महिंद धरणात पाण्यापेक्षा गाळ जास्त
By admin | Published: May 12, 2015 09:34 PM2015-05-12T21:34:04+5:302015-05-12T23:41:19+5:30
१८ वर्षांपासून गाळ जैसे थे : शेतीसह पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर; वांग नदीत पाणी सोडण्यावर मर्यादा
सणबूर : ढेबेवाडी विभागाला वरदान लाभलेल्या वांग नदीवरील महिंद धरणातील पाणीसाठा दिवसेंदिवस कमी होत आहे. नदीच्या पात्रामध्ये पाणी सोडण्यावर मर्यादा असल्याने नदीच्या दुतर्फा शेती असणाऱ्या शेतकऱ्यांना या पाणीटंचाईची झळ पोहोचत आहे. १८ वर्षांपासून या धरणातील गाळ न काढल्यामुळे अर्ध्यापेक्षा जास्त गाळाने धरण भरल्याने धरणात अतिशय कमी प्रमाणात पाणीसाठा होत आहे. महिंद धरणामध्ये १८ वर्षांपूर्वी पाणी अडवायला सुरुवात झाली. ८५ दशलक्ष घनफूट पाणीसाठा क्षमतेच्या या धरणाचे लाभक्षेत्र बनपुरी गावापर्यंतच आहे. या धरणामुळे या परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतीसह पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटायला काही प्रमाणात मदत होत आहे. या धरणाच्या लाभक्षेत्रात कृष्णा खोरे विकास महामंडळाने बंधारे बांधले आहेत. मात्र धरणातच पाणी कमी असल्याने या बंधाऱ्यात पाणी साठवता येत नाही. उन्हाळ्यात या विभागातील लोेकांना पाण्यासाठी वणवण भटकावे लागत आहे. धरणातून पाणी सोडले गेले तर ही वेळ येणार नाही हे खरे आहे मात्र धरणातील गाळ न काढल्यामुळे धरणातच अतिशय कमी प्रमाणात पाणीसाठा होत असल्याने पाणी कसं सोडायच, हाही प्रश्न धरण प्रशासनासमोर आहे. मात्र त्यांनी यावर तोडगा काढण्याची गरज आहे.
महिंद धरणातील गाळ काढून धरणाची थोडी उंची वाढवावी, तसेच विभागातील लोकांना पाण्याचा प्रश्नच उद्भवणार नाही, यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाने ठोस पावले उचलण्याची गरज आहे. या धरणाचे पाणी याच विभागातील लोकांना मिळत नसेल तर या धरणाचा उपयोग काय? असा प्रश्न विभागातील जनता करीत आहे. (वार्ताहर)
महिंद धरणातील गाळ काढला तर धरणातील पाणीसाठा वाढेल शिवाय उन्हाळ्यात पाणीटंचाईचा प्रश्न जाणवणार नाही. यासाठी कृष्णा खोरे विकास महामंडळाने नियोजन करून धरणातील गाळ काढण्याची गरज आहे. तरच धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ होईल.
- संजय लोहार, उपसरपंच,
मंद्रुळकोळे खुर्द
पाझर तलावही कोरडे
ढेबेवाडी विभागातील अनेक गावात पाझर तलावांचे जाळे आहे. या तलावात पाणीसाठा झाल्यानंतर नजीकच्या विहिरींची पाणी पातळी वाढते. मात्र, सध्या पाझर तलावांची अवस्थाही बिकट आहे. तलावामध्ये पाण्यापेक्षा गाळ जास्त प्रमाणात असल्याने पावसाळ्यात तलावामध्ये कमी प्रमाणात पाणी साचते. नोव्हेंबर ते डिसेंबरअखेर हा पाणीसाठा राहतो. त्यानंतर तलावही कोरडे पडतात. परिणामी, परिसरातील गावांचा पाणीप्रश्न अधिकच गंभीर होतो.