शवविच्छेदनातून उलगडले खुनाचे रहस्य
By admin | Published: June 28, 2015 12:35 AM2015-06-28T00:35:52+5:302015-06-28T00:36:07+5:30
न्हावेलीतील प्रकार, चौकशीसाठी मुलगा ताब्यात
सावंतवाडी : न्हावेली-विवरवाडी येथील पास्तू किस्तू फर्नांडिस (वय ५५) यांचा डोक्यात जड वस्तूने प्रहार करीत खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. हा प्रकार शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडला असून, शनिवारी ही घटना उघडकीस आली. सुरुवातीला पोलिसांना अपघात असे सांगण्यात आले होते. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती, पण नंतर शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर हा खून असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी याप्रकरणी चौकशीसाठी पास्तू यांचा लहान मुलगा सालू फर्नांडिस याला ताब्यात घेतले आहे.
न्हावेली-विवरवाडी येथे पास्तू फर्नांडिस पत्नी व दोन मुलांसह राहत होते. यातील सालू हा गोव्यात वेल्डिंगचे काम करतो. जॉकी हा मोठा मुलगा गोवा न्हावेली येथे किराणा दुकानात कामाला आहे.
पास्तू यांची पत्नी आजारी असून तिला ऐकायलाही येत नाही. पास्तू यांना दारूचे व्यसन असल्याने ते नेहमी मद्यपान करीत असत. शुक्रवारी रात्रीच्या सुमारास सालू व त्याच्या आईने एकत्रित जेवण केले. त्यानंतर पास्तू यांनी आपण जरा बाहेर जाऊन येतो, असे सांगितले; परंतु ते उशिरापर्यंत आले नाही.
पास्तू यांचा मुलगा व त्याची आई आतील खोलीत झोपतात. पास्तू हे बाहेरच्या खोलीत झोपतात. त्यामुळे ते केव्हा झोपले हे घरातील व्यक्तींना माहीत नव्हते.
सकाळी पास्तू यांना पत्नी उठवण्यासाठी गेली असता पास्तू यांच्या तोंडातून फेस येत होता. त्यानंतर तातडीने गोवा येथे असलेला मुलगा जॉकी याला बोलावण्यात आले. सुरुवातीला पास्तू यांचा अपघात झाला असावा, असा संशय सर्वांना होता. पोलिसांनाही बोलावण्यात आले होते. पोलिसांनी नातेवाइकांच्या म्हणण्यानुसार आकस्मिक मृत्यूची नोंद केली होती.
शवविच्छेदन अहवालानंतर खुनाचा प्रकार उघडकीस
घटनेनंतर पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करून पास्तू यांचा मृतदेह मळेवाड येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उत्तरीय तपासणीसाठी पाठविला. या तपासणीवेळी पास्तूंच्या डोक्याच्या मागच्या बाजूस जड वस्तूने प्रहार केल्याचे तपासात पुढे आले. तसेच तोंडावरही वार करण्यात आला होता, असे शवविच्छेदन अहवालात दिसून आले.
खुनाचा गुन्हा दाखल
शवविच्छेदन अहवालात खुनाचा प्रकार उघडकीस आल्यानंतर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल केला असून पास्तू यांचा मोठा मुलगा जॉकी याने पोलिसांत तक्रार दिली आहे. या तक्रारीत कोणाची नावे दिली नाहीत. मात्र, पोलीस तक्रारदार जॉकी याच्याकडून माहिती घेण्याचा प्रयत्न करीत होते.
मुलग्यावर संशय
पोलिसांनी वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अहवालानंतर पास्तू यांचा लहान मुलगा सालू याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. त्याने सांगितले की, मी वडिलांबरोबर बोलत नव्हतो हे खरे आहे, पण त्यांना मारले नाही, मी त्यांना जेवणासाठी विचारले, पण ते न जेवताच माझे मी बघतो असे म्हणत घरातून बाहेर पडले होते. ते रात्री उशिरापर्यंत आले नसल्याचे त्याने सांगितले. याबाबत पोलीस निरीक्षक रणजित देसाई यांना विचारले असता, आम्ही अद्याप चौकशी करीत असून आरोपीला लवकर ताब्यात घेऊ.