मुंबई येथील क्षयरुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल, जिल्ह्यात रुग्णांची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 6, 2019 05:31 PM2019-02-06T17:31:45+5:302019-02-06T17:35:41+5:30
सिंधुदुर्ग वासियांनो सावधान! मुंबई येथील क्षय रोग रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांची संख्या वाढत असल्याची धक्कादायक माहिती आजच्या आरोग्य समिती सभेत उघड झाली आहे. मात्र या सर्वांना उपचाराखाली आणण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतू हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्ण व रुग्णाच्या कुटुंबाने कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करा असे आदेशही सभापती डॉ. अनीषा दळवी यांनी सभेत दिले.
सिंधुदुर्गनगरी : सिंधुदुर्ग वासियांनो सावधान! मुंबई येथील क्षय रोग रुग्ण उपचारासाठी जिल्ह्यात दाखल होत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांची संख्या वाढत असल्याची धक्कादायक माहिती आजच्या आरोग्य समिती सभेत उघड झाली आहे. मात्र या सर्वांना उपचाराखाली आणण्यात आले असल्याचे आरोग्य विभागाकडून स्पष्ट करण्यात आले आहे. परंतू हा संसर्गजन्य आजार असल्याने रुग्ण व रुग्णाच्या कुटुंबाने कोणती काळजी घ्यावी याबाबत जनजागृती करा असे आदेशही सभापती डॉ. अनीषा दळवी यांनी सभेत दिले.
जिल्हा परिषद आरोग्य समितीची मासिक सभा सभापती डॉ. अनीषा दळवी यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झाली. यावेळी समिती सचिव तथा जिल्हा परिषद आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, समिती सदस्य उन्नती धुरी, राजेश कविटकर, हरी खोबरेकर, लक्ष्मण रावराणे, सुनिल मोरजकर, तालुका आरोग्य अधिकारी, अधिकारी कर्मचारी आदी उपस्थित होते.
संसर्गजन्य रोगाबाबत आढावा घेतला असता सिंधुदुर्ग जिल्ह्यात ७८० क्षयरोग रुग्ण असल्याची माहिती सभेत देण्यात आली. मात्र ही आकडेवारी गतवर्षीच्या तुलनेत कमी आहे की वाढली आहे याबाबत सदस्यांनी उपस्थित अधिकारी यांना विचारले असता ही आकडेवारी गतवर्षीच्या तुलनेत वाढली असल्याचे सांगण्यात आले. मात्र या रुग्णाची संख्या वाढण्याचे नेमके कारण काय? असा प्रश्नही सदस्यांनी केला असता हा आजार संसर्गजन्य आहे.
एका वक्तीपासून दुसऱ्याला होतो. तसेच यात जास्त करून मुंबई येथील क्षयरोग रुग्ण जिल्ह्यात उपचारासाठी येत आहेत. त्यामुळे जिल्ह्यात क्षयरोग रुग्णांची संख्या वाढत असल्याचे सांगतानाच एक सर्व रुग्ण उपचाराखाली असल्याचे सभेत सांगण्यात आले.
पल्स आॅक्सी मीटरची मागणी
यावेळी अनिशा दळवी यांनी, नाविन्यपूर्ण योजनेतून आरोग्य संस्थेत दाखल झालेल्या गंभीर आजारी रुग्णांची पल्स व आॅक्सिजन समजण्यासाठी पल्स आॅक्सी मीटर व गरोदर मातेच्या गर्भातील बाळाचे ठोके समजण्यासाठी एनएफटी मशीन पुरविण्यात यावी, अशी मागणी केली. तसेच साटेली प्राथमिक आरोग्य केंद्राला १०८ रुग्णवाहिका पुरविण्याची मागणी केली.
महिला डॉक्टरने केली मुलींचीच तपासणी
जिल्हा शल्य चिकित्सक यांच्या अंतर्गत येणाऱ्या एका महिला डॉक्टरने एका अंगणवाडीत तपासणीसाठी गेली असता केवळ मुलींची तपासणी केली. मुलांची तपासणी केली नाही. याचा लेखी पुरावाच वेंगुर्ले सभापती सुनील मोरजकर यांनी सभेत सादर केला. यावेळी दळवी यांनी याबाबत तीव्र नाराजी व्यक्त करीत याची चौकशी करून पुढील सभेत अहवाल सादर करण्याचे आदेश प्रशासनाला दिले.