Sindhudurg: पत्नीबरोबरच्या प्रेमसंबंधास विरोध करणाऱ्या पतीचा खून; आरोपीस जन्मठेप
By महेश विद्यानंद सरनाईक | Published: June 22, 2023 06:42 PM2023-06-22T18:42:31+5:302023-06-22T18:59:28+5:30
आरोपीच्या नातेवाईकांनी मयताची पत्नी व मुलांना फितूर करण्याचा प्रयत्न
सिंधुदुर्ग : कामगार विश्वजित कालिपद मंडळ (३४ रा. पश्चिम बंगाल) याचा लोखंडी टिकावाने जबर मारहाण करुन खून करणाऱ्या आरोपी सुखदेव सोपान बारिक (३० रा. उल्हासनगर) यास भा.दं.वि. कलम ३०२ अन्वये जन्मठेप, भा. दं. वि. कलम २०९ अन्वये ३ वर्ष सश्रम कारावास, कलम ३४१ अन्वये १ महिना कारावास व एकूण १२५००- रु. दंड अशी शिक्षा अतिरिक्त सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी सुनावली.
बांदा गडगेवाडी, (ता. सावंतवाडी) येथील मकरंद तोरस्कर यांच्या घरी भाड्याने विश्वजीत कालीपद मंडळ, (मूळ रा. सरईपूर गोलबाघन, जि. परगणा राज्य पश्चिम बंगाल ) हा कामगार आपली पत्नी व दोन मुलांसह राहत होता. सिद्धदोष अपराधी- सुखदेव सोपान बारीक,( रा. उल्हासनगर, मूळ रा. बाजबेलेनी, राज्य पश्चिम बंगाल) याने दि. ५ जून २०२१ रोजी मध्यरात्री विश्वजीत कालीपद मंडळ याच्या घरात प्रवेश करुन, त्याची पत्नी व दोन मुलांना बेडरुममध्ये कोंडून ठेवले आणि मृतास लोखंडी टिकावाने जबर मारहाण करुन त्याचा खून केला आणि पुरावे नष्ट करुन रेल्वेने पळून गेला. याप्रकरणी बांदा पोलिस ठाण्याचे गुन्हा दाखल करण्यात आला.
पोलिस तपासात सुखदेव सोपान बारीक हाच आरोपी असल्याचे निष्पन्न केले. त्यास उल्हासनगर येथून अटक करण्यात आले. गुन्हयाचे तपासात आरोपीचे मृताच्या पत्नीशी प्रेमसंबंध होते. त्या प्रेमसंबंधाबद्दल मृत हा विरोध करत होता, म्हणून आरोपीने जिवे ठार मारल्याचे निष्पन्न झाले.
सरकारतर्फे १२ महत्त्वाचे साक्षीदार तपासण्यात आले. आरोपीच्या नातेवाईकांनी मयताची पत्नी व मुलांना फितूर करण्याचा प्रयत्न केला होता. तथापि, सरकारी पक्षाच्यावतीने घेण्यात आलेल्या उलट तपासात महत्वाच्या कबुल्या मिळून अखेर सत्य बाहेर आले. अति. सत्र न्यायाधीश सानिका जोशी यांनी याप्रकरणी आरोपीस शिक्षा सुनावली.