‘स्नेहज्योती’मुळे संगीत डोळस
By admin | Published: January 6, 2016 11:58 PM2016-01-06T23:58:51+5:302016-01-07T00:52:49+5:30
अंध विद्यार्थ्यांचा सहभाग : ‘खल्वायन’ची मासिक संगीत सभा
रत्नागिरी : ‘खल्वायन’ची सलग २१५वी मासिक संगीत सभा दि. ९ जानेवारी रोजी होणार आहे. या सभेमध्ये स्नेहज्योती अंध विद्यालयातर्फे शास्त्रीय संगीताचा कार्यक्रम सादर केला जाणार आहे. हा कार्यक्रम गोदुताई जांभेकर विद्यालयात सायंकाळी ७ वाजता होणार आहे. स्नेहज्योतीचे संगीत शिक्षक व विद्यार्थ्यांचा या कार्यक्रमात सहभाग असणार आहे. या कार्यक्रमात सहभागी होणारे मनिष व्याघ्रांबरे हे एम. ए. संगीत, तबला विशारद असून, त्यांचे सुगम रत्नपर्यंत शिक्षण झाले आहे. सध्या ते संगीत शिक्षक म्हणून स्नेहज्योतीमध्ये कार्यरत आहेत. यापूर्वी ते नागपूर, अकोला येथे १५ वर्षे संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते. गणेश काकडे हे संगीत विशारद असून, तबला व हार्मोनियमच्या दोन परीक्षा पास झाले आहेत. स्नेहज्योतीत ते संगीत शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते पुणे येथील आनंद गुरुकुल इंग्लिश मीडियममध्ये संगीत शिक्षक म्हणून कार्यरत होते.
या कार्यक्रमात सहभागी होणारे राकेश सोळंकी हे तबला शिक्षक आहेत. ते उपांत्य विशारद तबला व गाण्यांच्या दोन परीक्षा पास झाले आहेत. आशिका शेडगे ही मध्यमा गायन, तबल्याच्या दोन परीक्षा व उत्कृष्ट हार्मोनियम प्लेअर आहे. ती इयत्ता ९वी मध्ये शिकते तर संजना वाळणकर ही गायनाच्या तीन परीक्षा, उत्कृ ष्ट तबला व हार्मोनियम प्लेयर असून, ती इयत्ता १०वीत आहे. या कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा, असे आवाहन केले आहे. (प्रतिनिधी)