कुशल हातांची जादू घडवतेय म्युरल पेंटिंग्ज अन् शिल्पं

By admin | Published: April 28, 2015 10:16 PM2015-04-28T22:16:26+5:302015-04-28T23:47:23+5:30

प्रकाश राजेशिर्के : कला अन् श्रमाला इथे कशाचीच तोड नाही...

Mural Paintings and crafts | कुशल हातांची जादू घडवतेय म्युरल पेंटिंग्ज अन् शिल्पं

कुशल हातांची जादू घडवतेय म्युरल पेंटिंग्ज अन् शिल्पं

Next

रत्नागिरी : पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्याचे नैसर्गिक सौंदर्य, गड-किल्ले, मंदिरे, पारंपारिक लोकसंस्कृती आणि खाद्य संस्कृती आदींविषयी मध्यवर्ती ठिकाणी असणाऱ्या मनोरूग्णालयाच्या भिंतीवर चित्रे साकारले जात आहेत. ही चित्रे पर्यटकांचे आकर्षण ठरावी, यासाठी या पर्यटन चित्र-शिल्प प्रकल्पाचे प्रमुख, सावर्डेच्या सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट या चित्रशिल्प कला महाविद्यालयाचे माजी प्राचार्य प्रा. प्रकाश राजेशिर्के आपल्या २० विद्यार्थ्यांच्या चमूसह अहोरात्र मेहनत घेत आहेत.
रत्नागिरी या प्रमुख जिल्हा ठिकाणाचे महत्त्व वाढावे, त्याचे चांगल्या प्रकाराने सौंदर्यीकरण, सुशोभीकरण होऊन कोकणी संस्कृतीचा आस्वाद देश-विदेशातील, विविध राज्यांतील पर्यटकांनी घ्यावा व पर्यटन विकासाच्या बाबतीत लक्ष वेधले जाईल, हा महोत्सवामागचा हेतू आहे. यादृष्टीने या महोत्सवानिमित्त रत्नागिरी जिल्ह्यातील सह्याद्री पर्वताच्या रांगा आणि समुद्रकिनाऱ्यांचे नैसर्गिक सौंदर्य, ऐतिहासिक वारसा लाभलेले गड-किल्ले, मंदिरे, कोकणातील पारंपारिक लोकसंस्कृती आणि खाद्य संस्कृती, पक्षी, प्राणी, जलचर यांचे जीवन रत्नागिरीच्या प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या सुमारे ३५० फूट ६ फूट लांबीच्या भव्यदिव्य अशा नवीन संरक्षक भिंंतीवर चितारले जात आहे. आगळ्यावेगळ्या पद्धतीने म्युरल पेंटिंगच्या तंत्राने व आकर्षक चित्रांनी रंगवण्यात येणाऱ्या या भिंंती या पर्यटन महोत्सवासाठी येणाऱ्या लाखो पर्यटकांचे लक्ष वेधून घेतील आणि त्यांचे स्वागत करतील, असा विश्वास जिल्हा प्रशासनाला आहे.
ही म्युरल पेंटिंग्ज व जांभा दगडातील शिल्पे साकारण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी., व त्यांचे प्रशासकीय सहकारी यांनी सुप्रसिद्ध चित्रकार-शिल्पकार, प्रमुख प्रकल्प संकल्पनाकार म्हणून प्रा. प्रकाश राजेशिर्के यांची निवड केली. या पर्यटन चित्र-शिल्प प्रकल्पाचे प्रमुख म्हणून प्रा. प्रकाश राजेशिर्के काम पाहत असून त्यांना चित्रकार परशुराम गावणंग प्रमुख सहाय्यक म्हणून सहकार्य करीत आहेत. शिल्पकार संदीप ताम्हणकर, प्रा. रुपेश सुर्वे, चित्रकार दिनेश बांद्रे, श्रीकांत कांबळे, चित्रकार विक्रांत बोथरे, संकेत साळवी, अक्षय ढेरे ही कलाकार मंडळी सहाय्यक कलाकार म्हणून सहकार्य करत आहेत. या संपूर्ण प्रकल्पाचे प्रकाश छायाचित्रकार म्हणून दिगंबर आंबेकर काम पाहत आहेत. त्याचबरोबर या चित्रशिल्प कला महाविद्यालयाचे उदयोन्मुख कला विद्यार्थी संदेश मोरे, वैभव निर्मळ, करण शेट्ये, सुरज दहिवलकर, नितीन सांबरे, विश्वजित कदम व साईराज वाडकर आणि देवरुखच्या डी-कॅड या महाविद्यालयाचे उदयोन्मुख विद्यार्थी रुपेश परुळेकर, सर्वेश सावंत, राहुल कळंबटे, अमोल पाडळकर हे या प्रकल्पात महत्त्वपूर्ण अशा रंगरेखाकाम व शिल्पकामाच्या योगदानाबरोबरच म्युरल पेंटिंगच्या तसेच कोकणातील जांभा दगडातील शिल्पकलेच्या व्यावसायिक कलेची अनुभूती घेत आहेत.
जिल्ह्याचे संपूर्ण सौंदर्य म्युरल पेंटिंग्ज आणि शिल्पकला यांच्याद्वारे साकारण्यासाठी प्रा. राजेशिर्के, त्यांचे सहकारी, सावर्डेच्या सह्याद्री स्कूल आॅफ आर्ट या चित्रशिल्प कला महाविद्यालयाचे विद्यार्थी तसेच देवरूख येथील डीकॅडचे विद्यार्थी खूप मेहनत घेत आहेत. (प्रतिनिधी)


चित्रशिल्प प्रकल्पाला सर्व प्रकारचे सकारात्मक सहकार्य करण्यासाठी जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. जिल्हा प्रशासनातील त्यांचे सहकारी प्रांताधिकारी रवींद्र हजारे (चिपळूण), अनिल सावंत (दापोली), प्रसाद उकर्डे, (रत्नागिरी), सुशांत खांडेकर (राजापूर), जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. हरीष जगताप, तसेच सर्व तालुक्यांचे तहसीलदार, नायब तहसीलदार आणि सर्व शासकीय कर्मचारीवर्गाची दिवसरात्र धावपळ सुरू आहे.



या पर्यटन महोत्सवाच्या निमित्ताने करण्यात आलेल्या म्युरल पेंटिंगचे तसेच जांभा दगडातील शिल्पाचे जतन करणे, त्याकरिता योग्य ती प्रकाशव्यवस्था, साफसफाई, देखभाल या करिता रत्नागिरी जिल्ह्यातील विविध बँका, कंपन्यांनी स्वत:हून प्रायोजकत्त्व स्वीकारले आहे. या कलाकृतीचे योग्यप्रकारे संरक्षण होईल त्यासाठी जिल्ह्यातील नागरिकांनीही यासाठी चांगल्या प्रकारचे सहकार्य करणे जरुरीचे आहे.
- प्रा. प्रकाश राजेशिर्के .

Web Title: Mural Paintings and crafts

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.