडीतील मुलांना केवळ पाटी-पेन्सिल यात मग्न न ठेवता त्यांच्यासाठी मुक्तांगण निर्माण करून त्यांच्यातील
वेंगुर्ले : मुलांच्या शारीरिक व बौद्धिक विकासात पोषण आहाराएवढेच खेळाला महत्त्व आहे. यामुळे अंगणवाडी व बालवाडीतील मुलांना केवळ पाटी-पेन्सिल यात मग्न न ठेवता त्यांच्यासाठी मुक्तांगण निर्माण करून त्यांच्यातील सुप्त कलागुणांना वाव देत त्यांचा सर्वांगीण विकास साधा, असे आवाहन गोवा येथील खाद्य तथा पोषण आहार विभागाच्या अधिकारी संगीता राणे यांनी केले.
गोवा सामुदायिक खाद्य तथा पोषण आहार बोर्ड, महिला आणि बालविकास मंत्रालय भारत सरकार व महाराष्ट्र शासनाच्या सिंधुदुर्ग जिल्हा महिला व बालविकास विभागाच्या एकात्मिक बालविकास कार्यालय वेंगुर्ला यांच्यातर्फे तुळस येथील कुंभारटेंब अंगणवाडी येथे बालविकास सेवा सप्ताह आयोजित केला होता. या कार्यक्रमावेळी त्या उपस्थित अंगणवाडी सेविका व पालकांना मार्गदर्शन करताना बोलत होत्या.
यावेळी व्यासपीठावर गोवा येथील महिला व बालविकास विभागाच्या नीता राणे, बालविकास प्रकल्प अधिकारी मेस्त्री, आर्या देऊलकर, तुळस उपसरपंच तेजस्विनी ठुंबरे, अंगणवाडी मुख्यसेविका आदी उपस्थित होते.
केंद्र आणि राज्य महिला व बालविकास विभागाच्यावतीने महिला व बालविकास सेवा सप्ताह साजरा करण्यात आला. या उपक्रमाअंतर्गत वेंगुर्ला महिला व बालविकासतर्फे या कार्यक्रमाचे उद्घाटन तुळस येथील कुंभारटेंब अंगणवाडीत करण्यात आले.
या सेवा सप्ताहादरम्यान तुळस येथील सिद्धार्थनगर, होडावडा, आरवली, शिरोडा येथील काही अंगणवाड्यांमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी उपस्थित पालक व अंगणवाडी सेविकांना नीता राणे यांनी पोषण आहारविषयक महत्त्वपूर्ण मार्गदर्शन केले. अंगणवाडीतील मुलांच्या कलागुणांना वाव देण्याच्या उद्देशाने वेशभूषा, चित्रकला, गायन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्या स्पर्धकांना मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देऊन गौरविण्यात आले.
महिला व बालविकास सेवा सप्ताहावेळी अधिकारी संगीता राणे, नीता राणे, अंगणवाडी सेविका आणि वेशभूषा स्पर्धेतील सहभागी स्पर्धक उपस्थित होते.