मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण : केंद्रीय वाहतूकमंत्र्यांना पत्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2020 01:43 PM2020-07-18T13:43:16+5:302020-07-18T13:45:29+5:30
सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्ता खचण्याच्या घटना घडत आहेत. तसेच इतर कामही योग्यप्रकारे सुरू असल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे या महामार्ग चौपदरीकरण कामाचा दर्जा तपासणीसाठी तत्काळ पथक पाठवावे, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी एका पत्राद्वारे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
कणकवली : सिंधुदुर्ग जिल्ह्यात महामार्ग चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. मात्र, अनेक ठिकाणी सर्व्हिस रस्ता खचण्याच्या घटना घडत आहेत. तसेच इतर कामही योग्यप्रकारे सुरू असल्याचे निदर्शनास येत नाही. त्यामुळे या महामार्ग चौपदरीकरण कामाचा दर्जा तपासणीसाठी तत्काळ पथक पाठवावे, अशी मागणी भाजप जिल्हाध्यक्ष माजी आमदार राजन तेली यांनी एका पत्राद्वारे केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली आहे.
या पत्रात म्हटले आहे की, अनेक दशके स्वप्नात असलेले महामार्ग चौपदरीकरण काम सिंधुदुर्ग जिल्ह्यापुरते तरी अंतिम टप्प्यात आहे. याचे सारे श्रेय आपल्यालाच आहे. अनेक अडचणींवर मात करून, वेळेत निधीची उपलब्धता करून आपल्या सरकारने हे काम पूर्ण केले आहे. त्यामुळे खरेतर जिल्ह्यातील जनता भाजपाच्या बाजूने उभी राहण्याची ही वेळ होती.
कणकवली येथे उड्डाणपुलाचे काम सुरू आहे. या मुख्य रस्त्याची संरक्षक भिंत पावसाळ्याच्या सुरुवातीलाच आपली लाईन लेव्हल सोडून बाहेर आली होती.
अजून मुख्य रस्त्यावरून वाहतूक सुरू नसली तरी बाजूच्या सर्व्हिस रस्त्यावरून जाणाऱ्या वाहने आणि पादचारी यांच्यासाठी ती धोकादायक होती. शहरात त्यासाठीआंदोलन झाल्यावर ठेकेदार कंपनीने त्याला फक्त तात्पुरती डागडुजी केली आहे.यासोबत जिल्ह्यातील महामार्ग कामातील भेगाळलेले काँक्रीट रस्ते, वाहून गेलेले सर्व्हिस रस्ते, तुटून पडलेली काँक्रीट गटारे, दर्जाहीन बस थांबे इत्यादी बाबींवर या पथकाने एक नजर टाकावी व कंपनीला योग्य त्या सूचना द्याव्यात, असेही
या पत्रात राजन तेली यांनी म्हटले आहे.
कणकवलीच्या घटनेत दुपारची वेळ असल्याने जीवितहानी टळली
संभाव्य धोक्याकडे दुर्लक्ष करण्यात आले होते. त्यामुळे ती मोठ्या उंचीची भिंत फुटून ३५ फूट उंचीच्या मुख्य रस्त्यासाठी केलेला मातीचा भराव सर्व्हिस रस्त्यावर आला. दुपारची वेळ असल्याने सुदैवाने जीवितहानी टळली. परंतु सुमारे ३०० मीटर लांब असलेल्या या भिंतीच्या दुतर्फा सर्व्हिस रस्ता आहे आणि तो वाहतुकीसाठी अत्यंत धोकादायक आहे. त्यामुळे या संदर्भात कणकवली शहरात आंदोलन सुरू असून जनतेच्या भावनांचा उद्रेक वाढत आहे.
या आंदोलनाचा रोख कंपनीला सत्ताधारी पक्ष पाठीशी घालतो असा होत आहे. त्यामुळे त्वरित यासाठी आपण मुख्य अभियंता दर्जाच्या बांधकाम अधिकारी आणि कामाची गुणवत्ता, दर्जा तपासणी पथक पाठवून या कामाचा दर्जा तपासावा. संबंधित पुलाच्यावरून जाणारा आणि लगतचे सर्व्हिस रस्ते हे वाहतुकीस योग्य आहेत का ते तपासण्याचे आदेश द्यावेत.