मुंबई-गोवा महामार्ग चौपदरीकरण : जानवली पुलाचे काम प्रगतीपथावर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2020 06:08 PM2020-05-28T18:08:14+5:302020-05-28T18:09:48+5:30
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. त्याअंतर्गत कोकणच्या दळणवळण क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या जानवली नदीवरील पुलाचे ...
कणकवली : मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सध्या जोरदार सुरू आहे. त्याअंतर्गत कोकणच्या दळणवळण क्रांतीमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका बजावणाऱ्या जानवली नदीवरील पुलाचे दुसऱ्या टप्प्यातील कामदेखील प्रगतीपथावर आहे.
कणकवली शहरालगत गडनदी तसेच जानवली नदीवर ब्रिटिशकालीन पूल होते. मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरण कामाअंतर्गत या दोन्ही नद्यांवरील पूल इतिहासजमा करण्यात आले. त्याजागी नवीन सिमेंट काँक्रिटच्या पुलांची उभारणी करण्यात आली आहे. गडनदीवरील पुलाचे काम पूर्ण झाले असून जानवली नदीवरील दुसऱ्या टप्प्यातील पुलाचे काम सुरू आहे.
सन १९३४ मध्ये मुंबई-गोवा महामार्गावरील अनेक पूल वाहतुकीस खुले झाले होते. त्यानंतर अनेक वर्षे या पुलांवरून कित्येक टन अवजड वाहतूक सुरू होती. ब्रिटिश काळात उभारलेले हे पूल समर्थपणे सेवा बजावत होते.
मुंबई ते गोव्यापर्यंत दळणवळणाच्या मूलभूत सुविधांची उभारणी करताना तत्कालीन ब्रिटिश शासनाने १९३० मध्ये नदीपात्रांवर पुलांची उभारणी सुरू केली. तर १९३४ ते १९४३ पर्यंत या पुलांची कामे पूर्ण झाली. या पुलांमुळे रस्तामार्गे वाहतुकीला चालना मिळाली. त्याच बरोबर समुद्रकिनारी असलेल्या बंदरातून बोट तसेच अन्य मार्गाने होणारी वाहतूक बंद झाली.
रस्ते तसेच पूल उभारले गेल्यामुळे मुंबई-गोवा महामार्गावर सिंधुदुर्ग जिल्ह्यात नांदगाव, तळेरे, कणकवली, ओरोस, कसाल आदी छोट्या मोठ्या नव्या बाजारपेठा उदयास आल्या. तसेच कणकवली, कुडाळ, सावंतवाडी या शहरांचेही महत्त्व वाढले.
आॅगस्ट २०१६ मध्ये पुरात सावित्री नदीवरील ब्रिटिशकालीन पुलाचा काही भाग वाहून गेल्यानंतर महामार्गावरील सर्वच ब्रिटिशकालीन पूल पाडून तेथे नवीन पूल बांधण्याचे शासनाने निश्चित केले. त्यानुसार मुंबई-गोवा महामार्गाच्या चौपदरीकरणात नवीन पुलांची कामे झाल्यानंतर जुने ब्रिटिशकालीन पूल पाडण्यात आले. मात्र, या पुलांशी निगडित अनेक आठवणी असून जुन्या जाणत्या लोकांकडून त्या ऐकायला मिळतात.
दरम्यान, कणकवली शहरालगतच्या जानवली नदीवर पुलाचे दोन टप्प्यात काम करण्यात येत आहे. पहिल्या टप्प्यातील काम पूर्ण झाले असून त्यावरून वाहतूक सुरू झाली आहे. तर दुसºया टप्प्यातील काम सध्या सुरू आहे. या पुलाचे वाय बिम पूर्ण झाले असून त्यावरील स्लॅबचे काम करण्याच्यादृष्टीने नियोजन सध्या सुरू आहे.
अनेक पूर झेलूनही पूल राहिले होते मजबूत
कणकवली शहरालगत गडनदी आणि जानवली नदीवरील पुलांची कामे १९३० मध्ये सुरू झाली. यातील जानवली पुलाला त्यावेळी १ लाख ३७ हजार ६६९ रुपये खर्च आला होता. तर गडनदी पुलाचे बांधकाम १ लाख २६ हजार रुपयांमध्ये पूर्ण झाले होते.
दोन्ही पुलांवरून १९३४ मध्ये वाहतूक सुरू झाली. महत्त्वाची बाब म्हणजे महाड तालुक्यातील सावित्री नदीवरील पुलाचा अपवाद वगळता गडनदी आणि जानवली नदीसह महामार्गावरील इतर ब्रिटिशकालीन पूल गेल्या अनेक वर्षांत अवजड वाहने आणि अनेक पूर झेलूनही मजबूत राहिले होते.