मुंबई-गोवा चौपदरीकरण : कणकवलीत उड्डाण पुलाच्या कामाला गती !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 26, 2018 02:44 PM2018-12-26T14:44:00+5:302018-12-26T14:45:51+5:30
कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम गतीमान पध्दतीने सुरु आहे. तर या कामातील महत्वाचा टप्पा असलेल्या कणकवलीतील उड्डाण पुलाच्या कामाने आता गती घेतली आहे.
कणकवली : मुंबई-गोवा चौपदरीकरणाची मागणी अनेक वर्षांनंतर सरकारने मान्य केली आहे. कोकणातील या महामार्गासाठी सुमारे २२ हजार ६६४ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. त्यामुळे कणकवली शहरासह सिंधुदुर्ग जिल्ह्यात सध्या महामार्ग चौपदरीकरणाचे काम गतीमान पध्दतीने सुरु आहे. तर या कामातील महत्वाचा टप्पा असलेल्या कणकवलीतील उड्डाण पुलाच्या कामाने आता गती घेतली आहे.
या चौपदरीकरणाच्या कामामुळे महामार्गाचे चित्र पालटल्याचे दृष्य सिंधुदुर्गात पहायला मिळत आहे. ठेकेदाराच्या अनास्थेमुळे चौपदरीकरणातील १४ पुलांचे काम पुन्हा फेरनिवीदा करून करण्यात येणार असल्याने काम मार्गी लागणार आहे.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग ६६ चे काम करताना इंदापूर ते झाराप असे १० टप्पे बनविण्यात आले. त्या टप्प्यांमध्ये विविध १० ठेकेदारांच्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या रस्त्याची ४५० किमी लांबी असून त्यासाठी शासनाने २२ हजार ६६४ कोटी निधीची तरतूद केली आहे.
इंदापूर ते वडेपाले, वीर ते भोगाव, भोगाव ते कशेडी घाट, कशेडी घाट ते परशुराम घाट, परशुराम घाट ते आरवली, आरवली ते काटे, काटे ते वाकेड, वाकेड ते तळगाव, तळगाव ते कलमठ जानवली नदीपूल, कलमठ - कणकवली ते झाराप असे १० टप्पे बनविण्यात आले आहेत.
१० टप्प्यांमध्ये चौपदरीकरण करत असताना कॉन्क्रीट रस्ता, मोठे तसेच लहान पूल, बस स्टॅण्ड, छोठी मोठी जंक्शन, अंडरपास, प्लायओव्हर, सर्व्हिस रोड अशी कामे अंर्तभूत करण्यात आली आहेत. त्यामुळे कोकणातील दळणवळणासाठी हा मुंबई-गोवा महामार्ग खऱ्या अर्थाने चौफेर विकासाचा मार्ग ठरेल अशी शक्यता आहे. सध्या या मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाने गती घेतली आहे.
ठिक-ठिकाणी चौपदरीकरणाचे रस्ते पुर्णत्वास जातानाचे चित्र दिसून येत आहे. कधी नव्हे ते चौपदरीकरण झाल्यानंतरचे चित्र कोकण वासियांना पाहता येत आहे़.या चौपदरीकरणाला लागून सिंधुदुर्गात नांदगाव-देवगड, कुडाळ मालवण, कणकवली-आचरा, कुडाळ-सिंधुदुर्ग असे चार रस्ते सीमेंट क्राँक्रीटीकरणाच्या माध्यमातून करण्यात येणार आहेत.त्यासाठी २१२० कोटींचा निधी शासनाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे.
सिंधुदुर्गात मुंबई-गोवा चौपदरीकरणाचे काम फार गतीने सुरू आहे. कणकवलीत जिल्ह्यातील पहिले उड्डान पुल होत असून या उड्डान पुलाचे काम दिलीप बिल्डकॉन या कंपनीने हाती घेतले आहे. आतापर्यंत सात पिलर उभारण्याची प्रक्रीया पुर्ण होताना दिसुन येत आहे. दिवस रात्र चौपदरीकरणाचे काम करण्यात येत आहे. कणकवली शहरात हा मार्ग पुर्ण करण्याच्या दृष्टीने सर्व्हिस रोड पूर्ण करण्यात येत आहेत.
शहरातील १८०० मीटरच्या अंतरात १२०० मिटरचे सर्व्हिस मार्ग पुर्ण करण्यात आले आहेत. सर्व्हिसमार्गावर असलेल्या मातीमुळे नागरिकांना व वाहनचालकाना मोठ्या प्रमाणात धुळीचा प्रादुर्भाव सहन करावा लागत आहे. त्यामुळे नागरिकांकडून तीव्र नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.