नगरपंचायतीतील भ्रष्टाचार लवकरच बाहेर काढणार
By admin | Published: May 4, 2016 12:04 AM2016-05-04T00:04:49+5:302016-05-04T00:04:49+5:30
समीर नलावडे, मेघा गांगण : कणकवली नगरपंचायत विशेष सभा अनुपस्थित प्रकरण
कणकवली: आमचा कणकवली पर्यटन महोत्सवाला विरोध नसून नगरपंचायत फंडातील दहा लाख रुपए महोत्सवासाठी वापरण्याला विरोध आहे. शहर विकासाची कोणाला खरी आस्था आहे हे नगरपंचायतीच्या सभेचे नगरसेवकांच्या उपस्थितीचे रेकॉर्ड पाहिल्यानंतर समजेलच. त्यामुळे सत्ताधाऱ्यांनी जनतेची दिशाभूल करु नये. नगरपंचायतीत भ्रष्टाचार कोण करीत आहे, ते आम्ही लवकरच बाहेर काढून जनतेसमोर ठेवू, असा टोला माजी नगराध्यक्षा मेघा गांगण, उपनगराध्यक्ष समीर नलावडे यांनी सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.
कणकवली नगरपंचायतीच्या सोमवारी आयोजित करण्यात आलेल्या विशेष सभेला समीर नलावडे यांच्यासह काँग्रेसचे नगरसेवक अनुपस्थित राहिले होते. ही सभा तहकूब झाल्यानंतर नगराध्यक्षा माधुरी गायकवाड, उपनगराध्यक्ष कन्हैया पारकर यांच्यासह इतर नगरसेवकांनी पत्रकार परिषद घेत अनुपस्थित नगरसेवकांवर आरोप केले होते. या आरोपाना मंगळवारी येथील काँग्रेस संपर्क कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन समीर नलावडे तसेच मेघा गांगण यांनी प्रत्युत्तर दिले. यावेळी नगरसेवक किशोर राणे, बंडू हर्णे, सुविधा साटम, अभिजीत मुसळे, अण्णा कोदे, चारुदत्त साटम आदी उपस्थित होते.
यावेळी समीर नलावडे म्हणाले, सिंधुदुर्ग जिल्ह्यात पर्यटन महोत्सव घेण्याची संकल्पना माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचीच आहे. त्यामुळे त्यांचा तसेच आमचा कणकवली पर्यटन महोत्सवाला विरोध असण्याचा प्रश्नच येत नाही. नगरपंचायत फंड हा जनतेने घरपट्टी, पाणीपट्टी अशा भरलेल्या करातून निर्माण झालेला असतो. त्या फंडातील निधी पर्यटन महोत्सवाला वापरण्याला आमचा विरोध आहे. यापूर्वी आम्ही पर्यटन महोत्सव घेतला. त्यावेळी नारायण राणे यांनी जनतेचे पैसे वापरु नका असे सांगून स्वत: दहा लाख रुपये महोत्सवासाठी दिले होते. आम्ही महोत्सव करीत असताना शहरातील व्यापारी किंवा व्यावसायिकाना निधिसाठी कधी त्रास दिलेला नाही. सन २०११-१२ मध्ये आम्ही पर्यटन महोत्सव घेतला. त्यानंतर रोटरी क्लबने महोत्सव आयोजित केले आहेत.
शहरातील एक सामाजिक संस्था महोत्सव घेत असताना पुन्हा नगरपंचयतीने महोत्सव घेणे बरोबर दिसत नाही. त्यामुळे आम्ही महोत्सव घेतला नाही. मागील अडीच वर्षे आता सत्तेत असलेलेच सत्ताधारी होते. त्यांनी महोत्सव का घेतला नाही ?
नगरपंचायत फंडातून आता पर्यंतच्या पाच नगराध्यक्षानी दरमहा दोन हजार रुपये असे मानधन घेतले आहे. मात्र, मेघा गांगण या अडीच वर्षच नगराध्यक्षा होत्या. त्यामुळे त्यांनी घेतलेल्या मानधनाची रक्कम १ लाख २० हजार रूपये होत नाही. मात्र, कन्हैया पारकर यांच्या बंधुनी ६० महिने नगराध्यक्ष असताना घेतलेल्या मानधनाची रक्कम तेवढी होते. त्यामुळे या मुद्यावर बोलायला ते लायक नाहीत. यापुढे कोणत्याही नगराध्यक्षाने नगरपंचायत फंडातून मानधन घेऊ नये, असा ठराव सभागृहात करायला आमची तयारी आहे. यासाठी कन्हैया पारकर यांनी पुढाकार घ्यावा.
यापूर्वीच्या सभेत शहरातील विकासकामांच्या निविदांना मंजुरी द्यायची होती. यावेळी यांचे सदस्य गैरहजर असतानाही आम्ही उपस्थित राहून मंजुरी दिली आहे. त्यामुळे शहराच्या आस्थेच्या गोष्टी त्यांनी आम्हाला शिकवू नयेत. शहरातील रस्ते गेल्यावर्षीच झाले असते. मात्र, तत्कालीन नगराध्यक्षांच्या विरोधामुळेच ते होऊ शकले नाहीत. मात्र, ६ मे रोजी होणाऱ्या सभेला उपस्थित राहून आम्ही विकासकामांच्या निविदांना मंजुरी देणार आहोत. त्यामुळे ती कामेही लवकरच पूर्ण होतील.
संदेश पारकर नगराध्यक्ष असताना इतरांचा विरोध असताना त्यांच्या अट्टाहासामुळेच आयकॉन गाडी खरेदी करण्यात आली आहे. ती जीर्ण झाल्याने वारंवार दुरुस्तीचे काम करावे लागत आहे. ही गाडी फक्त नगराध्यक्षाच नाहीतर मुख्याधिकारी व कार्यालयीन कामासाठीही वापरली जाते.हे टीका करणाऱ्यांनी लक्षात घ्यावे.
यापूर्वी सुशांत नाईक यांच्यावर भ्रष्टाचाराचा आरोप करणारे रूपेश नार्वेकर त्यांच्या मांडीला मांडी लावून सभागृहात का बसत आहेत? पालकमंत्र्यानी शहरासाठी निधीच दिलेला नसून ते आकडे बोगस आहेत. तर १ कोटी ६७ लाखांच्या निधीस प्रशासकीय मंजुरी मिळाली असली तरी तो निधी आलेला नाही. त्यामुळे सुशांत नाईक यांच्याकडून खोटी माहिती दिली जात आहे. (वार्ताहर)
भ्रष्टाचार केल्याचे सिद्ध करा, अन्यथा राजीनामा द्या!
नगरपंचायतीत भ्रष्टाचार कोणी केला हे जनतेला माहीत आहे. त्यामुळे जनतेनेच सन २००८ साली आम्हाला निवडून देवून भ्रष्टाचार करणाऱ्यांना घरी बसविले होते. या कालावधीत वास्तु रचनाकारालाही जेल मध्ये जावे लागले होते. याचा विसर पडला का? मेघा गांगण यानी भ्रष्टाचार केला असे म्हणणाऱ्यांनी तो सिध्द करावा अन्यथा राजीनामा द्यावा, असे आव्हान समीर नलावडे व मेघा गांगण यांनी यावेळी दिले.
ते काँग्रेसचे नव्हेत !
आम्ही काँग्रेसचे आहोत असे कन्हैया पारकर सांगत असतील तर काँग्रेस नेते नारायण राणे यांचा महोत्सवाच्या निमंत्रण पत्रिकेत उल्लेख का केला नाही? याचे उत्तर द्यावे. त्यांच्यासह पाच नगरसेवक काँग्रेसमध्ये नसून त्यांच्यावर पक्ष विरोधी कृत्य केल्याबद्दल कारवाई सुरु आहे,असे समीर नलावडे म्हणाले.