दोन परप्रांतीय कामगारांचा खून; दोघांना अटक
By Admin | Published: January 20, 2017 10:55 PM2017-01-20T22:55:52+5:302017-01-20T22:55:52+5:30
अनैतिक संबंधातून घटना : रोणापाल येथील जंगलात आढळले मृतदेह; सर्वजण केरळ राज्यातील
बांदा : आपल्या पत्नीसोबत असलेल्या अनैतिक संबंधाच्या रागातून आपल्या सहकाऱ्याला विचारणा केल्याने रोणापाल-साखरमैना येथील जंगलात झोपडीत राहणाऱ्या परप्रांतीय कामगारांमध्ये वाद झाले. त्यातील दोघाजणांचा धारदार हत्याराने खून केल्याची घटना शुक्रवारी दुपारी उघडकीस आली. ही घटना रोणापाल गावापासून सुमारे ४ कि.मी. अंतरावर जंगलात घडली.
बांदा पोलिसांनी तातडीने घटनास्थळी खून करून फरार झालेल्या दोघांना पेडणे रेल्वे ट्रॅकवरून शिताफीने ताब्यात घेतले. बांबूची तोड करणाऱ्या व्यापाऱ्याकडे हे कामगार काम करणारे असून, दोघांनी खुनाची कबुली दिली आहे.
यामध्ये रेवी (वय ४0) व चंद्रन (४५) (दोघे रा. आर्लम पार्क, जि. कन्नूर, केरळ) अशी खून झालेल्यांची नावे आहेत. बांदा पोलिसांनी तेथीलच झाडीत लपून बसलेल्या संतोष (४0) व केरळ येथे पळून जाण्याच्या तयारीत असलेला मुख्य संशयित साजी (४२) याला पेडणे रेल्वे ट्रॅकवरून ताब्यात घेतले. खुनाची घटना घडण्यापूर्वी झटापटीत उर्वरित दोन मृत रेवी याने साजीला आपल्या पत्नीशी असलेल्या अनैतिक संबंधाचा जाब विचारला. मद्यप्राशन केल्याने दोघांमध्ये प्रचंड वाद झाला, त्याचे पर्यवसान हाणामारीत झाले. साजी याने धारदार कुुदळीच्या साहाय्याने रेवी याच्या मानेवर घाव घातला. तसेच त्याच्या अंगाचा ठिकठिकाणी चावा घेतला. यामध्ये रेवी याचा जागीच मृत्यू झाला. साजी व रेवी यांच्यातील भांडणे सोडविण्यासाठी गेलेला चंद्रन याच्या देखील डोक्यावर कुदळीने वार केल्याने त्याचाही जागीच मृत्यू झाला. या खून प्रकरणात संतोष याने साजीला मदत केली. दोघांवर वार करताना संतोष याने दोघांना पाठीमागून घट्ट पकडले होते. यावेळी साजी याने उर्वरित दोघे कामगार असलेले मोहन व गोबालन यांच्यावर देखील हल्ला करण्याचा प्रयत्न केला. मात्र ते तेथून पळून जाण्यात यशस्वी झाले. हे प्रकरण शुक्रवारी उघडकीस आले.
घटनेची माहिती मिळताच अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक प्रकाश गायकवाड, उपविभागीय पोलिस अधिकारी दयानंद गवस, बांदा पोलिस निरीक्षक प्रदीप गीते, एलसीबीचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विश्वजित कार्इंगडे, उपनिरीक्षक सचिन नावडकर यांच्यासह पोलिस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला.
पोलिसांनी दुभाषीच्या मदतीने माहिती घेतली
खून प्रकरणात जखमी झालेले परप्रांतीय कामगार हे केरळीयन असल्याने त्यांना केवळ केरळीयन भाषा येत होती. त्यामुळे पोलिसांसमोर भाषेचा अडसर निर्माण झाला. बांदा येथील केरळ व्यावसायिक असलेले राजेंद्र यांना पोलिसांनी पाचारण केले. त्यानंतर पोलिसांनी दुभाषीच्या मदतीने घटनेची सविस्तर माहिती घेतली.
झोपडीच्या बाहेर रक्ताचा सडा
परप्रांतीय कामगारांच्या झोपडीबाहेर दोघांचा खून करण्यात आल्याने रक्ताचा सडा पडला होता. रेवी याचा झोपडीच्या दारातच खून करण्यात आला. त्याच्या मानेवर व पोटावर खोलवर वार करण्यात आला होता. त्यानंतर झोपडीपासूून १०० फूट अंतरावर पाठलाग करून चंद्रन याचा खून करण्यात आला. चंद्रन याच्या उजव्या खांद्यावर व डोक्यावर खोलवर वार करण्यात आला. खुनासाठी साजी याने कुदळ व कोयत्याचा वापर केला होता. खून केल्यानंतर त्याने कुदळ व पार जवळच्याच झाडीत फेकून दिले होते. पोलिसांनी दोन्ही हत्यारे उशिरा ताब्यात घेतली. सायंकाळी उशिरापर्यंत घटनास्थळाचा पंचनामा सुरू होता. घटनास्थळी श्वान पथकाला देखील पाचारण करण्यात आले होते.
दोघा संशयितांना घेतले ताब्यात
घटनेची सविस्तर माहिती घेतल्यानंतर बांदा पोलिसांनी तपासाची चक्रे जोरदार फिरविली. दुसरा संशयित असलेला संतोष हा घटनास्थळापासून जवळच असलेल्या झाडीत लपूून बसला होता. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. मात्र तो असंदिग्ध माहिती देत होता. मुख्य संशयित असलेला साजी याला पेडणे येथे रेल्वे ट्रॅकवरून ताब्यात घेण्यात आले. शुक्रवारी सकाळी तो प्रथम मडुरा रेल्वेस्थानकावर गेला. तेथे सुनील मडुरकर यांच्याकडून त्याने पिण्यासाठी पाणी घेतले, तसेच केरळ येथे जाणाऱ्या रेल्वेची चौकशी केली. तो ट्रॅकवरून गोव्याच्या दिशेने चालत निघाला. मडुरकर यांना संशय आल्याने त्यांनी याची माहिती बांदा पोलिसांना दिली.