प्रेमप्रकरणातून तरुणाचा सपासप वार करून खून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2015 11:53 PM2015-04-16T23:53:54+5:302015-04-17T00:03:31+5:30
रत्नागिरीतील घटना : कारमधूून आलेल्या हल्लेखोरांचे कृत्य; कारसह चालक ताब्यात
रत्नागिरी : शहरातील मारुती मंदिरजवळील हिंदू कॉलनीत बांधकाम सुरू असलेल्या अपार्टमेंटच्या तळमजल्यावर गुरुवारी भर दुपारी साडेबारा वाजता सात ते आठजणांनी एका कामगार तरुणाचा धारदार हत्याराने भोसकून निर्घृण खून केला. विनायक कल्लाप्पा घाडी (वय २८, मूळ रा. बेळगाव, सध्या रा. शांतीनगर, रत्नागिरी) असे मृत कामगाराचे नाव आहे. हल्लेखोर नॅनो कार व दोन दुचाकींवरून आले होते. प्रेमप्रकरणातून हा खून झाल्याचा पोलिसांचा प्राथमिक अंदाज असून, याप्रकरणात वापरलेली नॅनो कार व कारचा मालक सिद्धेश प्रमोद घाग याला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. दोन दुचाकींचा पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी रामचंद्र लवू घाडी (५०, नेरसे, बेळगाव सध्या रा. शांतीनगर) यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, गुरुवारी दुपारी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास काही तरुण विनायक घाडी राहत असलेल्या शांतीनगर येथील रसाळ चाळीत आले. विनायक घाडी कोठे कामाला गेलाय याबाबत माहिती घेतली. काहीतरी काम असेल, असे वाटल्याने शेजारी राहणाऱ्यांनीही हिंदू कॉलनीतील कामाचे ठिकाण सांगितले. त्यानंतर दुपारी सव्वाबारा वाजण्याच्या सुमारास पोपटी रंगाच्या नॅनो कारमधून अपार्टमेंट बांधकामाच्या ठिकाणी आले. नॅनोतील तरुण खाली उतरून थेट अपार्टमेंटच्या तळमजल्यावर पोहोचले. तेथे अन्य कामगारही काम करीत होते. अपार्टमेंटच्या चौथ्या मजल्यावर अनेक कामगार काम करीत होते. त्यातील काहीजणांनी नॅनोमधून आलेल्या या तरुणांना पाहिले होते. मात्र, ते कोणाला तरी भेटायला आले असतील, असे समजून त्यांनी फारशी दखल घेतली नाही. तळमजल्यावर काम करणाऱ्यांपैकी विनायक कोण, असे विचारत हे तरुण त्याच्यापर्यंत पोहोचले. त्याच्याशी बाचाबाची झाली. त्यावेळी तेथील काही कामगारांनी त्यात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आम्ही त्याच्याशी बोलतोय, त्याच्याकडेच आमचे काम आहे, तुम्ही मध्ये पडू नका, असे सांगितले. काही क्षणांत त्यातील एका तरुणाने धारदार हत्यार विनायकच्या उजव्या मांडीत आरपार घुसविले. दुसऱ्या बाजूने हे हत्यार बाहेर आल्याच्या खुणा मृतदेहावर आहेत. त्याच्या कंबरेवर व हातावरही वार करण्यात आला आहे. त्याच्या हातालाही गंभीर दुखापत झाली. त्यानंतर नॅनो कारमधून व दुचाकीवरून हे सर्व हल्लेखोर पसार झाले.
नातेवाइकांचा आक्रोश
विनायक याचा भाऊ व चुलते हे मूूळ नेरसे बेळगाव (कर्नाटक)चे असून, गेल्या २० वर्षांपासून ते रत्नागिरीत बांधकाम क्षेत्रात कारागीर म्हणून काम करीत आहेत. याच कुटुंबातील विनायक हा गेली काही वर्षे इमारतीचे प्लास्टरचे काम करीत होता. या कामात तो तरबेज होता. स्वभावाने तो भित्रा होता, असे त्याच्या नातेवाइकांनी सांगितले. गेल्या काही दिवसांपासून रत्नागिरीपासून जवळच असलेल्या कुरतडे गावातील् मुलीच्या प्रेमात पडला होता. त्यातून काही वादविवादही निर्माण झाले होते. परंतु, हे प्रकरण मिटविले होते, असे जिल्हा रुग्णालयात टाहो फोडणाऱ्या त्याच्या भावानेच स्पष्ट केले, असे असताना त्याच्यावर हल्ला का केला, असा सवालही त्याचे नातेवाईक करीत होते.
हल्लेखोरांचा शोेध सुरू
हल्लेखोरांनी शांतीनगर येथे एका तरुणाकडे विनायकबाबत चौकशी केली होती. त्या हल्लेखोरांपैकी एकाला ओळखत असल्याची माहिती संबंधित तरुणाने पोलिसांना दिली असून, त्यावरून हल्लेखोरांचा शोध पोलिसांनी सुरू केला आहे.
प्रेमाच्या त्रिकोणातून खून?
विनायकने प्रथमच या अपार्टमेंटच्या प्लास्टरिंग कामाचे स्वतंत्र कंत्राट घेतले होते. त्याचे एका मुलीवर प्रेम होते. मात्र, त्याच मुलीवर आणखी एका मुलाचे प्रेम असल्याची चर्चा सुरू असून, विनायकचा खून हा प्रेमाच्यात्रिकोणातून झाल्याची चर्चा सुरू झाली आहे.
कारचालक ताब्यात
कार व मालक सिद्धेश घाग ताब्यात असून, त्याची चौकशी सुरू आहे. अन्य दोन दुचाकी व त्यावरील चौघेजण कोण याचाही शोध पोलीस घेत आहेत. १० कामगारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.