आंबा व्यवसायिकावरची नगरपरिषदची कारवाई टळली; आणखी दहा दिवसांची मुदत
By अनंत खं.जाधव | Published: June 7, 2024 11:08 PM2024-06-07T23:08:24+5:302024-06-07T23:09:08+5:30
पालकमंत्र्याकडून मध्यस्थी, सावंतवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेत आंबा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना मार्केटमध्ये नगरपरिषद कडून जागा देण्यात आली आहे, परंतु आंब्याच्या हंगामात त्यांना रस्त्यावर बसण्याची परवानगी देण्यात आली होती
सावंतवाडी : येथील बाजारपेठेत आंबे घेवून रस्त्यावर बसणाऱ्या ग्रामीण भागातील व्यापाऱ्यांसह स्थानिकांना हटविण्यासाठी नगरपरिषद प्रशासनाकडून कारवाई करण्यात आली, मात्र त्या ठिकाणावरून आम्ही आणखी १० दिवस हलणार नाही, अशी भूमिका या आंबा व्यापाऱ्यांनी घेतल्याने थोडा गोंधळ निर्माण झाला होता.
याबाबत माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर व भाजपचे युवा नेते विशाल परब यांनी पालकमंत्र्यांशी संपर्क साधल्यानंतर त्यांना आणखी दहा दिवसांची मुदत वाढवून देण्यात आली आहे. त्यामुळे व्यापाऱ्यांवरची टांगती तलवार सध्यातरी बाजूला झाली आहे. सावंतवाडी शहरातील मुख्य बाजारपेठेत आंबा विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांना मार्केटमध्ये नगरपरिषद कडून जागा देण्यात आली आहे, परंतु आंब्याच्या हंगामात त्यांना रस्त्यावर बसण्याची परवानगी देण्यात आली होती, मात्र ही मुदत पालिकेने २ वेळा वाढवून दिलेली होती ती आता संपली असल्याने त्यांना पुन्हा आपल्या जागेत जावे, अशा सूचना प्रशासनाकडून करण्यात आल्या. त्यानुसार त्यांना हटवण्याची कारवाई शुक्रवार सकाळपासूनच हाती घेण्यात आली होती.
यावेळी त्या ठिकाणी आलेल्या नगरपरिषद कर्मचारी व अधिकारी यांना व्यापाऱ्यांनी कारवाई पासून रोखले तसेच अद्याप पर्यंत आंब्याचे उत्पन्न सुरू आहे. त्यामुळे आणखी १० दिवस आम्हाला रस्त्यावर बाहेर बसण्याची परवानगी द्या, अशी मागणी त्यांनी यावेळी लावून धरली मात्र काही झाले तरी आम्ही तुम्हाला मुदत वाढवून देणार नाही, अशी भूमिका पालिका प्रशासनाकडून घेण्यात आली. तसेच व्यापाराने सहकार्य न केल्यास तुमचे सामान जप्त करू असा इशारा दिला.
दरम्यान याबाबत तेथील व्यावसायिकांनी माजी नगरसेवक सुधीर आडीवरेकर, भाजपचे नेते विशाल परब यांच्याशी संपर्क साधून याबाबतची कल्पना दिली. तसेच काही झाले तरी आणखी १० दिवस आम्हाला बसण्यासाठी मुभा द्या अशी मागणी केली. त्यानुसार विशाल परब यांनी पालकमंत्र्यांशी संपर्क साधला, त्यांना १० दिवसांची मुदत वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार त्यांना १० दिवसाची मुदत वाढवून देण्यात आल्याचे निरवडेकर यांनी सांगितले.
यावेळी सुलभा जामदार, अमित मठकर संगिता नार्वेकर, विमल पावसकर, राजा लाखे, प्राजक्ता सांगेलकर, दिपिका मठकर, नियोजिता शृंगारे, शेरीन राॅडीक्स, रूपा गोवेकर, आदी व्यावसायिक उपस्थित होते. यावेळी त्यांनी पालिकेकडून होत असलेल्या कारवाईबाबत नाराजी व्यक्त केली. आम्हाला आंब्याचा हंगाम संपेपर्यंत बसण्यासाठी परवानगी द्यावी, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.