देवरुखातील पाच गाळ्यांना नगरपंचायतीचे सील
By admin | Published: March 29, 2015 11:00 PM2015-03-29T23:00:40+5:302015-03-30T00:22:38+5:30
उपासमारीची वेळ : गरिबांच्या पोटावर लाथ अन्य मोठ्या अनधिकृत दुकानांना साथ...
देवरूख : विनापरवाना उभारलेले पाच दुकान गाळे नगरपंचायतीने सील केले. ही कारवाई करण्यात आली आहे. त्यामुळे हातावर पोट असलेल्या या दुकानदारांवर उपासमारीची वेळ आली आहे. प्रशासन गरिबांवर हातोडा चालवत असून, देवरूख बाजारपेठेत असलेल्या अनधिकृत व अतिक्रमित असलेल्या दुकानांना मात्र अभय देत असल्यामुळे खुद्द नगरसेवकांनी या घटनेबद्दल संताप व्यक्त केला आहे.
शहरातील चोरपऱ्या येथे २५ वर्षांपूर्वी मणेर नामक व्यक्तीने अनधिकृत पाच दुकान गाळे उभे केले. या गाळ्यांमध्ये भाडोत्री ठेवून चक्क २५ वर्षे त्याचे भाडे वसूल केले. नगर पंचायतीच्याच हद्दीत बांधकाम करून त्याचे भाडे वसूल करणाऱ्या मणेर यांच्यावर नगरपंचायतीने कोणतीच कारवाई केली नाही. याच व्यक्तीने काही दिवसांपूर्वी दुकान गाळ्यांची इमारत विक्रीस काढली होती. यावेळी काही नगरसेवकांनी नगरपंचायतीच्या हद्दीतील हे गाळे ताब्यात घ्यावे व या गाळ्यांमध्ये पोट भरणाऱ्या दुकानदारांकडून नगरपंचायतीने भाडे घेऊन नगरपंचायतीच्या उत्पन्नात वाढ करावी, असे मत मांडले होते. याचा मुख्याधिकाऱ्यांनी उलट अर्थ लावून चक्क गाळेधारकांना कारवाईची नोटीस पाठवून गाळे खाली करण्याचा आदेश दिला होता. मुळात मणेर यांचे हे गाळेध् असताना मणेर यांच्यावर कारवाई न करता हे गाळे सीलबंद केले आहेत. या गाळ्यांमध्ये विशाल पांचाळ यांचे दुचाकी दुरूस्तीचे गॅरेज आहे. ते सीलबंद केले असताना दुरूस्तीसाठी आलेल्या दुचाकीही अडकून पडल्या आहेत.
वाहतुकीसाठी या गाळ्यांची कोणतीही अडचण नव्हती. दुसरीकडे देवरूख बाजारपेठ ते शिवाजी चौक येथे गाळेधारकांनी नगरपंचायतीच्या हद्दीत अतिक्रमण केले आहे. त्यामुळे पादचाऱ्यांसह वाहतुकीची कोंडी होत आहे. यावर उपाय म्हणून मुख्याधिकारी शिल्पा नाईक, नगराध्यक्षा स्वाती राजवाडे, पोलीस निरीक्षक डॅनियल बेन, व्यापारी व नागरिकांनी बाजारपेठेतील अतिक्रमणाची पाहणी केली होती. यावर तत्काळ कारवाई करण्याची हमी मुख्याधिकाऱ्यांनी दिली होती.
याकडे गेले तीन महिने मुख्याधिकारी यांचे दुर्लक्ष असून त्यांच्यावर वरदहस्त ठेवला आहे, असा आरोप नगरसेवकांनी केला आहे. कारवाई करत असताना बांधकाम सभापती मंगेश शिंदे यांच्यासह सर्व नगरसेवकांना मुख्याधिकाऱ्यांनी अंधारात ठेवले आहे. गाळेधारकांच्या गाळ्यांचे सील काढून यापुढे गाळ्याचे भाडे नगरपंचायतीने घ्यावे, असा एक सूर नगरसेवकांमधून उमटत आहे. (प्रतिनिधी)