माझे कर्ज लाखांमध्ये, कोटीत नाही, विकास सावंत यांचा राणेना टोला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 17, 2017 09:41 PM2017-09-17T21:41:12+5:302017-09-17T23:06:48+5:30
काँग्रेस नेते नारायण राणे माझ्या कोणत्या कर्जाबाबत बोलतात मला माहीत नाही. मात्र मी काढलेले कर्ज लाखात आहे. ते कोटीत नाही असा जोरदार टोला सिंधुदुर्ग काँग्रेसचे नूतन अध्यक्ष विकास सावंत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना लगावला.
अनंत जाधव
सावंतवाडी, दि. 17 - काँग्रेस नेते नारायण राणे माझ्या कोणत्या कर्जाबाबत बोलतात मला माहीत नाही. मात्र मी काढलेले कर्ज लाखात आहे. ते कोटीत नाही असा जोरदार टोला सिंधुदुर्ग काँग्रेसचे नूतन अध्यक्ष विकास सावंत यांनी माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांना लगावला. बँकेने कर्ज देताना माझ्याकडून सर्व काही तारण ठेवून घेतले आहे. आणि कर्ज भरले नाही तर आरबीआय रितसर काय ती माझ्यावर कारवाई करेल. संचालकांचा अहवाल दर महिन्याच्या अखेरीस आरबीआयकडे जात असतो, असा खुलासाही त्यानी लोकमत कडे केला ते सावंतवाडी येथे बोलत होते. यावेळी त्यांनी राणेंनी माझ्याशी व्यक्तिगत संबंध तोडल्याने ते सोमवारी जिल्ह्यात आल्यानंतर स्वागताला जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी सावंत म्हणाले, काँग्रेस मला जिल्हाध्यक्ष करेल याची मला माहिती नव्हती. मात्र आता माझ्यावर जबाबदारी टाकलीच आहे तर सर्वांना विश्वासात घेऊन मी काम करणार आहे. नवे-जुने असा कोणताही वाद राहाणार याची काळजी घेईन. पक्षात नव्याने अनेक जण आले पाहिजेत असेच काम करून दाखवेन, असा विश्वास सावंत यांनी व्यक्त केला. प्रदेश काँग्रेसची बैठक सावंतवाडीत आयोजित करण्यात आली होती. या बैठकीचे निमंत्रण तत्कालीन जिल्हाध्यक्ष दत्ता सामंत यांना देण्यात आले होते. मात्र, बोलताना त्यांच्या भ्रमणध्वनीची रेंज गेली. त्यामुळे हा संदेश अर्धवट राहिला. त्यामुळे तो गैरसमज झाल्याचे त्यांनी सांगितले.
ओसरगाव येथे काँग्रेसची जिल्हा कार्यकारिणी झाली. या बैठकीत मी प्रदेश काँग्रेसची बैठक आयोजित केली म्हणून मला टार्गेट करण्यात आले होते. यावरून राणे यांनी माझे तुझ्याशी व्यक्तिगत संबंध तुटले, असे सांगितले. त्यामुळे आता यापुढे हे व्यक्तिगत संबंध जोडणे कठीण असल्यानेच सोमवारी राणे जिल्ह्यात आले तरी त्यांच्या स्वागताला मी पक्षाचा जिल्हाध्यक्ष असलो तरी जाणार नाही, असे स्पष्ट केले. ती सभासद नोंदणी व्हावी यासाठी माझा प्रयत्न राहणार आहे. सभासद नोंदणीची पुस्तके कुठे आहेत ती मला माहीत नाहीत, पण आता ही सभासद नोंदणी होऊ शकते, असे त्यांनी यावेळी सांगितले.
राणे यांनी मी जिल्हा बँकेचा थकीत असल्याचे सांगितले आहे. पण माझे कोणते कर्ज आहे ते त्यांनी सांगावे. ते भाईसाहेब सावंत पतपेढीच्या कर्जाबाबत बोलत असतील तर त्यांनी हे प्रकरण न्यायप्रविष्ट आहे. कोल्हापूर येथील सहकार न्यायालयात जिल्हा बँक विरोधात आमचा खटला सुरू आहे. मग त्याबाबत राणे बोलत असतील तर तो न्यायालयीन प्रकियेचा भाग आहे आणि माझ्यावर व्यक्तिगत टीका करीत असतील तर माझे कर्ज लाखात आहे. कोटीत नाही, असा खुलासाही त्यांनी यावेळी केला आहे.
मी कर्ज घेतले ते वाहनावर आहे. घर तसेच शेतीवर आहे आणि बँकेने माझ्याकडून तारण लिहून घेतले आहे. बँकेकडे तारण असल्याशिवाय कोण कर्जच देत नाही, असेही त्यांनी यावेळी सांगितले. जर मी जिल्हा बँकेचा थकीत कर्जदार असतो, तर आरबीआय मला सोडणार नाही. सर्वांना कायदा सारखाच आहे. दर महिन्याच्या शेवटी संचालक व त्यांच्या नातेवाईकांबाबत अहवाल आरबीआयला द्यावा लागतो आणि बँक देत असते, असेही सावंत यांनी यावेळी सांगितले.