सिंधुदुर्ग : नादब्रम्ह समारोह २०१९ : नववर्षाचा पहिलाच विकेंड सावंतवाडीकरांसाठी संगीतमय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2019 01:59 PM2019-01-09T13:59:03+5:302019-01-09T14:00:48+5:30
नववर्षाचा पहिलाच विकेंड सावंतवाडीकरांसाठी संगीतमय ठरला तो नादब्रम्ह समारोह २०१९ च्या स्वर, ताल, लय, धून यांच्या बहारदार आविष्काराने. नाट्यगीत स्पर्धेचे विजेते उदयोन्मुख कलाकार आणि परिवारातील नव्या पिढीने एकाहून एक सरस आणि सुरस नाट्यपदांनी रसिकांच्या मनमंदिरात नादब्रम्ह साकारले. २००३ साली सुरू झालेल्या समारोहाचे हे यंदाचे १६ वे वर्ष होते.
सावंतवाडी : नववर्षाचा पहिलाच विकेंड सावंतवाडीकरांसाठी संगीतमय ठरला तो नादब्रम्ह समारोह २०१९ च्या स्वर, ताल, लय, धून यांच्या बहारदार आविष्काराने. नाट्यगीत स्पर्धेचे विजेते उदयोन्मुख कलाकार आणि परिवारातील नव्या पिढीने एकाहून एक सरस आणि सुरस नाट्यपदांनी रसिकांच्या मनमंदिरात नादब्रम्ह साकारले. २००३ साली सुरू झालेल्या समारोहाचे हे यंदाचे १६ वे वर्ष होते.
निधी शिरोडकर, निधी जोशी, सुधांशू सोमण आणि विधिता केंकरे या बालकलाकारांनी कार्यक्रमात रंगत आणली. तर किशोरवयीन कलाकार अक्षय जांभळे, संपदा खोबरेकर, काजल परब, मधुरा खानोलकर आदी कलाकारांनी रसिकांना नाट्यसंगीताच्या सुवर्णकाळात नेले. नादब्रम्ह परिवारातील नवे आश्वासक सूर अर्थात साक्षी शेवडे, अदिती गोगटे आणि सावनी शेवडे या त्रयीने या संगीत मंदिरावर कळस चढविला.
निमंत्रित कलाकारांच्या मैफिलीपूर्वी समारोहाचा शुभारंभ पंडित जितेंद्र अभिषेकी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सावंतवाडीचे नगराध्यक्ष बबन साळगावकर, नादब्रम्हचे अध्यक्ष प्रदीप शेवडे, उपाध्यक्ष सतीश शेजवलकर, प्रमुख पाहुणे विहंग देवस्थळी, नगरसेवक बाबू कुडतरकर, आनंद नेवगी, सागर बांदेकर, दीपाली भालेकर आदी उपस्थित होते.
प्रास्ताविक सतीश शेजवलकर यांनी केले. उद्घाटक नगराध्यक्ष साळगावकर यांनी उदयोन्मुख कलाकारांचे कौतुक केले व अशा उपक्रमास नगरपालिकेचे सदैव सहाय्य राहील, असे आश्वासन दिले. मान्यवरांच्या हस्ते जिल्हास्तर नाट्यसंगीत स्पर्धेतील विजेत्यांना गौरविण्यात आले. आभार शेखर पणशीकर यांनी मानले.