कणकवलीत माय माती, माय माणसं, माय संस्कृती खाद्योत्सव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 11, 2019 10:28 AM2019-03-11T10:28:44+5:302019-03-11T10:30:09+5:30
युरेका सायन्स क्लब कणकवलीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आणि बच्चे कंपनीचा सहभाग असलेल्या 'माय माती, माय माणसं, माय संस्कृती ' खाद्योत्सवाला खवय्यांचा चांगला प्रतिसाद लाभला . तर बच्चे कंपनीने एक आगळा वेगळा अनुभव या खाद्य महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या गाठीशी बांधला.
कणकवली : युरेका सायन्स क्लब कणकवलीच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या आणि बच्चे कंपनीचा सहभाग असलेल्या 'माय माती, माय माणसं, माय संस्कृती ' खाद्योत्सवाला खवय्यांचा चांगला प्रतिसाद लाभला . तर बच्चे कंपनीने एक आगळा वेगळा अनुभव या खाद्य महोत्सवाच्या निमित्ताने आपल्या गाठीशी बांधला.
कणकवली येथील जिल्हा परिषद बांधकाम विभाग कार्यालयाच्या आवारात गावठी आठवडा बाजाराच्या ठिकाणी रविवारी या खाद्योत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. विस्मृतीत गेलेल्या पारंपारीक वस्तू , मालवणी खाद्यसंस्कृतीतील पर्यावरण पुरक वस्तू या खाद्योत्सवाच्या ठिकाणी ठेवण्यात आल्या होत्या. या खाद्योत्सवाचे आयोजन करण्यात इयत्ता पहिली ते नववीच्या विद्यार्थ्यांचा मोठ्या प्रमाणात सहभाग होता.
यामध्ये जयवर्धन केणी , कल्पक फणसळकर, प्रसाद गावडे, श्रेयश रूईकर, उर्वी गवाणकर, वैष्णवी माणकर, तेजस शेट्टी, युक्ता देसाई, सार्थ खानोलकर, अर्थव बोर्डवेकर, मैथीली यादव, इक्रा नाईक, आर्या मांजरेकर, सतेज शेट्टी, आदित्य रेवडेकर, वेद वाळके आदी विद्यार्थी सहभागी झाले होते. या विद्यार्थ्यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या साथीने विविध खाद्यपदार्थ विक्रीचा अनुभव घेतला आणि आनंद लुटला.
भारतीय परंपरा जोपासण्याच्यादृष्टीने हा खाद्योत्सव आयोजित करण्यात आला होता. त्याठिकाणी पारंपारीक वस्तूचे प्रदर्शन व पदार्थांची विक्री करण्यात आली . मुलांना लहान वयातच व्यवहारिक ज्ञान मिळण्याच्या दृष्टीने हा खाद्योत्सव महत्वपूर्ण ठरला.
उकडीचे मोदक, आंबोळी, शाकाहारी तसेच मांसाहारी खाद्यपदार्थ, शोभेच्या वस्तूंचे स्टॉल या खाद्योत्सवात उभारण्यात आले होते. त्यांना कणकवलीतील नागरिकांचा चांगला प्रतिसाद लाभला.
कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे, नगरसेवक अबीद नाईक, संजय मालंडकर , ज्येष्ठ व्यापारी अपिशेठ गवाणकर, सुषमा केणी, ऍड. विलास परब , ऍड. मिलिंद सावंत, दादा पालकर, डॉ. निलेश कोदे आदी मान्यवरांनी या खाद्योत्सवाला भेट दिली. तसेच बच्चे कंपनीच्या या उपक्रमाचे कौतुक केले.