मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण, अंडरपासला अखेर मंजुरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2019 04:06 PM2019-12-02T16:06:42+5:302019-12-02T16:07:53+5:30
मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करीत असताना कणकवलीत जानवली नदी पूल ते नरडवे नाक्यापर्यंत उड्डाणपूल करण्यात येत आहे. या उड्डाणपुलाअंतर्गत गांगोमंदिरजवळ अंडरपास करावा अशी मागणी कणकवलीतील नागरिकांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन अंडरपासला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर यांनी दिली.
कणकवली : मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम करीत असताना कणकवलीत जानवली नदी पूल ते नरडवे नाक्यापर्यंत उड्डाणपूल करण्यात येत आहे. या उड्डाणपुलाअंतर्गत गांगोमंदिरजवळ अंडरपास करावा अशी मागणी कणकवलीतील नागरिकांनी केली होती. या मागणीची दखल घेऊन अंडरपासला मान्यता देण्यात आली असल्याची माहिती भाजपचे माजी तालुकाध्यक्ष शिशिर परुळेकर यांनी दिली.
गेले चार दिवस गांगोमंदिरजवळ मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरणाचे काम बंद पाडले होते. जोपर्यंत गांगोमंदिर येथील अंडरपासची मंजुरी देत नाही, तोपर्यंत काम चालू देणार नाही असा इशारा शिशिर परुळेकर व अन्य नागरिकांच्यावतीने प्रशासन तसेच ठेकेदार कंपनीला देण्यात आला होता.
गांगोमंदिर येथील अंडरपास मंजुरीसाठी खासकरून आमदार नीतेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांनी प्रयत्न केले. अंडरपासमुळे भविष्यात शहरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे. त्याचबरोबर वाहतूक कोंडीवर नियंत्रण मिळविण्यासाठी मदत होणार आहे.
१० मीटर रुंदी व ५ मीटर उंची असलेल्या अंडरपासचे काम रविवारी रात्रीपासून सुरू करण्यात येत आहे. त्यासाठी शासकीय अधिकारी व दिलीप बिल्डकॉन कंपनीच्या अधिकाऱ्यांनी गांगोमंदिर येथील अंडरपासच्या जागेची पाहणी केली. यावेळी नागरिकांना रविवारी मध्यरात्रीपासून एस. एम. हायस्कूल ते जानवली पुलापर्यंत सर्व्हिस रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्याचे आश्वासन ठेकेदार कंपनीने दिल्याची माहिती शिशिर परुळेकर यांनी दिली.
अडीच कोटींचा प्रस्ताव
नगराध्यक्ष समीर नलावडे यांनीदेखील या अंडरपाससाठी आंदोलन केले होते. शिवसेना नेते खासदार विनायक राऊत, माजी पालकमंत्री दीपक केसरकर यांच्या पाहणी दौºयात संदेश पारकर, नगरसेवक सुशांत नाईक, कन्हैया पारकर, रुपेश नार्वेकर, महेश सावंत या नेत्यांनीदेखील अंडरपाससाठी पाठपुरावा केला होता. पुन्हा एकदा आंदोलनात्मक भूमिका घेतल्यामुळे दिलीप बिल्डकॉनचे जनरल मॅनेजर के. गौतम यांनी वरिष्ठ पातळीवर अडीच कोटींचा प्रस्ताव पाठविला होता. त्याला मंजुरी मिळाली आहे.