आचरेकर प्रतिष्ठानतर्फे कणकवलीत ९ फेब्रुवारी पासून संगीत महोत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2019 02:55 PM2019-02-07T14:55:55+5:302019-02-07T15:20:47+5:30
कणकवली येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या २१ व्या संगीत महोत्सवाची रुपरेषा जाहीर झाली आहे. ९ते १० फेब्रुवारी या कालावधीत येथील प्रतिष्ठानच्या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात शास्त्रीय गायक पं. शौनक अभिषेकी यांचे गायन आणि हार्मोनियम वादक सुधीर नायक यांचे एकल हार्मोनियम वादन होणार आहे.
कणकवली : येथील वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या २१ व्या संगीत महोत्सवाची रुपरेषा जाहीर झाली आहे. ९ते १० फेब्रुवारी या कालावधीत येथील प्रतिष्ठानच्या संगीत महोत्सवाचे आयोजन करण्यात आले असून यात शास्त्रीय गायक पं. शौनक अभिषेकी यांचे गायन आणि हार्मोनियम वादक सुधीर नायक यांचे एकल हार्मोनियम वादन होणार आहे.
पं. शौनक अभिषेकी
वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठानने कोकणातील संगीत रसिकांची अभिजात संगीताची आवड जोपासली जावी यासाठी २१ वर्षांपूर्वी संगीत महोत्सवाला प्रारंभ केला. दरवर्षी दिग्गज कलाकारांच्या मैफली आयोजित करून हा महोत्सव दरवर्षी गुणात्मक दृष्ट्या उंचावत नेला.
याहीवर्षी हा संगीत महोत्सव दिमाखदारपणे होणार आहे. शनिवार ९ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या हस्ते संगीत महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. यावेळी नगरपंचायतीचे मुख्याधिकारी मनोज उकिर्डे, पं.जितेंद्र अभिषेकी सघनगान शिक्षण केंद्राचे गुरु समीर दुबळे यांना प्रमुख पाहुणे म्हणून निमंत्रित करण्यात आले आहे.
सुधीर नायक
महोत्सवाच्या पहिल्या दिवशी उद्घाटनानंतर सुधीर नायक यांची हार्मोनियम कार्यशाळा होणार आहे. रविवार १० फेब्रुवारी रोजी 'भैरवी दर्शन' हा कार्यक्रम होणार असून यात वसंतराव आचरेकर सांस्कृतिक प्रतिष्ठान संस्थेच्या पं.जितेंद्र अभिषेकी सघनगान शिक्षण केंद्रातील पं.समीर दुबळे यांचे विद्यार्थी ईश्वरी तेजम, मनोज मेस्त्री, विश्रांती कोयंडे, डॉ. समीर नवरे, मृदुला तांबे, उमेश परब, नीलेश धाक्रस आदींचे गायन आयोजित करण्यात आले असून यावेळी पं. दुबळे हे हेही आपले गायन सादर करणार आहेत.
अनुजा झोकरकर
त्यांनतर पंडित जितेंद्र अभिषेकी स्मृती संगीत संमेलन आयोजित करण्यात आले आहे. यात अनुजा झोकरकर आणि ईश्वरी तेजम यांचे गायन तर सुधीर नायक यांचे एकल हार्मोनियम वादन होणार आहे. त्यानंतर पं. शौनक अभिषेकी यांच्या गायनाची मैफल आयोजित करण्यात आली आहे.
या संगीत संमेलनाला माधव गावकर यांची संवादिनी साथ तर चारुदत्त फडके, प्रसाद करंबेळकर यांची तबलासाथ लाभणार आहे. संगीत रसिकांनी आचरेकर प्रतिष्ठानच्या या संगीत महोत्सवाला उपस्थित रहावे असे आवाहन आचरेकर प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष ऍड.एन.आर.देसाई व कार्यवाह शरद सावंत यांनी केले आहे.