दु:ख विसरायला लावते संगीत कला
By admin | Published: March 7, 2017 09:39 PM2017-03-07T21:39:13+5:302017-03-07T21:39:13+5:30
गोरखनाथ सावंत : शारदा संगीत विद्यालयाचे पारितोषिक वितरण
दोडामार्ग : संगीत कला माणसाला दु:ख विसरायला लावते. मन निरागस व स्वच्छ होण्यासाठी विद्यार्थ्यांनी संगीत शारदेची आराधना करणे गरजेचे आहे. माणसांना एकत्र आणण्याचे काम या माध्यमातून करता येते, असे उद््गार गोरखनाथ सावंत यांनी काढले.
साटेली (ता. दोडामार्ग) येथील शारदा संगीत विद्यालयाच्या वार्षिक पारितोषिक वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. गोरखनाथ सावंत यांनी अल्लारखाँ इन्स्टिट्यूट, मुंबई येथून संगीत विशारद पदवी मिळविली आहे. तसेच ख्यातनाम तबलावादक उस्ताद झाकीर हुसेन व फजल कुरेशी या पंडितांकडून त्यांनी तबलावादनाचे धडे घेतले आहेत.
या पारितोषिक वितरण कार्यक्रमास संगीत विशारद महेश गवस, विद्यालयाचे अध्यक्ष महादेव सुतार, नितीन धर्णे, संतोष घोगळे, नंदकिशोर म्हापसेकर, सदानंद धर्णे, अनंत सुतार, नारायण सुतार, गोपाळ धर्णे, कार्यक्रमाचे संयोजक सतीश धर्णे, शंकर जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली. यावेळी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी आपली कला सादर केली. संकेत गवस, आर्यन देसाई, प्रसाद सुतार, श्रेयश सावंत, राजवर्धन पाटील या विद्यार्थ्यांनी तबल्यावर बंदिशी सादर करून उपस्थितांची मने जिंकली. विद्यालयातर्फे संकेत गवस, आर्यन देसाई या विद्यार्थ्यांना आदर्श विद्यार्थी पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
यावेळी साटेली पंचक्रोशीतील संगीत शारदेच्या माध्यमातून आपली सेवा देऊन अनेक वर्षे विद्यार्थी घडवून संगीताची चळवळ चालविणाऱ्या लाडू पांडुरंग मयेकर, रघुनाथ सुतार, पांडुरंग सुतार, सुरेश मयेकर यांचा मानचिन्ह व सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय गांधर्व विद्यालय मंडळ, मुंबई यांच्या प्रारंभिक परीक्षेत ज्या विद्यार्थ्यांनी यश मिळविले, त्यांचाही गौरव केला. शारदा संगीत विद्यालय हे ग्रामीण भागात चांगले काम करीत आहे याबद्दल या मंडळाचे अध्यक्ष महादेव सुतार यांना धन्यवाद देत ही चळवळ अशीच सुरू ठेवण्यासाठी महेश गवस यांनी शुभेच्छा दिल्या व विद्यार्थ्यांनी कायम शिकण्याची वृत्ती जोपासावी, असा सल्ला दिला. घोगळे, म्हापसेकर, जाधव यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक महादेव सुतार यांनी, तर सूत्रसंचालन सतीश धर्णे यांनी केले. शेळके यांनी आभार मानले.(प्रतिनिधी)
गोरखनाथ, महेश यांची जुगलबंदी रंगली
या कार्यक्रमादरम्यान गोरखनाथ सावंत आणि महेश गवस या तबला विशारदांनी ताल-तीन तालमध्ये स्वतंत्र तबलावादन करून कार्यक्रमात रंगत आणली.
कायदे-रेले, तुकडे-मुखडे तसेच तबल्याच्या बंदिशीमध्ये घोड्यांच्या टापांचा आवाज, रेल्वेचा आवाज, निसर्गाच्या लयींच्या बंदिशीही त्यांनी सादर केल्या. उपस्थितांनी त्यांना उभे राहून दाद दिली.
अनेक वर्षे विद्यार्थी घडवून संगीताची चळवळ चालविणाऱ्यांचाही यावेळी मानचिन्ह व सन्मापत्र देऊन गौरविण्यात आले.
ज्या विद्यार्थ्यांनाही यश मिळविले त्यांचाही सत्कार करण्यात आला.