Sindhudurg Crime: मृतदेहाची विल्हेवाट लावायला आंबोलीत आला, अन् स्व:ताच दरीत कोसळला

By अनंत खं.जाधव | Published: January 31, 2023 07:16 PM2023-01-31T19:16:23+5:302023-01-31T19:46:01+5:30

पोलिसांनी एकाला ताब्यात घेतले असून त्याची कसून चौकशी सुरु

Murder of one due to financial dispute, Another collapsed while dumping the dead body in the valley in Amboli | Sindhudurg Crime: मृतदेहाची विल्हेवाट लावायला आंबोलीत आला, अन् स्व:ताच दरीत कोसळला

Sindhudurg Crime: मृतदेहाची विल्हेवाट लावायला आंबोलीत आला, अन् स्व:ताच दरीत कोसळला

googlenewsNext

आंबोली : सातारा जिल्ह्यातील कराड येथील युवकाने पंढरपूर येथील आपल्या मित्राला दिलेल्या पैशावरून झालेल्या वादाचे रूपांतर हाणामारीत झाले. त्यानंतर पंढरपूर येथील मित्राचा मृत्यू झाला. तो मृतदेह मित्राला सोबत घेऊन आंबोली घाटात टाकण्यासाठी आल्यावर पाय घसरून दरीत पडून कराडमधील युवकाचाही मृत्यू झाला.

ही नाट्यमय घटना या घटनेतील तिसऱ्या साक्षीदार युवकाने पोलिसांना सांगितल्यानंतर पोलिसांनी रेस्क्यू टीमच्या साहाय्याने दोन्ही मृतदेह दरीतून काढले. सोमवारी रात्री घडलेली ही घटना मंगळवारी उघडकीस आली.

कराड येथील भाऊसो अरुण माने (३०) याने वीट कामगारांचा पुरवठा करण्यासाठी पंढरपूर येथील आपला मित्र सुशांत खिल्लारे (२८) याच्यासमवेत आर्थिक व्यवहार केले होते. जी रक्कम काही लाखांमध्ये होती. ही रक्कम सुशांतला दिली होती. परंतु वर्षभर तो पैसे परत देत नव्हता व सांगितलेले कामही करत नसल्याने भाऊसो यांनी रविवारी सुशांत खिल्लारे याला पंढरपूर येथून कराड येथे निर्जनस्थळी बोलावून घेतले. यावेळी मित्र तुषार पवार (२८) त्यांच्यासोबत होता.

आपल्या व्यवहाराचे काय झाले ? असे विचारणा करत बेदम मारहाण केली यात सुशांतचा मृत्यू झाला. हे पाहून त्यांनी मृतदेह घरातच ठेवला. याच परिस्थितीत दोघेही घाबरल्यामुळे त्यांनी मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी सावंतवाडी तालुक्यातील आंबोली गाठण्याचे ठरवले व ते मृतदेहासह कराडहून सोमवारी रात्री आंबोली घाटात पोहोचले.

आंबोली घाटातील मुख्य धबधब्यापासून सावंतवाडीच्या दिशेने एक किलोमीटर गेल्यानंतर त्यांनी गाडी चालूच ठेवून रात्री आठ वाजण्याच्या सुमारास अंधारात मृतदेह खाली फेकण्यासाठी बाहेर काढला व संरक्षक कठड्यावर उभे राहिले. मृतदेह फेकताना सुशांतचा मृतदेह तर खाली फेकला गेलाच परंतु त्याच वेळेस तोल गेल्याने भाऊसो माने सुद्धा दरीमध्ये कोसळला . तुषार मात्र यातून बचावला त्याने स्वतःला सावरले.

रेस्क्यू टीमच्या मदतीने मृतदेह बाहेर काढले

तुषारने दरीत कोसळलेला आपला मित्र भाऊसो याला हाका मारल्या. परंतु कोणताही उपयोग झाला नाही. तुषार याने चालू असलेली गाडी तशीच पुढे पूर्वीचा वस मंदिर येथे आणली व गाडी बंद केली. यानंतर तुषारने घडलेला प्रकार भाऊसो याच्या नातेवाइकांना सांगितला. त्यांनी लागलीच याबाबत पोलिसांना माहिती दिली.

मंगळवारी दुपारी एक वाजताच्या सुमारास आंबोली पोलिसांना याबाबत कराड पोलिसांकडून माहिती देण्यात आल्यानंतर तत्काळ आंबोली पोलिस व आंबोली रेस्क्यू टीम मार्फत घटनास्थळी शोध मोहीम सुरू केली. घटनास्थळी शोधत असताना रेस्क्यू टीमला दोन मृतदेह आढळून आले, सायंकाळी चार वाजेपर्यंत दोन्ही मृतदेह वर काढण्यात आले. मृतदेह शवविच्छेदनासाठी सावंतवाडी येथे पाठविण्यात आले.

शोध पथकात यांचा समावेश

यावेळी सावंतवाडी पोलिस निरीक्षक फुलचंद मेंगडे, उपनिरीक्षक अमित गोते, आंबोली पोलिस हवालदार दत्तात्रय देसाई, पोलिस कॉन्स्टेबल दीपक नाईक, दीपक शिंदे तसेच आंबोली रेस्क्यू टीमचे मायकल डिसूजा, उत्तम नार्वेकर, हेमंत नार्वेकर, विशाल बांदेकर, संतोष पालेकर, राजू राऊळ, अजित नार्वेकर आधी उपस्थित होते.

Web Title: Murder of one due to financial dispute, Another collapsed while dumping the dead body in the valley in Amboli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.